You are currently viewing किल्ले होडी प्रवासी वाहतुकीसाठी शासनाने शिथिलता द्यावी – मंगेश सावंत 

किल्ले होडी प्रवासी वाहतुकीसाठी शासनाने शिथिलता द्यावी – मंगेश सावंत 

पर्यटन व्यवसायावर परिणामाची शक्यता…

मालवण

कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढल्याने राज्यात लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमुळे मालवणातील पर्यटन व्यवसायावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी होडी वाहतूक व्यावसायिक संघटनेने पर्यटन व्यवसायासाठी हे निर्बंध शिथिल करण्याची मागणी करत कोरोना विषयक नियमांना अधीन राहून ५० टक्के पर्यटक प्रवाशांच्या उपस्थितीत किल्ला होडी वाहतूक सुरू ठेवण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी सिंधुदुर्ग किल्ला प्रवाशी होडी वाहतूक व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष मंगेश सावंत यांनी केली आहे

कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे कोरोनाची तिसरी लाट निर्माण झाल्याने राज्यात निर्बंध लागू केले आहेत. या निर्बंधांमुळे येथील पर्यटन व्यवसायावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. या पूर्वीच्या कोरोनाच्या दोन्ही लाटेत लॉकडाऊन व निर्बंधांमुळे पर्यटन व्यासायिकांना मोठे नुकसान सहन करावे लागले होते. आता पुन्हा लागू झालेल्या निर्बंधांमुळे पर्यटन व्यवसाय पुन्हा अडचणीत येणार असल्याने पर्यटन व्यवसायाला या निर्बंधांमधून शिथिलता मिळावी अशी मागणी श्री. सावंत यांनी केली आहे.

पर्यटन व्यवसायावर निर्बंध लादण्यात येऊ नयेत. हा व्यवसाय आता पर्यटन हंगामातील उरलेले पाच महिने चालणार असून पुढे पावसाळ्यात चार महिने हा व्यवसाय बंद राहणार आहे. तसेच अवकाळी पाऊस, वादळे यामुळेही अनेकदा पर्यटन व्यवसाय बंद राहत असल्याने नुकसान सहन करावे लागते. आता नव्या निर्बंधांमुळे पर्यटन व्यवसाय ठप्प होण्याची भीती आहे. पर्यटन व्यवसायासाठी नियम शिथिल केले नाही तर पर्यटन व्यावसायिकांवर, प्रवासी होडी वाहतूक व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ येणार आहे. त्यामुळे नियमात शिथिलता दिल्यास नियमांना अधीन राहून सोशल डिस्टन्स पाळून होडी मध्ये ५० टक्के प्रवाशांच्या उपस्थितीने किल्ला होडी वाहतूक व्यवसाय आम्ही सुरू ठेवू, गेले दोन दिवस आम्ही ५० टक्के क्षमतेने वाहतूक सुरू केली आहे, असे सावंत यांनी म्हटले आहे. या प्रश्नाबाबत जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांचे लक्ष वेधणार आहोत असेही श्री. सावंत यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा