You are currently viewing चक्रीवादळ’ विषयावर रंगीत तालीम…

चक्रीवादळ’ विषयावर रंगीत तालीम…

‘चक्रीवादळ’ विषयावर रंगीत तालीम…

नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वासन न ठेवण्याचे आवाहन:7 व 9 नोव्हेंबर रोजी आयोजन…

सिंधुदुर्गनगरी

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, नवी दिल्ली आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, महाराष्ट्र शासन यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यात दिनांक ७ व ९ नोव्हेंबर २०२३ रोजी ‘चक्रीवादळ’ या विषयावर रंगीत तालीमीचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी दिले आहे.
रंगीत तालीम कार्यक्रमात दिनांक ०७ नोव्हेंबर २०२३ रोजी Table Top Exercise हा कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमात जिल्ह्यातील सर्व यंत्रणा सहभागी होणार आहेत. हा कार्यक्रम व्ही. सी. द्वारे घेतला जाणार असून या कार्यक्रमात चक्रीवादळ या आपत्तीच्या अनुषंगाने विविध घटना, प्रसंग उद्भवल्यास त्याला जिल्ह्यातील यंत्रणा कशा रीतीने प्रतिसाद देणार आहे. याची माहिती विविध जिल्हास्तरीय यंत्रणांकडून राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, नवी दिल्ली घेणार आहे. हा कार्यक्रम जिल्हधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे होणार असून या Table Top Exercise साठी महसूल, ग्राम विकास, पोलीस, महावितरण, प्रादेशिक बंदर अधिकारी, मत्स्यव्यवसाय हे विभाग व जिल्ह्यातील इतर महत्त्वपूर्ण विभाग सहभागी होणार आहेत.
दिनांक ९ नोव्हेंबर २०२३ रोजी जिल्ह्यात ‘चक्रीवादळ’ या आपत्तीच्या अनुषंगाने प्रत्यक्ष क्षेत्रीय स्तरावर रंगीत तालीमीचे आयोजन केले जाणार आहे. याकरीता मालवण तालुक्यातील कोळंब, वेंगुर्ला तालुक्यातील उभादांडा व देवगड तालुक्यातील देवगड या गावांची निवड करण्यात आलेली आहे. रंगीत तालीमीत किनारी तालुक्यातून निवडल्या गेलेल्या गावातील लोकांना स्थलांतरित केले जाणार असून त्यांना सुरक्षित आश्रय स्थानाच्या ठिकाणी ठेवले जाणार आहे. यासाठी मालवण, देवगड व वेंगुर्ला तालुक्यात सुरक्षित निवारा गृहे देखील निश्चित करण्यात आलेली आहेत. या रंगीत तालीमीत मालवण, देवगड व वेंगुला या तालुक्यातील सर्व यंत्रणा सहभागी होणार आहेत. राज्य आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाकडून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि जिल्ह्याकडून तालुका आपत्ती व्यवस्थापन कक्ष यांना स्थलांतराच्या सूचना मिळाल्यावर निवडलेल्या गावातील नागरिकांना सुरक्षित आश्रय स्थानांच्या ठिकाणी स्थलांतरित केले जाणार आहे. मत्स्यव्यवसाय विभाग व प्रादेशिक बंदर अधिकारी कार्यालय यांच्यामार्फत समुद्राच्या ठिकाणी देखील अशाप्रकारे “चक्रीवादळ’ कालावधीत निर्माण झालेल्या परिस्थितीच्या अनुषंगाने काही शोध व सुटका प्रात्याक्षिके केली जाणार आहेत. या रंगीत तालीमीत भारतीय तटरक्षक दल, नेव्ही, NDRF यांची पथके देखील सहभागी होणार आहेत. संपूर्ण कोकण विभागासाठी हा रंगीत तालीमीचा कार्यक्रम घेतला जाणार आहे.

तरी या सर्व पार्श्वभूमीवर नागरिकांना कळविण्यात येते की, जिल्ह्यात दिनांक ०७ व ०९ नोव्हेंबर रोजी ‘चक्रीवादळ’ या विषयावर रंगीत तालीम होणार असून, चक्रीवादळ आल्यास त्याला संबंधित यंत्रणा कशाप्रकारे प्रतिसाद देतात याची राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्याकडून चाचपणी केली जाणार आहे. या कालावधीत कोणतेही चक्रीवादळ जिल्ह्यात येण्याची सद्यस्थितीत शक्यता नाही. केवळ चक्रीवादळ आल्यास त्या अनुषंगाने प्रशाकीय यंत्रणांच्या तयारीची माहिती घेणे हा याचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे नागरिकांनी चक्रीवादळ अनुषंगाने कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. या अनुषंगाने काही माहिती आवश्यक असल्यास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग च्या (०२३६२)२२८८४७ आणि जिल्हा पोलीस नियंत्रण कक्ष (०२३६२) २२८६१४ या क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्यामार्फत करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा