You are currently viewing माणगाव खोऱ्यातील जत्रोत्सवात जुगाराच्या मैफिली

माणगाव खोऱ्यातील जत्रोत्सवात जुगाराच्या मैफिली

*२००० रुपयांसाठी खाकीकडून होते तडजोड*

 

कुडाळ :

गुलाबी थंडीचा मौसम आणि कोकणातील जत्रोत्सव त्यात जुगाराच्या मैफिली म्हणजे जुगार्यांसाठी त्रिवेणी संगमच…! माणगाव खोऱ्यात जत्रोत्सव सुरू झालेले असून आज शिवापूर या अतिदुर्गम भागात जत्रोत्सव होऊ घातलेला आहे. माणगाव खोऱ्यात काल झालेल्या जत्रोत्सवात जुगाराच्या मैफिली सजल्या होत्या आणि त्याचे फोटो संवाद मीडियाला प्राप्त झालेले आहेत. त्यामुळे आज होणाऱ्या जत्रोत्सवात देखील मोठ्या प्रमाणावर जुगाराच्या मैफिली सजण्याची शक्यता अधिक आहे.

माणगाव खोऱ्यात जत्रोत्सवाची भोई वाहण्याचे काम करणारे खाकीचे शिलेदार अवघ्या दोन हजार रुपयांसाठी जुगाऱ्यांशी तडजोड करत असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. त्याचबरोबर त्यांना सहकार्य करणारे गावचे रक्षक म्हणून वर्दी शिवाय मिरवणारे शिलेदार तर केवळ पाचशे रुपयांच्या एका हिरव्या गांधीसाठी आपले इमान गहाण ठेवत असल्याचे समजते. माणगाव खोरे हे कुडाळ तालुक्यातील अतिदुर्गम भागात वसलेले असल्याने बाहेरून कोणीही वरिष्ठ खाकी वर्दीचे अधिकारी त्या ठिकाणी धाड टाकण्यासाठी शक्यतो जात नाहीत, आणि गेले तरी पोचण्यास बराच अवधी लागतो याचाच फायदा उचलून माणगाव खोऱ्यातील खाकी वर्दीचे शिलेदार प्रत्येक जत्रोत्सवातील जुगारासाठी केवळ दोन हजार रुपयांवर आपली मांडवली करून तरुणाईला अवैद्य धंद्याकडे वळण्यासाठी सहकार्य करत आहेत. एकीकडे खाकी वर्दी म्हणजे सर्वसामान्य जनतेच्या रक्षणासाठी उन्हातान्हात उभे राहून काम करणारे कर्तबगार माणूस… परंतु आपले मूळ उद्दिष्ट बाजूला ठेवून अवैध रित्या मिळणारी लक्ष्मी खिशात कोंबण्याचे काम करतात, हे मात्र दुर्दैव…

जिल्हा पोलीस प्रमुखांनी जुगाऱ्यांची भोई वाहणाऱ्या खाकी वर्दीवर जातीनिशी लक्ष ठेवून जत्रोत्सवातील जुगारांवर योग्य ती कारवाई करावी. अशी मागणी माणगाव खोऱ्यातील जनतेकडून करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा