You are currently viewing ऐन डिसेंबरमध्ये सावंतवाडी शहरात टँकरने पाणी पुरवठा

ऐन डिसेंबरमध्ये सावंतवाडी शहरात टँकरने पाणी पुरवठा

सावंतवाडी

सावंतवाडी शहराला पाणी पुरवठा संस्थानकालीन केसरी नळपाणी योजना, चिवार टेकडी आणि मुख्य धरण म्हणजे पाळणेकोंड येथून होतो. पाळणेकोंड धरणाची उंची वाढवून शहराला पाणी कमी पडणार नाही याची देखील दक्षता घेण्यात आली होती. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून शहरात २४ तास पाणी पुरवठा करण्यात येईल अशी आश्वासने देण्यात आली होती. यावर्षीचा पावसाळा हा ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यांपर्यंत लांबलेला होता. त्यामुळे पाण्याचा साठा देखील मुबलक आहे. तरी देखील सावंतवाडी शहराला ऐन डिसेंबरमध्ये टँकरने पाणी पुरवठा करण्याची पाळी नगरपालिका प्रशासनावर का आली?
गेले काही दिवस शहरात पूर्वी जेवढ्या प्रमाणात पाणी पुरवठा होत होता तेवढा देखील पाणी पुरवठा होत नाही. शहरात इमारती वाढल्या, लोकसंख्या देखील वाढली परंतु २४ तास पाण्याच्या वल्गना होत असताना आज दिवसातून एकवेळ देखील पूर्ण पाणीपुरवठा का होत नाही हे मात्र सावंतवाडीकरांना न उलगडणारे कोडे आहे. शहराच्या पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या ह्या कित्येकवर्षं पूर्वीच्या आहेत, तसेच वाढलेल्या इमारतींच्या मानाने होणारा पुरवठा कमी आहे, त्यामुळे शहरातील जलवाहिन्या ह्या बदलणे आणि पाणी पुरवठ्याचे योग्य नियोजन होणे आवश्यक आहे. सावंतवाडी शहराला पाण्याचे दुर्भिक्ष नाही, केवळ गरज आहे ती योग्य नियोजन आणि अभ्यासपूर्ण कृतीची.
एप्रिल मे महिन्यात क्वचित प्रसंगी टँकरने पाणी पुरवठा करण्याची वेळ सावंतवाडीत येते, परंतु पावसाळा संपून महिन्याभरात अशी वेळ यावी हे दुर्दैव. सावंतवाडी नगरपालिका प्रशासनाने याच्यातून बोध घेऊन भविष्यात पाणी पुरवठा सुरळीत राहील याची दक्षता घेण्याची आवश्यकता आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

17 − fifteen =