You are currently viewing कणकवलीत शिवजयंती उत्सव समितीच्या रॅलीस उत्स्फूर्त प्रतिसाद

कणकवलीत शिवजयंती उत्सव समितीच्या रॅलीस उत्स्फूर्त प्रतिसाद

कणकवलीत शिवजयंती उत्सव समितीच्या रॅलीस उत्स्फूर्त प्रतिसाद

शिवजयंतीनिमित्त वरवडे ते कणकवली काढण्यात आली दुचाकी – चारचाकी रॅली

कणकवली

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवजयंती उत्सव समिती कणकवली यांच्यातर्फे काढण्यात आलेल्या भव्य दुचाकी – चारचाकी रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. वरवडे ते कणकवली अशी काढण्यात आलेल्या या रॅलीमध्ये दुचाकी, चारचाकीधारक, शिवभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रॅलीमधील शिवाजी महाराज, जिजाऊंच्या वेषातील बच्चेकंपनी, अग्रस्थानी असलेल्या दुचाकीवरील शिवाजी महाराजांची प्रतिमा लक्षवेधी ठरली. रॅलीदरम्यान शिवाजी महाराजांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

रॅलीचा शुभारंभ वरवडे येथील पुलानजीक सामाजिक कार्यकर्ते कान्हा मालंडकर यांच्या हस्ते झाला. यावेळी मराठा सेवा संघाचे कोकण प्रांत सचिव तथा शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष प्रताप भोसले यांच्यासह वरवडे सरपंच करूणा घाडीगांवकर, बिडवाडी सरपंच सौ. पूजा चव्हाण, उपसरपंच सुदाम तेली, सामाजिक कार्यकर्ते संजय साळसकर आदी उपस्थित होते.

वरवडे येथून सुरु झालेली रॅली कुंभारवाडीमार्गे कलमठ बाजारपेठ येथे दाखल झाली. तेथे आयोजित शिवजयंती उत्सवातील शिवभक्तांनी रॅलीचे स्वागत केले. तेथे शिवपुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रॅली कणकवलीच्या दिशेने निघाली. कणकवलीतील आप्पासाहेब पटवर्धन चौकात आयोजित शिवजयंती उत्सवात उद्धव ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत र्नाक, रामदास विखाळे, राजू राठोड आदींनी रॅलीचे स्वागत केले. तेथे शिवपुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर रॅली बाजारपेठमार्गे शिवाजीनगर येथे दाखल झाली. तेथेही शिवपुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रॅली कणकवली – कनेडी मार्गावरून येथील सर्व्हिस रोडवर व पुढे शिवाजी महाराज चौकात दाखल झाली. तेथेही शिवपुतळ्यास पुष्पहार अर्पण करतानाच सकल मराठा समाज आयोजित शिवजयंती उत्सवास भेट देण्यात आली व रॅलीची सांगता झाली. रॅलीदरम्यान ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘तुमचे आमचे नाते काय, जय जिजाऊ जय शिवराय’, ‘जय शिवाजी, जय भवानी’ अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या.

यावेळी प्रताप भोसले म्हणाले, शिवाजी महाराजांनी रयतेचे हिंदवी स्वराज्य निर्माण केले. केवळ हिंदू अथवा मराठाच नव्हे तर अगदी मुस्लिम बांधवांनाही सोबत घेऊन अठरा पगड जातीतील मावळ्यांची वज्रमुठ महाराजांनी बांधली होती. शिवरायांचा हाच राष्ट्रीय एकात्मतेचा आणि बंधूतेचा संदेश सर्वदूर पोहोचावा, यासाठीच शिवजयंती उत्सव समितीतर्फे प्रतिवर्षी दुचाकी चारचाकी रॅलीचे आयोजन केले जाते व त्यानिमित्त सामाजिक उपक्रमही राबविले जातात. तरूणाईसह सर्व अबाल वृद्धांनी महाराजांच्या कार्याचा आदर्श घ्यावा, असे आवाहनही प्रताप भोसले यांनी केले.

रॅलीमध्ये सुभाष मालंडकर, आनंद घाडी, आनंद बांदल, नीतेश पवार, रुपेश नाडकर्णी, अभी चव्हाण, बाळा सावंत, आनंद साटम, बाबजी चव्हाण, पुरुषोत्तम लाड, अण्णा साटम, बाळा परुळेकर, इब्राहीम शेख, सोहेल खान, काका कदम, सलमान शेख, बाळा बावकर, राज सावंत – पटेल, बबन मेस्त्री, सागर राणे, बाळा मेस्त्री, श्रेयश चिंदरकर, सिझर फर्नांडीस, मिलिंद चिंदरकर, बाळू कासले, अनिल कासले, प्रशांत गावडे, राजू बावकर, अनिल घाडीगांवकर, कृष्णा घाडीगांवकर, संदीप घाडीगांवकर, बाबू नारकर, बाबू चव्हाण, सोमनाथ चव्हाण, सचिन मगर, प्रशांत चव्हाण, रामचंद्र घाडी, पांडू मगर, मुन्ना चव्हाण, रविंद्र राणे आदी सहभागी झाले होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा