You are currently viewing भारतीय फलंदाजांची शरणागती

भारतीय फलंदाजांची शरणागती

*पहिल्या डावात भारत २१९/७, १३४ धावांनी पिछाडीवर*

 

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने पहिल्या डावात सात गडी गमावून २१९ धावा केल्या आहेत. कुलदीप यादव १७ धावांवर नाबाद असून ध्रुव जुरेल ३० धावांवर नाबाद आहे. इंग्लंडने पहिल्या डावात ३५३ धावा केल्या होत्या. टीम इंडिया अजूनही १३४ धावांनी पिछाडीवर आहे. भारतीय फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली आहे. इंग्लिश फिरकीपटूंनी कहर केला आहे. शोएब बशीरने चार तर टॉम हार्टलेने दोन विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय जेम्स अँडरसनला एक विकेट मिळाली.

 

कर्णधार रोहित शर्मा दोन धावा करून बाद झाला. यानंतर शुभमन गिलने यशस्वी जैस्वालसोबत ८२ धावांची भागीदारी केली. रजत पाटीदार पुन्हा एकदा अपयशी ठरला आणि केवळ १७ धावा करू शकला. रवींद्र जडेजा १२ धावा करून बाद झाला. रोहितला अँडरसनने तंबूमध्ये पाठवले. तर शुभमन, रजत आणि जडेजा यांना शोएब बशीरने तंबूमध्ये पाठवले. दरम्यान, यशस्वीने कसोटी कारकिर्दीतील तिसरे अर्धशतक झळकावले. मात्र, ७३ धावा करून तो बशीरचा बळी ठरला. सरफराज १४ धावा करून आऊट झाला तर अश्विन १ धावा करून बाद झाला. या दोघांना हार्टलेने बाद केले.

 

इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथ्या सामन्यात यशस्वी जैस्वालने पुन्हा एकदा शानदार फलंदाजी केली. त्याने ११७ चेंडूत ७३ धावा केल्या. यादरम्यान यशस्वीने आठ चौकार आणि एक षटकार लगावला. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडचा संघ पहिल्या डावात ३५३ धावांत गारद झाला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने पहिल्या डावात सात गडी गमावून २१९ धावा केल्या होत्या. पहिल्या डावात भारत अजूनही १३४ धावांनी पिछाडीवर आहे.

 

यशस्वीने आपल्या ७३ धावांच्या खेळीत अनेक विक्रमांना गवसणी घातली. तो एका कॅलेंडर वर्षात भारतासाठी कसोटी फॉरमॅटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज ठरला. त्याने २०२४ मध्ये आतापर्यंत २३ षटकार मारले आहेत. वीरेंद्र सेहवागने २००८ मध्ये २२ षटकार मारले होते. यशस्वीला या प्रकरणात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स आणि प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलमला मागे टाकण्याची संधी आहे. स्टोक्सने २०२२ मध्ये २६ तर मॅक्युलमने २०१४ मध्ये ३३ षटकार मारले होते. यशस्वी या वर्षी मॅक्युलमचा विक्रम मोडू शकतो.

 

यशस्वीने या मालिकेत आतापर्यंत सात डावांत ६१८ धावा केल्या आहेत. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत ६०० किंवा त्याहून अधिक धावा करणारा तो भारताचा तिसरा फलंदाज ठरला. त्याच्या आधी भारताचे विद्यमान प्रशिक्षक राहुल द्रविड आणि अनुभवी फलंदाज विराट कोहली यांनी ही कामगिरी केली आहे. द्रविडने २००२ मध्ये इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत ६०२ धावा केल्या होत्या. यशस्वीने त्याला मागे टाकले आहे. आता कोहलीचा विक्रम हे त्याचे लक्ष्य आहे. विराटने २०१६/१७ मध्ये इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत ६५५ धावा केल्या होत्या. एका कसोटी मालिकेत ६०० किंवा त्याहून अधिक धावा करणारा यशस्वी हा भारताचा पाचवा खेळाडू ठरला. कोहली, सुनील गावस्कर आणि राहुल द्रविड यांनी त्यांच्या कारकिर्दीत प्रत्येकी दोनदा अशी कामगिरी केली आहे. याशिवाय दिलीप सरदेसाई यांनीही कसोटी मालिकेत ६०० धावांचा टप्पा ओलांडला आहे.

 

यशस्वी अजून २३ वर्षांंचाही नाही. त्यापूर्वीच कसोटी मालिकेत ६०० किंवा त्याहून अधिक धावा करणारा तो सातवा खेळाडू ठरला. त्याच्या आधी ऑस्ट्रेलियाचे डॉन ब्रॅडमन, वेस्ट इंडिजचे गॅरी सोबर्स, सुनील गावस्कर, दक्षिण आफ्रिकेचे ग्रॅमी स्मिथ, वेस्ट इंडिजचे जॉर्ज हॅडली आणि ऑस्ट्रेलियाचे नील हार्वे यांनी ही कामगिरी केली आहे.

 

शुभमन गिल इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या डावात पुन्हा एकदा अपयशी ठरला आहे. पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथ्या सामन्यात शुभमन गिलची बॅट चालली नाही. रांचीमध्ये भारताच्या पहिल्या डावात ३८ धावा करून तो बाद झाला. ऑफस्पिनर शोएब बशीरने त्याला पायचीत बाद केले. पहिल्या डावात शुभमनची कामगिरी सातत्याने ढासळत आहे. दुसऱ्या डावात तो धावा करतोय, पण पहिल्या डावात त्याची बॅट शांत राहते. गेल्या वर्षी मार्चमध्ये अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या डावात त्याने १२८ धावा केल्या होत्या. त्यानंतर पहिल्या डावात त्याला एकही अर्धशतक झळकावता आलेले नाही.

 

जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या डावात १३ धावा करून शुभमन बाद झाला. त्यानंतर, त्याने वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन कसोटीत अनुक्रमे सहा आणि १० धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन कसोटीत दोन आणि ३६ धावा केल्या. त्याचबरोबर सध्याच्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटीतील चार सामन्यांच्या पहिल्या डावातही त्याला अर्धशतकही गाठता आले नाही. त्याने अनुक्रमे २३, ३४, शून्य आणि ३८ धावा केल्या आहेत. शुभमन गिलने त्याच्या कसोटी कारकिर्दीत आतापर्यंत २४ सामने खेळले आहेत. या कालावधीत त्याने ४४ डावात १३३० धावा केल्या आहेत. त्याची सरासरी ३२.४४ इतकी आहे. शुभमनने तीन शतके झळकावली आहेत. त्याच्या नावावर पाच अर्धशतकेही आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

16 − 11 =