प्रजासत्ताक दिनी महावितरणच्याअन्यायी कारभाराच्या विरोधात वीज ग्राहक संघटनेचा उपोषणाचा इशारा*
कुडाळ
सिंधुदुर्ग जिल्हयातील वीज ग्राहकांना त्यांच्या मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. सिंधुदुर्गात मात्र महावितरणच्या दर्जाहीन सेवेमुळे ग्राहकांना आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागत आहे. सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेने वेळोवेळी निवेदनांच्या माध्यमातून जिल्ह्यातील वीज ग्राहकांना उद्भवणाऱ्या समस्यांची माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांस करून दिलेली असताना देखील अनेक महत्त्वाच्या व वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या तक्रारींचे निरसन आजतगायत महावितरणकडून केलेले नसल्याने देशाच्या ७५ व्या प्रजासत्ताक दिनी महावितरणच्या अन्यायी व बेलगाम कारभाराच्या विरोधात सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना जिल्ह्यातील प्रत्येक वीज ग्राहकाच्या हक्कासाठी महावितरणचे विभागीय कार्यालय, कुडाळ येथे उपोषण करणार येईल.
सिंधुदुर्गतील सर्व ८ ही तालुक्यातील महावितरण कंपनीचा कारभार पाहिला असता अनेक वेळा लाईट जाणे, लाईनवर आलेली झाडे न तोडणे, वारंवार उद्भवणारे यांत्रिक तांत्रिक बिघाड, अस्थिर बीजदाब, अनेक ठिकाणी वायरमन नसणे, जबाबदार अधिकारी व कर्मचारी यांचे भ्रमणध्वनी बंद असणे, तक्रार निवारण केंद्रात ग्राहकांच्या फोनला प्रतिसाद न देणे इत्यादी तक्रारी प्रामुख्याने निदर्शनास येतात.
सद्यस्थितीत खंडित होणारी वीज, अस्थिर दाबाचा बिद्युत प्रवाह यामुळे पर्यटन व्यावसायिकांना सुद्धा आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.
मागील कित्येक वर्षे जिल्ह्यातील वीजवाहिन्या व वीज पोल बदलेले नसल्यामुळे वीज ग्राहकांना वारंवार खंडीत पुरवठ्याचा त्रास भोगावा लागत आहे. याबाबत अनेकदा सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेने महावितरणकडे समस्यांचा पाढाही वाचला. मात्र, महावितरणकडून त्यांच्या दिल्या जाणाऱ्या सेवेत कोणताही बदल नाही. महावितरणचे विभागीय कार्यालय, कुडाळ येथे उपोषण करणार येईल, अशी माहिती जिल्हाध्यक्ष श्रीराम शिरसाट यांनी दिली.