*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा.सौ.सुमती पवार लिखित अप्रतिम लेख*
*माझे गांव कापडणे…*
रम्य ते बालपण म्हणतात ते काही खोटे नाही मंडळी..
पण तेव्हा ते कळत नव्हते ना? जवळ पैसा नाही, त्याची
कधी गरजच वाटली नाही! कित्ती छान ना? आता कितीही
असला तरी कमी पडतो. बॅंकेत तो सतत वाढावा असे वाटते.
बालपणी काही मागितले की लगेच मिळायचे. कोण कुठून कसे देतात काही घेणे नव्हते पहा.गावोगावी जत्रांचे पेव फुटायचे!
रथाची मिरवणूक निघते.लोक बैलगाड्या भरभरून जत्रेला जात व अजून जातात. जत्रा म्हणजे गरिबापासून श्रीमंतांपर्यंत
मोठे आकर्षण होते.जिकडे तिकडे उत्साह संचारलेला असे. मला आठवते जत्रेला जायचे म्हणजे आहेत तेच कपडे नदीवर
जाऊन पिवळी माती लावून खडकावर आपटून आपटून धुवायचे नि नदीवरच वाळूत वाळवायचे. नवे कपडे तेव्हा एकदाच दिवाळीत मिळायचें. उठसूठ नवे कपडे मिळत नसत.
गरिबातला गरीबही स्वच्छ धुवून कपडे तयार ठेवायचा.गावा पासून दूर असलेली मंडळी जत्रेसाठी दोन दिवस का होईना
सवड काढून गावी येणार म्हणजे येणार! गाव कसा गजबजून
जायचा. नदीवर खुशीत कपडे धुवायला जाणारे हसरे चेहरे
घरावरून जातांना दिसायचे, मजा यायची बघायला. सारा गांवच खुशित दिसायचा. तेव्हा काय मोबाईल व टी व्ही होते
काय? मनोरंजन म्हणजे हेच.भजन कीर्तन जत्रा सण समारंभ
हेच!
त्यात कापडण्याची जत्रा पंचक्रोशित मोठी. आजुबाजूची सारी
खेडी ओसांडून येणार. ४ते५ दिवस भरगच्च कार्यक्रम असत.
यात्रा भवानी देवीची. मग मंदिराची साफ सफाई रंगरंगोटी जोरदार असे.एक कलाकार होता तो मंदिरात मस्त चित्रांचे देवदेवतांचे पेंटिंग करत असे. गणपती शंकर आदी देवतांचे
भले मोठे ते पेंटिग मोठे मनोहारी दिसत असे. गावात कसे चैतन्य सळसळत असे.आमच्या राहत्या घराच्या देवडीच्या
भिंतीवर देखिल त्याने गणपतीचे भले मोठे उंदरासह पेंटींग केलेले अलिकडे पर्यंत शाबूत होते. त्याची ती कला पाहून मला
मोठे नवल वाटले होते. आता वाटते एवढी कला अंगात असून
त्याचे जगात काही मोल नाही, नव्हते.सारेच काही राजा रविवर्मा होऊ शकत नाही हे खरे असले तरी त्यांच्या कलेला
गावापलीकडे कवडीमोलही किंमत नाही हे पाहून मन कष्टी
होते.
त्यावरून एक गोष्ट आठवली ती सांगते. आठवीत आम्हाला
वाणी सर ड्रॅाईंग टीचर होते.एवढी सुंदर चित्रं काढायचे ते की
काय सांगू? आणि मी ? बाप रे बाप? अगदी ढऽऽऽऽऽऽऽ!
तास सुरू झाला की मला प्रॅाब्लेम? आता सर मांजर काढायला
सांगतील मग माझे काय होईल रे देवा..! पण नशिब थोर असायचे कधी कधी! सर रांगांमधून फिरता फिरता (मी पहिल्याच बेंचवर बसत असे)आले की माझ्या बेंचजवळ थांबत
व सहज मानेपर्यंत मांजर काढून टाकत. माझे अर्धे काम होऊन
जाई. मग काय , कुणाचे तरी पाहून तंगड्या काढायच्या कशा
तरी की झाली मांजर तय्यार! की माझे गंगेत घोडे न्हालेच म्हणून समजा! आता ही मला ते ठेंगणेठुसके पिवळसर रंगाचे
गालात मिशित हसणारे सर दिसताहेत. वर्ग दिसतो आहे. सगळ्यात मजा यायची ती कागदाची अर्धी घडी घालून ते अर्ध्या भागात डिझाईनचे चित्र काढायचे आणि मग अर्ध्या भागात आम्ही ते डिझाईन पूर्ण करायचे म्हटल्यावर माझी
पाचावर धारण बसायची! वाटायचे, कश्शाला हा विषय
शिकवतात बाबा? नाही आला तर नापास! चित्रं तर काढताच
येत नव्हते.मोठा जड जायचा तो तास मला. कधी कधी कागदाला पिवळा वॅाश द्यायचा व तो वाळला की त्यावर कंपास ने डिझाईन काढायचे? राम राम राम..सर आवडायचे
पण तासाची मात्र भिती वाटायची. माहित नाही, परिक्षेत काय
बोंब पाडली असेल ती! लग्ना नंतर मुले मोठी झाल्यावर प्रॅाब्लेम रिपिट झाला. मुलाला घरून कुत्रा काढून आणा सांगितलेले असे. मी आणि माझा नवरा, आमची कुत्रा काढण्या साठी झटापट चालू असे. राम राम! भलतेच काही
बनत असे. आताही मला आठवून हसू येते आहे.
बघा, जत्रेवरून कुठे चित्राकडे निघून गेले मी. हं तर, यात्रे विषयी बोलत होतो आपण.आठवणी डोळ्यासमोर दिसतात नि
मग मी असा रस्ता सोडून अशी भरकटते. असो.हं, भवानी मंदिरातून रस्ता चुकलो आपण. मी खूप लहान होते. त्या काळी
भगतांचे प्रस्थ होते. हातात भला मोठा झाडू घेऊन डफाच्या
तालावर नाचत भगताची गावांच्या गल्ल्यांमधून पाठी मागे मोठा जनसमुदाय घेऊन मिरवणूक निघत असे. अख्खा गाव पाठीमागून फिरत असे.मी प्रचंड घाबरत असे.
आमच्या चौठ्यात मिरवणूक आली की,आमच्या घरासमोर भगताला जरा जास्तच चेव यायचा कारण त्याला माहित असे
हे भाऊंचे घर आहे. माझे वडिल नास्तिक होते.त्यांचा अशा गोष्टींना बिलकुल पाठींबा नसे. पण जनमताचा आदर ठेवावा
लागे.एकदा तर एक भगत खिळ्यांच्या बेडवर झोपून दाखवत
असे.असा तो गावभर मिरवत मिरवत मग मंदिरा पर्यंत पोहोचत
असे. मग त्याच्या हस्ते मंदिरात ध्वज उभारला जाई.ढोलताशांच्या गजरात व सर्व गावाच्या उपस्थितीत मग पुजाअर्चा होत असेआणि मग अधिकृतपणे यात्रेला सुरूवात होत असे.
आताही मला यात्रा डोळ्यांसमोर दिसते आहे. नदीच्या काठाने फुल्ल अशी यात्रा भरत असे.टरबुजाचे ढीग,भांडेवाल्यांचे तंबू
ठोकलेले, जिलेबी गाठी शेवेचे ढीग पाहून तोंडाला पाणी सुटत
असे.पण आजच्या सारखी खरेदीची हिंमत व पैसे ही जवळ नसत व गरजही वाटली नाही.गुळाची जिलेबी पाहून आज ही
माझ्या तोंडाला पाणी सुटते.चहूकडून यात्रेत माणसेच माणसे!
जिकडे तिकडे तंबूच तंबू. आणि मोठ्ठे आकर्षण म्हणजे नथ्थू
वड्डरचा फिरता पाळणा.पाळण्या भोवती मुलांची हीऽऽऽ गर्दी.
नंबर लागेना. आणि मी भाऊंची मुलगी म्हणून आमचा वशिला!
तो पैसे ही घेईना. मला वाटते तेव्हा पाच पैसे घेत असे तो.पाळणा फिरून मग यात्रेत आल्याचे सार्थक होई.आणि रात्री धमाल करमणूक व गावकऱ्यांचा जीव की प्राण असा तमाशाचा फड रंगत असे. अलोट गर्दी व हसून लोटपोट व
थोडा ग्राम्य असा तो तमाशा पाहण्यासाठी रस्ते संध्याकाळ
पासूनच ओसांडून वाहू लागत व तमाशातले ते नाचे पाहून
लोकांच्या डोळ्याचे पारणे फिटत असे….
केव्हा एकदा जेवतो व तमाशाला जातो असे लोकांना होऊन
जाई. एकदा हट्टाने मी ही वडिलांना मला तमाशा बघायचा आहे सांगितले नि ते खरंच मला घेऊन गेले.पण लहान असल्या
मुळे मला काही कळले तर नाहीच व नेहमी प्रमाणे मी झोपून
गेल्याचे मला आठवते. लोक मात्र खूप एन्जॅाय करत असत.
हसून हसून लोटपोट होत असत.असा तो तमाशा पहाटे पर्यंत
चालत असे व लोक त्याचा पुरेपूर आनंद घेत असत.आणि दिवसा ते तमाशातले नाचे दिसताच त्यांच्या मागे फिरत आम्ही
खुश होत असू.तमाशा पाहून पहाटे घरी परत आल्यावर लोकांना शेतात कामाला जाणे खूप जड जात असे व दिवसभर
तमाशाच चघळला जात असे.असे ते सुखाचे दिवस होते, निदान माझ्यासाठी नक्कीच ना? बाकीच्यांना बिचाऱ्यांना त्यांची कामे होतीच ना?
मग मंडळी…
बाकीची यात्रा नंतर पाहू या का? पुढच्या रविवारी नक्की..!
खूपखूप धन्यवाद..
जयहिंद .. जय महाराष्ट्र..
आपलीच,
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)