You are currently viewing शोधपत्रकारितेचे शहेनशहा,आमचे मित्र शेखर सामंत यांचे मनःपूर्वक अभिनंदन…!

शोधपत्रकारितेचे शहेनशहा,आमचे मित्र शेखर सामंत यांचे मनःपूर्वक अभिनंदन…!

आपल्या संपर्कातील, जवळच्या एखाद्या व्यक्तीचं कौतुक झाल, एखादी नवीन जबाबदारी मिळाल्याची बातमी समजली की जणू आपलचं कौतुक झाल्याचा आनंद होतो. या दोन दिवसात माझ्यासाठी मनाला आनंद देणाऱ्या दोन महत्त्वाच्या आणि आनंदाच्या घटना घडल्या. कदाचित बाप्पाचाच हा प्रसाद असावा. परवाचं भाटिया सर यांनी महाराष्ट्राच्या राज्यपालांकडून राज्याचे उपलोकायुक्त म्हणून शपथ घेतली. योग्य जागेवर अत्यंत योग्य अधिकाऱ्याची निवड.

आज दुसरी आनंदाची बातमी समजली. माझे कौटुंबिक आणि सामाजिक जीवनातील मित्र शेखर सामंत याची दै.तरुण भारतच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आवृत्ती प्रमुखपदी अभिनंदनीय आणि रास्त निवड. शेखरचे पत्रकार म्हणून पैलू लाखो वाचकांनी तरुण भारतच्या माध्यमातून अनुभवलेत…पण मी अनुभवलाय एक संवेदनशील आणि जीवाला जीव देणारा मित्र. अनेक कौटुंबिक गप्पामध्ये आणि कार्यक्रमात शेखरची उपस्थिती म्हणजे एक अभूतपूर्व मेजवानी. जिल्ह्यात आणि जिल्ह्याबाहेरील जोडलेल्या अनेक कुटुंबाशी धावपळीच्या काळातही शेखरचे संबध तेवढेच प्रेमाचे आणि जिव्हाळ्याचे आहेत. आपल्या मैत्रीचा किंवा ओळखीचा वापर स्वतःसाठी वा स्वतःच्या कुटुंबासाठी करायचा नाही ही आमच्या मित्राची संहिता त्यांनी कटाक्षाने पाळलेली आहे.

आपल्याला मिळालेल्या संधीचा उपयोग आपण दुर्लक्षित घटकांसाठी केला पाहिजे.. नव्हे तेच आपल्या आयुष्याचे ध्येय आणि प्राथमिकता असली पाहिजे यासाठी गेली काही वर्षे ते दै.तरुण भारतमध्ये लिहीत आहेत. चांगल काम करणाऱ्याचे कौतुक आणि समाजव्यवस्थेला बाधा आणणारे काम करणाऱ्यावर प्रहार ही शेखरच्या पत्रकारितेची खासियत. मित्रानेही एखादी चुकीची गोष्ट केली तरी त्याचे कधीच समर्थन करायचे नाही. ही गोष्ट त्याने प्रकर्षाने जपली. या जिल्ह्यातील कातकरी बांधव असूद्या, मायनिंगचे दलाल असो, शासन स्तरावरील भ्रष्टाचार असो, कोरोना काळात सामाजिक संस्थाचा समन्वय असो जनतेसमोर पुराव्यानिशी वास्तव मांडून समाजाचे प्रबोधन करण्याच काम अतिशय प्रामाणिक करत आहे. माजी केंद्रीय मंत्री आदरणीय प्रभूसाहेब शेखरच्या पत्रकारितेबद्दल आत्मीयतेने भरभरपूर बोलतात. साहेब जेव्हा जेव्हा फोन करतात तेव्हा आवर्जून शेखरची चौकशी करतात.

शेखर जसा पत्रकार म्हणून भावला, एक मित्र आणि कौटुंबिक स्नेही म्हणून भावला त्यापेक्षा तो आमचा वर्गमित्र म्हणून अधिकच भावला. २०११/१३ मध्ये आम्ही चाळीसजण M.S.W.ला होतो. मुळातच शेखर, मोहन होडावडेकर, शशांक मराठे, ओकांर तुळसुलकर, श्रीमती वंदना करंबेळकर, डॉ. अरविंद कुडतरकर, डॉ. आनंद तेडुलकर असे सामाजिक भान असणारे आम्ही सगळे मित्र..आणि समाजसेवेची पदवी घ्यायला निघालेले विद्यार्थी. या दोन वर्षात अनेक सामाजिक संस्थाना/ प्रकल्पाना अभ्यास दौऱ्यासाठी भेट द्यायचो. या सगळ्या प्रवासात त्या वयातही आम्ही जणू अगदी बारावी पास होवून काँलेजच्या पहिल्या वर्षात प्रवेश घेतलेले काँलेजकुमार असल्याचं वातावरण होत. आणि या वातावरणाचा केद्रबिंदू अर्थात शेखर. डॉ. जी.ए.बुवा, प्रा.माया रहाटे, प्रा.राजश्री सामंत, प्रा.निर्मळे, प्रा.शिथ्रे अशा आम्हाला शिकवणाऱ्या गुरूजन वर्गाचा आपण आदर केला पाहिजे याची जाणीव शेखर सतत सगळ्याना करून देत असे. बाहेर आपण पत्रकार असलो तरी इथ आपण विद्यार्थी आहोत या भावनेतून त्यांच वर्तन होत. त्या दोन वर्षात शेखरचे अनेकांना अनेक पैलू समजले. शेखर आपल्या शालेय व महाविद्यालयीन जीवनात एक उत्कृष्ट खेळाडू होता. शिक्षण पूर्ण झाल्यावर अनेक होतकरू खेळाडूना तो मार्गदर्शन करायचा..आणि आर्थिक मदतही. त्यांने कधीच कुणाकडे स्वतःसाठी हात पसरले नाहीत. पण एखाद्या विद्यार्थ्यांची फी असेल, एखाद्याला वैद्यकीय मदत हवी असेल तर अशावेळी कुणाकडे अपेक्षा व्यक्त करताना मुळीच संकोच करत नाही. एक मित्र म्हणून अनेकदा अनेक कार्यक्रमात आम्ही एकत्र असतो तेव्हा त्याची उपस्थिती ही निदान माझ्यासाठी तरी एक उर्जा असते.

एखाद्या मित्राचे अनुकरण करायचे झाले.. तर मनुष्य स्वभाव म्हटला की दोन्ही बाजू असतात…चांगली आणि वाईट…पण मी भाग्यवान आहे की शेखरच्या चांगल्या गोष्टी़च अनुकरण करावं तेवढ थोडं..इतके अनुकरणीय पैलू या आमच्या मित्राकडे आहेत.

दै.तरुण भारतचे सर्वेसर्वा किरण ठाकूर आणि व्यवस्थापनाने आमच्या या मित्राची सुयोग्य निवड केली… नव्हे पत्रकारितेचं आजच्या प्रतिकुल परिस्थितीतही पावित्र्य राखणाऱ्या एका प्रामाणिक, सडेतोड पत्रकाराला संधी दिली. शेखरचा एक मित्र म्हणून याची मला पूर्ण खात्री आहे की लोकशाहीच्या या चौथ्या स्तभांचा पहारेकरी म्हणून भविष्यातही तो देदिप्यमान कार्य करेल…

शोधपत्रकारितेच्या या शहेनशहा मित्राचे अटल व स्नेहप्रिया परिवारांकडून मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा!

…अँड.नकुल पार्सेकर..
सावंतवाडी.

प्रतिक्रिया व्यक्त करा