You are currently viewing गीत रामायण आणि मी

गीत रामायण आणि मी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा मुल्हेरकर लिखित अप्रतिम लेख*

*गीत रामायण आणि मी*

राम कथा अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या वृद्धांपर्यंत सर्वांना अतिशय प्रिय असणारी. आद्य कवी वाल्मिकीने प्रथम रामायण लिहिले, तुलसीदासाने रामचरित मानस हिंदी भाषेत लिहिले, त्यानंतर अनेक साहित्यिक, कवींनी रामायणावर विविध प्रकारच्या रचना केलेल्या आहेत. कै. ल. रा. पांगरकरांनी एक छोटेसे कवी रामायण प्रसिद्ध केले. डॉक्टर मराठे यांचे ओवीबद्ध झोपाळ्यावरचे रामायण उपलब्ध आहे. डॉक्टर कुलकर्णी यांचे प्रसाद रामायण प्रसिद्ध आहे. सीता स्वयंवर हे विष्णुदास भाव्या चे पहिले मराठी नाटक. दूरदर्शनवर १९८०च्या दशकात प्रसारित झालेले रामायण न पाहिलेला कोणी विरळाच असेल. अशा परिस्थितीत महाराष्ट्रात गाजलेली रामायणावरील कलाकृती कोणती असा जर प्रश्न विचारला तर एकमताने उत्तर मिळेल, आधुनिक वाल्मिकी कै.ग. दि. माडगूळकर यांनी लिहिलेले आणि सुधीर फडके यांनी स्वरबद्ध केलेले गीत रामायण…
या गीतरामायणाविषयी ख्यातनाम कवी श्री बा.भ.बोरकर लिहितात, ” कवी श्री माडगूळकर आणि पुणे केंद्राचे उत्साही व कल्पक कार्यकर्ते श्री सीताकांत लाड सहज एका संध्याकाळी भेटतात काय, बोलता बोलता सहज गीत रामायणाची कल्पना निघते काय, त्यातले स्वर सौंदर्य उलगडून दाखवायला श्री सुधीर फडक्यांसारख्या पट्टीच्या संगीत नियोजकाची जोड मिळते काय, आणि सगळा लहान मोठा मराठी समुदाय त्याचे कोड कौतुक करतो काय, सारेच विलक्षण! हे गीत रामायण गात गातच जन्माला आले, गात गातच वाढले आणि गात गातच परिणामाला आले. गीत रामायणाच्या जन्म कथेवरून मला म्हणावेसे वाटते की ते कुणी लिहिलेले नाही, ते झालेले आहे. ”
खरोखरीच हे विलक्षण गीतकाव्य म्हणजे एक असामान्य योगच आहे.
आपल्या सर्वांच्याच आयुष्यात श्रीरामाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मातृ-पितृ भक्त राम, धर्म,नीति, वचन पाळणारा सत्यप्रिय राम, मर्यादा पुरुषोत्तम राम! रामा वाचून कोणाच्याही जीवनात राम नाही. अशा या रामाची गीते ऐकताना समाधी लागली नाही तरच नवल!
एप्रिल १९५५ मध्ये पुणे आकाशवाणी वरून राम नवमी- रामाचा जन्मदिन या दिवशी *स्वये श्री राम प्रभू ऐकती
कुशल व रामायण गाती* हे पहिले गीत बाबूजी श्री सुधीर फडके यांनी त्यांच्या सुश्राव्य आणि भावपूर्ण आवाजात सादर केले आणि श्रोत्यांच्या मनाचा काव्य आणि संगीत या सुरेख संगमाने ताबा घेतला. दर आठवड्याला एकेक गीत जन्माला येत होते, त्यावर स्वरसाज चढत होता आणि श्रोते आठवडाभर नवे गीत ऐकण्यासाठी आतुर झाले होते. जीवनाला एक नवी दिशा मिळत होती. भक्ती, करुणा, वीर, रौद्र, भीषण, अद्भुत अशा विविध रसाने युक्त एकेका गीताच्या शिडकाव्याने सारा मराठी श्रोतृवृंद झपाटून गेला होता.
आजच्या धकाधकीच्या आणि अति
व्यस्त जीवनात हे गीत रामायण, अवघ्या ५६ गीतातून साकारलेले संजीवनच म्हणावे असे मला वाटते.
आकाशवाणी वरून गीते ऐकणाऱ्या श्रोत्यात मीही होतेच एक बारा तेरा वर्षांची बालिका. सुरांची मोहिनी होती पण काव्य मात्र फार समजत नव्हते. साधारण १९६० च्या दशकात बाबूजींनी ५६ गाण्यांपैकी सतरा निवडक गीतांचा जाहीर कार्यक्रम सुरू केला.
ते गीत रामायण ऐकण्याचे भाग्य मला लाभले. प्रत्येक गीता आधी प्रस्तावना सुधीर फडके स्वतःच करीत असत आणि संवादिनीवर वाजवीत अत्यंत सुरेल आवाजात आणि अतिशय स्पष्ट वाणीत ते गीत रसिक प्रेक्षकांसमोर सादर करीत असत. साथीला फक्त तबला. बाकी वाद्यांचे अवडंबर नाही, काही नाही.
पहिल्याच गीताची सुरुवात *श्रीराम* अश्या तिहाईने केली आणि माझे तर अंगच शहारले. रामायण गाणारे ते दोन बटू कुश आणि लव अगदी डोळ्यापुढे साकारले.
*दोन प्रहरी का ग शिरी सूर्य थांबला
राम जन्मला ग सखी राम जन्मला* हे नगरजनांचे गीत ऐकताना स्वतःच्याच घरी उत्सव असल्यासारखे भासत होते.
अशाप्रकारे रामाचा जन्म, रामाचे बालपण….
*सावळा ग रामचंद्र चंद्र नभीचा मागतो
रात जागवितो बाई सारा प्रासाद जागतो*
हे शब्द मनावर मोहिनी घालत होते.
धनुर्विद्या शिकण्यासाठी श्रीराम आणि लक्ष्मणाचे गुरु विश्वामित्रांसोबत गुर्वाश्रमी गमन,
*चला राघवा चला पहा या जनकाची मिथीला*
या विश्वामित्रांच्या आदेशानुसार सीता स्वयंवरासाठी जाणे, वाटेत अहल्येचा उद्धार, शबरी भिल्लीणीची उष्टी बोरे आणि
*आकाशाशी जडले नाते धरणी मातेचे
स्वयंवर झाले सीतेचे* रामचरित्रातील अतिशय आनंदी व उत्साही असा हा पूर्व रंग!
*मोडू नका वचनास नाथा मोडू नका वचनास*
*भरता लागी द्या सिंहासन रामासी वनवास*
कैकयी मातेची दशरथाकडे विलक्षण मागणी.
राम कथेचे नाट्यपूर्ण वेगळे वळण! पुढे दशरथाचा मृत्यू, रामाचे वनवासास निघणे आणि
*निरोप कसला माझा घेता
जेथे राघव तेथे सीता* पतिव्रता सीतेची कळकळीची विनंती काळीज हेलावून टाकणारी.
*पतीच छाया पतीचे भूषण*
पती चरणांचे अखंड पूजन*
*हे आर्यांचे नारी जीवन*
एकेक शब्द स्त्री विषयी आदरभाव निर्माण करणारा! त्या वनवासी रामाने मंदाकिनी च्या तटी! भरताला सांगितलेले जीवनविषयक तत्त्वज्ञान—
*जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात?*
*दुःखमुक्त जगला का रे कुणी जीवनात?*
*वर्धमान ते ते चाले मार्ग रे क्षयाचा*
*पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा*
संपूर्ण गीत रामायणाचा कळस असे हे गीत.
हे गीत बाबूजींच्या तोंडून ऐकताना डोळ्यातून घळघळा अश्रू आले नाही तरच नवल!
सीतेने स्त्री हट्ट धरला आणि पुढचे अघटीत रामायण घडले. मोहाला रिपू म्हटले ते उगीच नाही. *तोडिता फुले मी सहज पाहिले जाता*
*मज आणून द्या तो हरीण अयोध्या नाथा* मधाळ शब्दातले हे गीत – सीतेचा हा आग्रह राम तरी कसा मोडेल?
व्हायचे तेच, झाले. त्या मायावी रावणाने सीतेचे हरण केले. रामभक्त हनुमानाने सीतेचा शोध घेतला आणि सुग्रीव व सर्व वानरगण एकत्र येऊन सेतुबंधनाचे कार्य पार पाडले.
*राम भक्ती ये दाटूनी पोटी*
*शत तीर्थांच्या लवल्या पाठी*
*सत्कार्याच्या पथिकासाठी*
*श्रीरामाला असेच घेती वानर पाठीवरी*
*सेतू बांधा रे सागरी*
ऐकणाऱ्या श्रोत्यांच्याही मनात संचार होतो.
रामाने अंगदाकरवी रावणाला निरोप पाठवला होता. *जा झणी जा रावणास सांग अंगदा*
*शेवटचा करी विचार फिरूनी एकदा*
परंतु कोपयुक्त रावणाने त्याच्या सैन्याला पाचारण केले आणि अखेर—
*नभा भेदुनी नाद चालले शंख दुंदुभीचे*
*अनुपमेय हो सुरू युद्ध हे राम रावणाचे*
रामाचे एक एक बाण लागूनही रावणास नवी शिरे उत्पन्न होत असल्याचे पाहून
*पुण्यसरे की सरले माझ्या बाहूमधले प्राण*
*आज का निष्फळ होती बाण?*अशी रामाच्या मनात शंका निर्माण झाली, परंतु मातलीने पितामहास्त्राचा प्रयोग करण्याची आठवण करून दिल्याने अगस्ती ऋषींनी दिलेला दैदीप्यमान बाण रामाने धनुष्याला लावला आणि काय नवल—
*भूवरी रावण वध झाला*
सीता रामाची भेट झाली, परंतु राम राजा आणि पती, पुरुषार्थ जागा होणारच. तो सीतेला काय म्हणाला?
*संपले भयानक युद्ध*
*दंडीला पुरा अपराध*
*मावळला आता क्रोध*
*मी केले जे उचित नृपाते होते*

*तो रावण कामी कपटी*
*तू बसलीस त्याच्या निकटी*
*नयना सह पापी भ्रृकुटी*
*मज वदवेना स्पष्ट याहुनी भलते*

*मी केले निजकार्यासी
*दशदिशा मोकळ्या तुजसी*
*नच माग अनुज्ञा मजसी*
*सखी सरले ते दोघांमधले नाते*
*लीनते चारुते सीते*
हेलावून सोडणारी ही राम कथा!
खुद्द प्रभू रामचद्रांनी पतिव्रता सीतेबद्दल
शंका व्यक्त करावी आणि लोकांच्या साक्षीने प्रत्यक्ष पावकानेही स्पर्श न करणार्‍या अग्नीतून शुद्धता सिद्ध केलेल्या गर्भवती सीतेचा केवळ अयोध्येचा राजा म्हणून लोकापवादासाठी त्याग करावा हा रामायणाचा शेवट मन विषन्न करतो. त्याही परिस्थितीत सीता लक्ष्मणाला सांगते,
*सरले जीवन सरली सीता*
*पुनर्जात मी आता माता*
*जगेन रघुकुल दीपा करिता*
*फल घरी रूप हे सुमन मिटे* ती लक्ष्मणाला
आदेश देते
*जाई देवरा नगरा मागुती*
*पती न राघव केवळ नृपती*
*बोलता पुन्हा ही जीभ थटे*
*पती चरण पुन्हा मी पाहू कुठे?*
किती हे कारुण्य? प्रत्यक्ष राम सीता या दैवताची
जीवनाची ही कथा मग सामान्य माणसांचे काय?
कुश लवानी गायलेली ही कथा ऐकून
निशब्द अवस्थेत सभागृहातून बाहेर पडताना
माझ्या मनात विचार आले, कधीकाळी हे गीत रामायण मला गाता येईल का? छे कसं शक्य आहे? हो पण दैवगती काहीतरी वेगळीच असते. वैवाहिक जीवनाच्या उत्तरार्धात मला पती-वियोग साहणे आले, आणि आयुष्य सावरण्यासाठी मी संगीताचा आधार घेतला. हळूहळू प्रगती होत होती आणि एक दिवस माझी धाकटी बहीण मला म्हणाली, ” ताई, तू गीता रामायण कर”. जवळजवळ तीस वर्षांच्या अवधीनंतर माझ्या मनातील ही सुप्त इच्छा पूर्ण करण्याचा तो योग होता का? मी माझ्या गुरुजींना याविषयी सांगितले. ” तुम्ही अवश्य करा, चांगले जमेल तुम्हाला” असे म्हणून त्यांनी मला प्रोत्साहन दिले. बहिणीला म्हटलं, “निवेदन तूच कर”आणि काय सांगू आमच्या आईच्या बंगल्यात आमचे जवळचे नातेवाईक आणि मोजकी स्नेही मंडळी यांच्या उपस्थितीत आमचा गीत रामायणाचा पहिला प्रयोग यशस्वी झाला. उपस्थित सर्व प्रेक्षक अगदी रमले होते, कोणीही जागचे हल्ले नाही. चौदा निवडक गाण्यांचा दोन तासांचा आमचा हा कार्यक्रम आम्हाला एक वेगळीच ऊर्जा देऊन गेला. त्यानंतर मुंबई,ठाणे आणि अमेरिका येथे आमचे अनेक कार्यक्रम झाले. आमच्या गृह संकुलात तर
गीत रामायण गायिका अरुणा मुल्हेरकर अशीच माझी ओळख होती. बोल बाला इतका वाढला की आश्चर्य म्हणजे माझ्या घराजवळील एका विठ्ठल मंदिराचे दोन कार्यकर्ते माझा तपास घेत एक दिवस घरी आले आणि येत्या माघी उत्सवात
मी संपूर्ण छप्पन गाण्यांचे रामायण सादर करावे अशी त्यांची इच्छा त्यांनी व्यक्त केली. हे एक मोठे आव्हानच होते. प्रभू रामचंद्रांची सेवा करण्याची
याहून चांगली संधी कोणती असू शकते असा विचार करून मी ते आव्हान स्वीकारले. महिनाभर खूप मेहनत केली, आणि माझे भाग्य म्हणजे माझे दोन्ही गुरु संवादिनी आणि तबल्याच्या साथीला स्वतःहून हजर राहिले. दोन बाजूला दोघी बहिणी राधिका आणि अंजोर निवेदनाला! सतत सहा दिवस हा गीत रामायणाचा सोहळा सुरू होता, वातावरण भक्तीरसात भिजलेले होते
गीत रामायण म्हणजे माझ्या आयुष्याचा अखंड सोबती. त्याने मला आत्मारामाचे दर्शन दिले, माझ्या आयुष्याला दिशा दिली, जगणे शिकविले.
श्रीराम! श्रीराम! श्रीराम!

अरुणा मुल्हेरकर
मिशिगन.

प्रतिक्रिया व्यक्त करा