You are currently viewing 10 वी 12 वी अर्जातील नॉन मायनॉरिटी रकाना फक्त माहितीसाठी

10 वी 12 वी अर्जातील नॉन मायनॉरिटी रकाना फक्त माहितीसाठी

सिंधुदुर्गनगरी 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या 10 वी व 12 वी परीक्षांसाठी प्रत्येक विद्यार्थ्यांचे आवेदनपत्र संबंधित माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयामार्फत ऑनलाईन पद्धतीने भरून घेण्यात येतात. सदर आवेदनपत्रामध्ये विविध माहितीचा समावेश आहे. त्यामध्ये मायनॉरिटी रिलीजन हा रकाना सन 2014 पासून समाविष्ट करण्यात आलेला आहे. सदर रकान्यात मुस्लिम, ख्रिश्चन, बुद्धिस्ट, सिख, पारसी, जैन या मायनॉरिटी रिलीजन च्या उपरकान्यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त उर्वरित सर्व घटकांसाठी नॉन मायनॉरिटी हा रकाना सन 2014 पासूनच समाविष्ट करण्यात आला आहे. व तेंव्हापासून याबाबतची प्रत्येक विद्यार्थ्यांची माहिती मंडळाच्या परीक्षा फॉर्ममध्ये शाळा, कनिष्ठ महाविद्यालयामार्फत भरून घेण्यात येत आहे.

            सन 2013 मध्ये मिनिस्ट्री ऑफ मायनॉरिटी अफेअर्स, भारत सरकार यांनी तसेच अल्पसंख्यांक विभाग, महाराष्ट्र शासन यांनी स्पर्धा परीक्षांसाठी अल्पसंख्याक विद्यार्थ्यांचा तपशील मंडळाकडे मागितलेला असल्यामुळे मंडळाच्या परीक्षा समितीच्या दिनांक 7 सप्टेंबर 2013 च्या सभेतील विषय क्रमांक 54 अंतर्गत झालेल्या ठरावान्वये या रकान्यांचा समावेश परीक्षा फॉर्ममध्ये करण्यात आलेला आहे. सदर रकान्यात नमुद केलेले मुस्लिम, ख्रिश्चन, बुद्धिस्ट, शिख, पारसी, जैन हे अल्पसंख्यांक समुदाय महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचननेनुसार मंडळाच्या आवेदनपत्रामधअये घेण्यात आलेले आहेत. या व्यतिरिक्त अन्य विद्यार्थ्यांना सदर रकान्यातील माहिती भरण्यासाठी नॉन – मायनॉरिटी हा रकाना  उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. सदर रकान्यातील माहिती विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका व प्रमाणपत्रावर नमुद करण्यात येत नाही असे सचिव, राज्य मंडळ पुणे हे कळवितात.

प्रतिक्रिया व्यक्त करा

18 − 10 =