You are currently viewing जवाहर नवोदय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा..?

जवाहर नवोदय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा..?

*अक्षम्य दुर्लक्ष आणि प्रशासनाचा हलगर्जीपणा कारणीभूत*

 

सांगेली:

सावंतवाडी तालुक्यातील सांगेली गावात सावरवाड येथे जवाहर नवोदय विद्यालय गेले अनेक वर्षे सुरू आहे. आजपर्यंत कधीही घडला नव्हता असा अक्षम्य प्रकार ०८ मार्च २०२४ रोजी विद्यालयात घडला आणि अन्नातून विषबाधा होऊन मुलांना सावंतवाडी सह इतरत्र रुग्णालयांमध्ये दाखल करण्याची परिस्थिती ओढवली. जवळपास १५० मुलांना अन्नातून विषबाधा झाल्याचे सूत्रांकडून समजले आहे. यापैकी अनेक मुलांना श्वसनाचा त्रास होत असून जास्त प्रमाणावर उलटी, संडास अशा प्रकारचा त्रास सुद्धा सुरू असल्याने मुलांची परिस्थिती चिंताजनक झाली होती. ७ मार्चच्या रात्रीपासून मुलांना अन्नातून विषबाधा झाल्यानंतर ८ मार्च रोजी देखील मुलांना दिलेल्या अन्नातून पुन्हा विषबाधा झाल्याने अन्न शिजविण्यासाठी वापरण्यात येणारी अस्वच्छ भांडी व निकृष्ट धान्य, बटाटे, भोके पडलेले टोमॅटो, बुरशी आलेल्या चपात्या, दुपारचेच उरलेलं अन्न नासले तरी रात्री दिले जाणे हीच परिस्थिती कारणीभूत असल्याचे प्रथमतः दिसते आहे. त्यामुळे ज्यांची जबाबदारी हे नवोदय विद्यालय असलेले सिंधुदुर्ग जिल्हाधिकार्‍यांसह प्रशासनाची झोप उडाल्याचे चित्र दिसून येत आहे.

जवाहर नवोदय विद्यालय ही शंभर टक्के अनुदानित विद्यालये असून राजीव गांधी यांनी ही संकल्पना पुढे आणली होती. ही विद्यालये केंद्रीय शिक्षण मंत्रालयाद्वारे राबविली जात असून प्रत्येक जिल्ह्यातून जवळपास दहा हजार मुलांची परीक्षा घेतली जाते व त्यामध्ये ८० गुणवंत विद्यार्थ्यांची सहावी साठी निवड केली जाते. इयत्ता सहावी ते बारावीपर्यंत सर्व शिक्षण त्या विद्यार्थ्यांना मोफत दिले जाते. यामध्ये विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण, निवास, गणवेश, पाठ्यपुस्तके, शैक्षणिक साहित्य, दैनंदिन वापरातील वस्तू, बस, रेल्वेचा प्रवास आदी सुविधा पुरविल्या जातात. मुख्यत्वे जवाहर नवोदय विद्यालयांमध्ये ग्रामीण भागातील हुशार व गुणवंत विद्यार्थ्यांना पुढे आणण्यासाठी प्रवेश दिला जातो. त्यामुळे नवोदय विद्यालयामध्ये मोठ्या प्रमाणावर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील अत्यंत हुशार व सर्वसाधारण आर्थिक परिस्थिती असणाऱ्या विद्यार्थ्यांचा भरणा असतो. केद्रसरकराच्या अखत्यारीत असलेल्या या नवोदय विद्यालयाच्या शाळांमधील कॅन्टीन व्यवस्था ही वरच्या पातळीवरून साटेलोटे होऊन कॉन्ट्रॅक्ट मिळविलेल्या शक्यतो बाहेरच्या व्यक्ती अथवा संस्थेकडे असते. वरिष्ठ पातळीवर त्यांची पोच असल्याने त्यांच्या सोयीने निकृष्ट दर्जाच्या वस्तू वापरून मुलांना आहार दिला जातो. त्यामुळे मुलांना चामडीचे रोग, जुलाब, उलट्या, व शेवटी अन्न विषबाधा असे गंभीर आजार होतात. परंतु जिल्ह्याच्या जिल्हाधिकार्यांच्या अधिपत्याखाली सर्व व्यवस्था असूनही जिल्हाधिकाऱ्यांच्या म्हणा किंवा जिल्हा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नवोदय विद्यालयाचे मुख्याध्यापक, हॉस्टेलचे व्यवस्थापक, मेसचा ठेका घेणारे ठेकेदार आदी माजतात आणि मुलांना निकृष्ट, शिळे, नासलेले अन्न खायला घालतात. त्याचा परिणाम दिसला तो सावंतवाडी तालुक्यातील सांगेली येथील जवाहर नवोदय विद्यालयातील जवळपास १५० मुलांना अन्नातून विषबाधा झाल्यावर..!

सांगेली, जवाहर नवोदय विद्यालयातील जवळपास १५० मुलांना अन्नातून विषबाधा झाल्यामुळे आज दुपारपासून सांगेली प्राथमिक आरोग्य केंद्र, सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय, कुडाळ येथील महिला व बाल रुग्णालय आदी ठिकाणी दाखल करण्यात आले व त्यांच्यावर उपचार सुरू केले. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सावंतवाडी जवळपास १०८ विद्यार्थ्यांना उपचारासाठी आणण्यात आले होते. दिवसभर सांगेली मधून सावंतवाडीकडे येणाऱ्या रुग्णवाहिकांचा ताफा दिसत होता. त्यामुळे परिस्थिती गंभीर असल्याचे समजून येत होते. सांगेली जवाहर नवोदय विद्यालयाच्या मेसमधून काल ७ मार्च दुपारी दिलेल्या जेवणातून काही मुलांना अन्न विषबाधा झाल्याचे समोर येत होते. काल रात्री जेवल्यानंतर मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास काही मुलांना उलट्या व जुलाबाचा त्रास सुरू झाला. त्यामुळे काही मुलांनी आपल्या आई-वडिलांना फोनवरून याची कल्पना दिली. परंतु असे असतानाही आज दिनांक ८ मार्च रोजी संपूर्ण दिवस नवोदय विद्यालयाच्या मुख्याध्यापकांनी शाळा सुरू ठेवल्याने जवळपास दीडशे मुलांना अन्नातून विषबाधा झाली. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर त्रास सुरू झाला. शुक्रवार दिनांक ८ रोजी दुपारी जेव्हा परिस्थिती हाताबाहेर गेली त्यावेळी मुख्याध्यापकांनी हळूहळू मुलांना ॲम्बुलन्स मधून रुग्णालयात दाखल करण्यास सुरुवात केली. परंतु जवळपास २४ तास उलटल्याने अन्नातून झालेल्या विषबाधेमुळे मुलांना मोठ्या प्रमाणावर त्रास सुरू झाले. काहींना श्वास घेण्यास सुद्धा अडथळा येत असल्याने सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर ऑक्सिजन लावून उपचार सुरू केले. मुलांना त्रास होत असताना पालकांकडूनच इतर पालकांना याबाबतची कल्पना दिली गेली. त्यामुळे अनेक पालकांनी सांगेली नवोदय विद्यालयात दिनांक ८ मार्च रोजी सकाळीच भेट देत मेस मध्ये असलेल्या अस्वच्छतेबाबतचे व्हिडिओ बनविले व विद्यालय प्रशासनास याबाबतचा जाब विचारला. परंतु निष्ठुर असलेल्या प्रशासनाने पालकांना गंभीरपणे घेतले नाही. जिल्हाधिकाऱ्यांकडे याबाबतची तक्रार केल्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी “मुले सर्व सुखरूप आहेत पालकांनी येऊ नये” असे सांगितल्याचे एका मुलाच्या पालकांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या समोरच बोलल्या. रुग्णालय परिसरात असलेली परिस्थिती पाहता पालकांनी जिल्हा रुग्णालयात रात्री उशिरा भेट दिलेल्या शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. नाम.दीपक केसरकर यांनी परिस्थिती शांतपणे हाताळत उद्या सकाळी नवोदय विद्यालय येथे १०.०० वाजता आपण पाहणी करून दोषींवर वरिष्ठ पातळीवरून योग्य ती कारवाई करतो, असे आश्वासन देत यापुढे नवोदय विद्यालयातील असलेली अस्वच्छता व प्रशासनाची अरेरावी मोडीत काढून व्यवस्था सुधारली जाईल, असे आश्वासन दिले. यावेळी प्रांताधिकारी तसेच सावंतवाडी तहसीलदार देखील उपस्थित होते. प्रांताधिकार्‍यांनी विद्यार्थ्यांच्या पालकांना धीर देत दोषींवर योग्य ती कारवाई करणार असल्याचे सांगितले.

नवोदय विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या पालकांनी आज रुग्णालयात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी भेट देताच त्यांच्यासमोर नवोदय विद्यालयात असलेल्या अस्वच्छतेचा पाढाच वाचत विद्यालयातील मेसमध्ये उंदीर, झुरळ फिरत असून याहूनही गंभीर म्हणजे अन्न उघडेच ठेवले जाते आणि कुत्री देखील मेस मध्ये मोकाटपणे फिरत असल्याचे सांगितले. मेस मधील अस्वच्छतेचे व्हिडिओ त्यांनी नाम.दीपक केसरकर यांना दाखवत “जेल मध्ये कैद्यांना देखील यापेक्षा चांगली वागणूक व उत्तम जेवण दिले जाते, परंतु जिल्ह्यातील हुशार असलेल्या आमच्या मुलांना त्याहूनही वाईट, शिळे, नासलेले अन्न दिले जाते” असे सांगून दोषींवर लवकरात लवकर कारवाई करा अशी विनंती करून तशाप्रकारचे निवेदन देखील सर्व पालकांच्या सहिने शालेय शिक्षण मंत्र्यांना दिले. नाम.दीपक केसरकर यांनी रुग्णालयात दाखल असलेल्या सर्व विद्यार्थ्यांची विचारपूस केली आणि उद्या पालक संघाच्या मेंबर्सना सोबत घेत नवोदय विद्यालय प्रशासनाशी संयुक्त बैठक घेण्याचे आश्वासन दिले.

जिल्ह्याचे खासदार विनायक राऊत यांनी देखील केंद्रीय पातळीवर याची दखल घ्यायला लावतो, आजपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले अर्ज आपणास द्या, असे सांगून विद्यालयातील उपहारगृहात असलेल्या अस्वच्छतेमुळे सदरचा प्रकार झाला असावा असे स्पष्ट केले. विद्यार्थ्यांच्या पालकांच्या म्हणण्यानुसार गेली वर्ष दोन वर्षे पालक नवोदय विद्यालयातील अस्वच्छता व भोंगळ कारभाराबाबत आवाज उठवत असून आतापर्यंत सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी तीन वेळा निवेदने दिल्याचे सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतःची जबाबदारी असताना देखील प्रांताधिकार्‍यांना सदर ठिकाणी भेट देऊन परिस्थितीची पाहणी करण्यास सांगितली. परंतु स्वतः भेट देत नवोदय विद्यालयातील परिस्थिती पाहण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी टाळल्याने जिल्हाधिकारी व प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आज मुलांवर रुग्णालयात दाखल होण्याची परिस्थिती निर्माण झाली, अशा प्रकारचा आरोप विद्यार्थ्यांच्या पालकांनी केला. नवोदय विद्यालयातील मुख्याध्यापक पालकांना किंवा पीटीए मेंबरना देखील विद्यालयातील मेस मध्ये जाण्याची परवानगी देत नाहीत. रोज बनविलेले जेवण शाळेतील शिक्षकांनी किंवा तिथे असलेल्या नर्सने स्वतः खाऊन, तपासून त्यानंतरच विद्यार्थ्यांना देणे आवश्यक असते. परंतु शाळेच्या मेसमध्ये बनणारे निकृष्ट दर्जाचे जेवण शिक्षक कधीही तपासत नाहीत तर असे निकृष्ट जेवण मुलांना खायला घातल्याने मुलांना चामडीचे अनेक आजार झाल्याचे पालकांनी सांगितले व हीच परिस्थिती कायम राहिल्याने आज मुलांवर मुलांच्या जीवावर देखील बेतले असा आरोप केला. आज मुले रुग्णालयात दखल झाली परंतु एक तरी शिक्षक रुग्णालयात दाखल झाला का? असा प्रश्न उपस्थित करत नवोदय विद्यालयाला केंद्र सरकारकडून भरीव असा निधी मिळत असताना देखील विद्यालयातील संडास बाथरूमचे दरवाजे तुटलेले असून पाण्याचे नळ देखील मोडलेले आहेत. विद्यार्थिनी ज्या वस्तीगृहात राहतात त्या वस्तीगृहाचे मागील दरवाजे देखील मोडलेल्या, तुटलेल्या अवस्थेत असल्याचे विद्यार्थिनींच्या पालकांनी शालेय शिक्षण मंत्र्यांच्या समोर सांगितले. येथील लोकप्रतिनिधी, नेते आणि जिल्हा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आज जवाहर नवोदय विद्यालयातील विद्यार्थ्यांना दहावी, बारावीच्या परीक्षा सुरू असताना देखील रुग्णालयात झोपण्याची वेळ आली. त्यामुळे मुलांचे शैक्षणिक वर्षाचे नुकसान झाल्याने पालक वर्गाने नाराजी व्यक्त केली. जिल्ह्यातील हुशार अशा ८० मुलांना मेरिटवर जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश दिला जातो. परंतु आज नवोदय विद्यालयातील मुलांवर ओढवलेली परिस्थिती पाहिली असता अशा गलिच्छ व घाणेरडे वातावरण असलेल्या जवाहर नवोदय विद्यालयात यापुढे जिल्ह्यातील स्थानिक व्यक्ती आपल्या मुलांना प्रवेश घेतील का..? असा प्रश्न उत्पन्न होत आहे.

आज अनेक मुले उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाल्यानंतर जवाहर नवोदय विद्यालयातील खरी परिस्थिती जनतेच्या समोर आली. परंतु या परिस्थितीला जबाबदार असणारे जवाहर नवोदय विद्यालयाचे मुख्याध्यापक तेथील प्रशासक, कॅन्टीनचे व्यवस्थापक आदींवर जिल्हा प्रशासन, केंद्र सरकारकडून काही कारवाई होणार की झालेली घटना विसरून पुन्हा एकदा जवाहर नवोदय विद्यालयात मुले अशाच गलिच्छ वातावरणात शिक्षण घेणार..? गुरा ढोराप्रमाणे जेवण खाणार का..? हा प्रश्न मात्र निरुत्तरच राहतो आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

9 − six =