You are currently viewing सिकची होस्टेल ! 10 रुपयात राहणे व जेवणे

सिकची होस्टेल ! 10 रुपयात राहणे व जेवणे

अमरावती :

 

अमरावती परिसरातील विविध शिक्षण संस्थांमध्ये राहून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना एक आनंदाची बातमी आहे आणि ती बातमी या गरीब होतकरू अभ्यासू विद्यार्थ्यांना दिलासा देणारी आहे. आज अमरावती शहरात खूप शासकीय वस्तीगृह आणि खाजगी वस्तीगृहे तयार झालेली आहेत. पण अतिशय अल्प दरामध्ये विद्यार्थ्यांची राहण्याची जेवणाची व्यवस्था फार कमी म्हणजे जवळपास नाहीच असे पाहायला मिळते. पण अमरावतीला एक अतिशय चांगला असा ट्रस्ट आहे .सिकची ट्स्ट.. त्या ट्रस्टने या चांगल्या कामासाठी चांगली प्रशस्त जागा व एक अतिशय मोठा धनराशी गरीब होतकरू व अभ्यासू विद्यार्थ्यांच्या वस्तीगृहासाठी व अभ्यासिकेसाठी देण्याचा संकल्प सोडला आहे. या उपक्रमाचे रितसर भूमिपूजन येत्या 4 डिसेंबर रोजी दुपारी चार वाजता कठोरा ह्या अमरावतीच्या भागातील परिसरात होणार आहे. तुम्हाला कदाचित खरं वाटणार नाही. पण अमरावतीमध्ये असे एक होस्टेल होते की ज्या हॉस्टेलमध्ये फक्त दहा रुपयांमध्ये राहण्याची आणि जेवणाची सोय होती .अनेक गरीब विद्यार्थ्यांनी या होस्टेलमध्ये राहून आपले शिक्षण पूर्ण केले. आज ती मुलं मोठ्या मोठ्या पदावर आहेत किंवा निवृत्त झालेली आहेत .अमरावतीला जुन्या शहरांमध्ये परकोटाच्या आत मध्ये साबणपुरा नावाचा भाग आहे .त्या भागामध्ये हे सिकची हॉस्टेल होते. या हॉटेलचे वैशिष्ट्य म्हणजे सिकची चॅरिटेबल ट्रस्टने या होस्टेलची निर्मिती केली होती. जे विद्यार्थी गरीब आहेत. भाड्याने खोली घेऊ शकत नाहीत. खानावळीमध्ये जेवण करू शकत नाहीत. अशा विद्यार्थ्यांसाठी या हॉस्टेलमध्ये फक्त दहा रुपयांमध्ये राहण्याची व जेवणाची व्यवस्था होती .आज तर दहा रुपयांमध्ये फक्त चहा होतो .पण तो काळ वेगळा होता. ग्रामीण भागातून येणाऱ्या मुलांची राहण्याची जेवणाची व्यवस्था नव्हती. आजच्यासारखी समाज कल्याण आदिवासी विभाग इतर मागासवर्गीय वर्ग अशी वस्तीगृह फारशी नव्हती .पण त्या काळात अमरावतीच्या सिकची चॅरिटेबल ट्रस्ट एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आणि लवकरच त्याची अंमलबजावणी पण केली. अमरावती शहरातील वेगवेगळ्या महाविद्यालयामध्ये शिक्षण संस्थांमध्ये जे विद्यार्थी येतात आणि ज्यांची राहण्याची जेवणाची व्यवस्था नाही अशा लोकांसाठी म्हणजे विद्यार्थ्यांसाठी या ट्रस्टने सिकची हॉस्टेल या नावाने एक वसतिगृह प्रारंभ केले. सिकची हॉस्टेलमध्ये शिकलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा एक मेळावा नुकताच अमरावतीच्या मोर्शी रोडवरील वराडे मंगल कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आला होता. संपूर्ण महाराष्ट्रात विखुरलेले सिकची हॉस्टेलचे विद्यार्थी या मेळाव्याला आले होते. या होस्टेलची व हॉस्टेलची संबंधित लोकांची धुरा सांभाळणा-या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन सिकचीयन्स फाउंडेशन नावाची संस्था स्थापन केली. सर्वश्री मनोहर वासनकर बाबाराव वानखडे अनिल मोहोड चंद्रकांत धुरजळ हरिहर बोचरे ज्ञानेश्वर कुर्वे या सर्वांनी पुढाकार घेतला व सगळ्या जुन्या मित्रांचा मेळावा आयोजित केला. योगायोगाने या मेळाव्याला त्यांनी मला पण सत्कारासाठी निमंत्रित केले होते. खरे म्हणजे हे सर्व मित्र माझेच मित्र आहेत. त्यांनी बोलवल्यामुळे मी त्या कार्यक्रमाला गेलो. एक एक स्टेजवर येत होता आणि आपले जुने अनुभव सांगत होता. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध पत्रकार लेखक व या होस्टेलचे माजी विद्यार्थी प्राध्यापक न मा जोशी हे होते. त्यांनी पण आपल्या आठवणी याप्रसंगी सांगितल्या .खरं म्हणजे जुने दिवस हे सोन्यासारखे होते. गरीबीचे दिवस कसे निघून गेले ते कळलेही नाही. यामध्ये राहणाऱ्या सर्व गरीब होतकरू व अभ्यासू विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे अभ्यास केला राहण्याची सोय झाली जेवणाची सोय झाली आणि शिक्षणाची व्यवस्था तर त्या काळात फारशी महागलेली नव्हती. अगदी पाच दहा रुपयात शिक्षण होत होते .आम्ही देखील याच परिस्थितीमध्ये शिकलेलं आहोत. त्या काळात सायकल असणे म्हणजे फार मोठी गोष्ट झाली. प्राध्यापक देखील कॉलेजमध्ये पायी यायचे. प्राचार्य सायकलवर यायचे .पुढे पुढे सुधारणा होत गेल्या आणि आता तर सर्व स्वरूपच पालटले. आता तर विद्यार्थीही मोटरसायकलने बुलेटने कारने यायला लागलेले आहेत. या ट्रस्टने या कामासाठी भरपूर मोठे देणगी दिलेली आहे. खरं म्हणजे त्यांची ही देणगी एवढी मोठी आहे की त्यामध्ये होस्टेल आणि अभ्यासिका सहज तयार होणार आहे. एवढेच नाही तर या ट्रस्ट्रने आपल्या मालकीची दीड एकर जागा तीही अमरावतीच्या पोटे टाऊनशिप समोरील कठोरा गावा लगतची दिली आहे. पण माजी विद्यार्थ्यांनीही आपला खारीचा वाटा उचलला आहे . ट्रस्टच्या या हॉस्टेलमध्ये शिकणाऱ्या पहिल्याच गेट-टुगेदर मध्ये या विद्यार्थ्यांनी जवळपास पाच लाखाचा निधी उभारला आहे. आणि तो उत्तरोत्तर वाढत जाणार आहे. ही एक चांगली सुरुवात झाली आहे, साथी हात बढाना एक अकेला थक जायेगा मिलकर बोज उठाना या न्यायाने हे फाउंडेशन एकत्र आलेले आहे. खरं म्हणजे मी पाहतो खूप मुले गरीबीत शिकले .माझ्या डोळ्यातदेखत काही शिकलीत. ती आज फार उच्च पदस्थ अधिकारी आहेत. परंतु प्रत्येकानेच मागे वळून पाहिले नाही. प्रत्येकाने मागे वळून पाहिले असते आणि येणाऱ्याला मदतीचा हात दिला असता तर या अमरावती शहराचे चित्र आगळे वेगळे असते .असे असले तरी आमच्यासारख्या अनेकांनीही आपला समाज आपला सकारात्मक दृष्टिकोन पुढे ठेवून आम्ही पुढे चालू हा वारसा या न्यायाने काम केलं आहे .रवींद्रनाथ टागोर यांची कविता आहे .त्या कवितेमध्ये ते म्हणतात मावळत्या सूर्याने या जगाला प्रश्न केला माझे एक काम माझ्या नंतर कोण करेल. कोणीही उत्तर दिले नाही. पणती म्हणाली. भगवंत मी माझ्या परीने काम करणार आहे .तसे काम यांनी केलेले आहे आणि मग जीवाभावाचे तळमळीचे माजी विद्यार्थी एकत्र आले तर काय करू शकतात .याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे हे फाउंडेशन आहे आणि म्हणूनच चार तारखेला दुपारी चार वाजता संपन्न होणाऱ्या या भूमिपूजनाला आगळा वेगळा अर्थ लाभणार आहे .नवीन शैक्षणिक पिढीसाठी तयार होणारे हे सिकची होस्टेल विद्यार्थ्यांना वरदान ठरणार आहे यात शंकाच नाही. प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे संचालक डॉक्टर पंजाबराव देशमुख आयएएस अकादमी अमरावती 9890967003

प्रतिक्रिया व्यक्त करा