You are currently viewing नांदगावचा किल्ला

नांदगावचा किल्ला

*⛳नांदगावचा किल्ला⛳*

नांदगावचा किल्ला नाव ऐकल्यावर खूप जणांना आच्छर्य वाटेल. मलाही आच्छर्य वाटलेले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किल्ल्यांच्या यादीमध्ये नांदगावच्या किल्ल्याचा उल्लेख आहे. माझ्या वाचनातील तीन पुस्तकांमध्ये या किल्ल्याचा उल्लेख आढळला नाही. नेट वर शोधता शोधता लोकमत पेपर ची एक बातमी वाचनात आली त्यात नांदगाव किल्ल्याची माती १ नोव्हेंबरला राजकोट किल्ला येथे नेण्यात आलेली होती. नांदगाव ग्रामपंचायत जवळच हे ठिकाण असल्याचे त्यात लिहिलेले होते. अजून नेटवर शोधले असता सतीश अक्कलकोट यांच्या पुस्तकातील संदर्भाचा त्यात उल्लेख केलेला आढळला. लगेच डॉ कमलेश चव्हाण यांना फोन केला त्यांच्याजवळ सतीश अक्कलकोट यांचे गडकिल्ले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हे पुस्तक होते. त्यांनी वाचण्यासाठी पुस्तक दिले.
रात्री पुस्तकातील संदर्भ वाचल्यानंतर आज शनिवार दिनांक १३ जानेवारी २०२३ रोजी दुपारी ऋतुराज श्रीकृष्ण सावंत आणि मी नांदगाव ग्रामपंचायतच्या दिशेने निघालो. ग्रामपंचायतकडे पोहचल्यानंतर समजले ते ग्रामपंचातच्या जवळ नसून जरा अलीकडे आहे.
स्थानिक नांदगाव किल्ला असे त्या ठिकाणास न ओळखता कोटाचा माळ असे संबोधतात. त्यामुळे कोटाचा माळ कुठे आहे विचारत त्या ठिकाणी आम्ही पोहचलो. नुकतीच या माळावरील गवताला आग लागलेली होती. माळ फिरून झाल्यानंतर जवळ असलेल्या झाडांच्या झाडीत फिरल्यानंतर एक मोठे आंब्याचे झाड आम्हाला दिसले त्या झाडाच्या जवळ खंदक खोदलेले आढळले. बहुतेक माळापासून कोट वेगळा करण्यासाठी हे खंदक खोदलेले असावेत पूर्ण फेरी मारून झाली. खंदकात झाडीचे तसेच कचऱ्याचे साम्राज्य वाढलेले आहे. याची स्वच्छता केल्यानंतर आपल्याला या अर्धवट कोटाबाबत कल्पना येऊ शकेल.
पूर्वी या माळावर घोडे बांधण्याची जागा होती असे जाणकार लोक सांगतात. राजापूर येथून सदर घोडे यायचे ते या माळावर थांबत असत, त्यानंतर ते सावंतवाडीला जात असत असे सांगितले जाते.
*सतीश अक्कलकोट यांच्या पुस्तकात या किल्ल्याबदल जी माहिती आपल्याला आढळते ती खालीलप्रमाणे आहे.*
एका नक्कल पत्रात ज्यात तारीख वगैरे नाही. त्यात खारेपाटण व कुडाळच्या मधील नांदगांव येथे किल्ला बांधल्याचा उल्लेख आहे तो असा, खंडोजी नाईक जगताप कोल्हापूरी महाराजांच्या पदरी (?) दफ्तरी शिपाई म्हणून राहिले. त्यांचा मुलगा शेखोजी याने कामगिऱ्या बजावल्या व सरदारकी मिळविली. महाराजांनी त्याला भूदरगड पेट्यात अधिकारी नेमले…हबसी वालीम हा फार जबर होता. राजापूर बंदरात येऊन पुंडावा करून बाईका वगैरे बाटवू लागला. शेखोजीने त्याच्यावर स्वारी करून त्याला पिटाळून लावले. *” महाराजानी त्याला कोकणात नांदगांव मुक्कामी कोट बांधून ठेवले.”* भूदरगडावरील स्वारीत तो मारला गेला. त्याचे थडगे महाराजानी भूदरगडाच्या माचीस, बांधले. शेखोजीचा पुत्र तावजी हा मोठा झाल्यावर सोयरिक सोईवार जमेना म्हणून परदेशी जाण्याचा विचार करू लागला. आंग्रे सरखेल (कान्होजी) कोकणपट्टीत महाराजाकडून अधिकार चालवित होता. त्यांनी… ज्यांनी देवगडचा किल्ला बांधला, त्याची मुलगी येसूबाई ही चांगला मराठा देशस्त हे समजून तावजीस दिली व दोन गांव इनाम दिले. तावजी यानेच वरील पत्र लिहिले असेल.
वरील पत्रातील येसूबाई हा कान्होजी आंग्रे यांची मुलगी नसून कान्होजींचा चुलतभाऊ दत्ताजी आंग्रे यांची मुलगी होती. कान्होजींनी त्याला देवगडची बांधण्याची किंवा दुरूस्तीवर नेमले होते. नांदगावचे स्थान महत्त्वाचे आहे. मात्र नांदगाव इथे कोट असल्याचा उल्लेख अन्यत्र मिळत नाही आणि नांदगांव इथे कोटाचे काहीच खाणाखुणा नाहीत.
सध्या गावातील निश्चित केलेले ठिकाणच नांदगावचा किल्ला अथवा कोट असेल हे खात्रीपूर्वक सांगता येत नसले तरी सदर जागेवरील खंदक, माळ व कोटाचा माळ या वरून याच जागेवर सदर कोट किंवा किल्ला असावा असा प्राथमिक अंदाज वाटतो. तरी या ठिकाणाबाबत संशोधन होणे गरजेचे आहे. सदर ठिकाण बरोबर असेल तर या ठिकाणचे संवर्धन होणे गरजेचे आहे. हा ऐतिहासिक ठेवा आपण पुढच्या पिढीसाठी जतन केला पाहिजे असे वाटते. याभागात आपण गेलात तर या किल्ल्याला नक्की भेट द्या.😊

*🖊️गणेश नाईक*
📱९८६०२५२८२५
🚩दुर्ग मावळा परिवार🚩

प्रतिक्रिया व्यक्त करा