You are currently viewing पुस्तके हीच महान व्यक्तींची संपत्ती – युवराज कदम 

पुस्तके हीच महान व्यक्तींची संपत्ती – युवराज कदम 

इचलकरंजी : प्रतिनिधी

 

विद्यार्थ्यांनी उत्तमोत्तम वाचन करून पुस्तकांशी मैत्री करावी. वाचनातून घडलेल्या कर्तृत्ववान व्यक्तींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा व महान व्यक्तींचे चरित्र वाचून चारित्र्यसंपन्न व्हावे आणि देशाच्या विकासात योगदान द्यावे, असे मौलिक मार्गदर्शन कोल्हापूरच्या वाचनकट्टा संस्थेचे अध्यक्ष युवराज कदम यांनी केले.

माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अर्थात जन्मदिवस वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून सरस्वती हायस्कूलमध्ये डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख पाहुणे युवराज कदम यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ग्रंथांना फुले वाहून कार्यक्रमाचा उद्घाटन शुभारंभ करण्यात आला. यावेळी युवराज कदम यांनी विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद साधताना वाचनाचा छंद जोपासून विविध क्षेत्रातल्या संधी ओळखून आपले भविष्य घडवावे, असे सांगितले.

यावेळी शर्वरी होगाडे, अनिस माणगावे, श्लोक दळवी या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुस्तके भेट देऊन गौरवण्यात आले. प्रास्ताविकात पी.डी.शिंदे यांनी वाचन कट्टा उपक्रमाचा उद्देश सांगून विद्यार्थ्यांनी वाचनातून ज्ञानसमृद्ध व्हावे, असे मौलिक मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय मराठी विभागप्रमुख पी.एस. खबाले यांनी केला. कवयित्री सौ. स्वाती भाटे यांनी ‘मी पुस्तक बोलतोय’ ही स्वरचित कविता सादर केली. उत्कर्ष शेंडगे या विद्यार्थ्याने वाचनाचे महत्त्व या विषयावर भाषण केले.

या कार्यक्रमास पर्यवेक्षक सौ. आर. एन. जाधव, पी. जी. हजगुळकर, मालती माने विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय रेंदाळकर, जिमखाना विभाग प्रमुख ए.व्ही.मोरे, कार्यवाह महावीर कांबळे यांच्यासह सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी – विद्यार्थिनी उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस. व्ही. बसागरे व जितेंद्र कुलकर्णी यांनी केले. आभार प्रदर्शन अनुराधा काळे यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

sixteen + ten =