You are currently viewing कुडाळ येथील जिव्हाळा आश्रमात सन्मान स्त्री शक्तीचा हा आगळावेगळा उपक्रम संपन्न.

कुडाळ येथील जिव्हाळा आश्रमात सन्मान स्त्री शक्तीचा हा आगळावेगळा उपक्रम संपन्न.

कुडाळ
नवरात्रोत्सव हा आदिशक्तीची आराधना करण्यासाठी दरवर्षी साजरा केला जातो. नवदुर्गांचा महिमा अगाध आहे. सामान्य जनतेमधील नवदुर्गांचा शोध घेण्यासाठी यावर्षी ‘श्रीरंग चॅरिटेबल ट्रस्ट’ आणि टाटा पॉवरच्या सहेली ग्रुप कडून तसेच ‘फ्रेम मी मीडिया’ आणि व्हर्चुअल व्हेलॉसिटी सॉफ्टवेअर सोल्युशन यांच्या सहकार्याने, कलादिग्दर्शक सुमित पाटील यांच्या संकल्पनेतून सन्मान स्त्री शक्तीचा हा एक आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला होता. ह्या उपक्रम ज्या महिलांच्या जीवनावर चित्रित करण्यात आला होता त्या महिलांचा सत्कार कुडाळ येथील जिव्हाळा आश्रमात करण्यात प्रतिमा नाटेकर, वैद्य सुविनय दामले, आणि चित्रकार सुनील नांदोस्कर यांच्या हस्ते करण्यात आला.

या उपक्रमात प्रामुख्याने महिला सक्षमीकरण, सबलीकरण या विषयावरती भर देऊन काम करण्यात आले आहे. स्त्रियांना देवी मानल्या जाणाऱ्या आपल्या समाजातील स्त्रिया आणि त्या करत असलेल्या त्यांच्या ‘कामाचा गौरव’ आणि त्यांच्या ‘कर्तुत्वाचा जागर’ या मालिकेत करण्यात आला आहे. नवरात्री विशेष नऊ स्त्रियांचे कार्य व्हिडीओ स्वरुपात,नऊ वेगवेगळ्या भागात दाखवले आहे. यात संगीत शिक्षिका योगिता तांबे या निसर्गातून होणारा नाद आणि त्यांला पारंपरिक संगीताची जोड देत आपली कला सादर करीत आहे. विशेष म्हणजे त्या ७० हून अधिक पारंपरिक वाद्य वाजवतात. गड-किल्ले सर करणाऱ्या सुवर्णा वायंगणकर गड-किल्ले संवर्धनासाठी नववारी साडी नेसून वेगवेगळे किल्ले सर करीत आपली संस्कृती सुद्धा जपत आहेत. माया शृंगारे या आपल्या शेतात रानभाज्या जगवतात आणि त्यांचे संवर्धन करतात. गावातील लोकांना औषधी संजीवनीरुपी रानभाज्या मोफत देतात. सामाजिक बांधिलकीची जाण असणाऱ्या आणि एक स्त्री असून दशक्रिया विधी करणाऱ्या श्रद्धा कदम या समाजसेवेचे कार्य करीत आहेत. निसर्ग हाच आपला कॅनव्हास समजून निसर्गातून उपलब्ध झालेल्या साधनांचा वापर करून विविध कलाकृती तयार करणाऱ्या ‘ऋतिका पालकर’ या निसर्गाला देव मानून आपली कला सादर करतात. आपल्या रुचकर हाताने भुकेलेल्यांची भूक भागवणाऱ्या नानी, म्हणजे ‘इंद्रायणी गावडे’ वय वर्षे ८४ असणाऱ्या नानीं ‘अन्नपूर्णा’ म्हणून ओळखल्या जातात. महाराष्ट्रातील फुगडी हा खेळ मनोरंजन आणि शारीरिक जडण-घडणीसाठी खेळल्या जाणाऱ्या आणि त्यातून आपली संस्कृती आणि परंपरा जपणार्‍या ‘आरती परब’.आपल्या आयुष्याची कळ सोसत प्रेक्षकांना आदिवासी कला प्रकार ‘कळसुत्री’ आणि ‘चित्रकथी’ रूपातील बाहुल्यांचे खेळ करून मनोरंजन, समाज प्रबोधन आणि आपल्या ‘ठाकर’ वारसा जपणार्‍या ‘तनुश्री गंगावणे’. त्याचप्रमाणे आपल्या प्रेमाचा जिव्हाळा कायम ठेवत वृद्धाश्रम चालवणाऱ्या आणि ‘मानव सेवा हीच ईश्वर सेवा’ हेच मूल्य अंगी बाळगून जगणाऱ्या ‘श्रेया बिर्जे’.आपआपल्या क्षेत्रात अभिमानास्पद कामगिरी करणाऱ्या या नऊ रणरागिणीच्या कार्याला वेगळ्या नजरेने बघत, त्यांच्या कर्तृत्वाचा जागर करण्यासाठी ही सिरीज तयार करण्यात आली होती, त्याचे दिग्दर्शन ‘सुमीत पाटील’ व ‘किशोर नाईक’ यांनी केले आहे. छायाचित्रण व संकलन मिलिंद आडेलकर, आरती कादवडकर, मकरंद नाईक, संकेत जाधव, यांनी सांभाळले आहे.लेखन वेद दळवी, कृष्णा कोरगावकर यांनी केले,ह्या कार्यात विशेष सहकार्य संकेत कुडाळकर, साक्षी खाड्ये,धीरज कादवडकर,मंगल राणे,अभिषेक तेंडुलकर,भरत शिंदे यांनी केले आहे यातील विशेष बाब म्हणजे या सगळ्या स्त्रियांना मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रींनी आपला आवाज दिला आहे. त्यात दीप्ती भागवत, स्पृहा जोशी, तन्वी पालव, ऋतुजा बागवे, सुरुची आडारकर, नयना आपटे, अश्विनी कासार, विमल म्हात्रे, चिन्मयी राघवन यांचा समावेश होता. या संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन निलेश गुरव यांनी केले तर आभार सुमित पाटील यांनी मानले,ह्या मालिकेचे सर्व भाग जगभर प्रसारित झाले असून ते ५१ लाख पेक्षा जास्ती लोकांपर्यंत पोचले आहेत. जर आपण अजूनही ते पाहिले नसतील तर श्रीरंगच्या युट्यूब चॅनेल वर मराठीतून आणि टाटा पॉवरच्या फेसबुक पेज वर इंग्रजीतुन बघू शकता.पहिल्यांदाच अश्या प्रकारचा उपक्रम हा मराठी सोबतच इंग्रजी भाषेतही प्रदर्शित झालाय . त्यामुळे महाराष्ट्रातील असामान्य, सबल स्त्रियांबद्दल माहिती पूर्ण जगापर्यंत पोहोचेल असे आशा आयोजकांची आहे. या कार्यक्रमावेळी आयुर्वेदाचार्य आणि आहारतज्ञ डॉ सुविनय दामले, जिव्हाळा आश्रम चे सर्वेसर्वां सुरेश बिर्जे, महिला अत्याचार निवारण कक्ष SP ऑफिसर डॉ प्रतीमा नाटेकर, चित्रकार सुनील नांदोस्कर, फ्रेम मि मीडिया अध्यक्ष भरत शिंदे, लोककलाकार गंगावणे आदि मान्यवर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा