You are currently viewing शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने शेतकरी संघटनांच्या 8 डिसेंबरच्या भारत बंदला पाठिंबा द्यावा!

शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने शेतकरी संघटनांच्या 8 डिसेंबरच्या भारत बंदला पाठिंबा द्यावा!

किसान सभेचे आवाहन

केंद्र सरकारच्या कॉर्पोरेट धार्जिण्या व शेतकरी विरोधी धोरणांच्या विरोधात सुरू असलेला संघर्ष आता निर्णायक वळण घेत आहे. दिल्ली येथे संपन्न झालेल्या शेतकरी संघटनांच्या बैठकीत शेतकरी आंदोलन आणखी तीव्र करण्यासाठी 8 डिसेंबर रोजी भारत बंद ची हाक देण्यात आली आहे. देशातील 500 हून अधिक शेतकरी संघटनांच्या संयुक्त किसान मोर्चाने भारत बंदमध्ये शेतकऱ्यांवर प्रेम करणाऱ्या सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे.

महाराष्ट्रात समविचारी शेतकरी संघटना तसेच कामगार, शेतमजूर, विद्यार्थी, युवक, महिला व समाजसेवी संघटनांचा समन्वय करून महाराष्ट्रात भारत बंदच्या दिवशी महाराष्ट्र बंद यशस्वी करण्यासाठी किसान सभेने प्रयत्न सुरू केले आहेत.

महाराष्ट्रातील भाजप सोडून उर्वरित सर्वच राजकीय पक्षांनी भारत बंदच्या दिवशी महाराष्ट्र बंद व्हावा यासाठी शेतकऱ्यांना समर्थन द्यावे व बंद यशस्वी करण्यासाठी सक्रियपणे आंदोलनात उतरावे असे आवाहन किसान सभा करत आहे. विशेषतः शिवसेना, राष्ट्रवादी काँगेस व काँग्रेस या सत्ताधारी पक्षांनी शेतकऱ्यांच्या या बंदला समर्थन द्यावे असे आवाहन किसान सभा करत आहे.

देशभरातील विविध राज्यांमध्ये सत्तेवर असलेल्या भाजप विरहित पक्षांनी त्या त्या राज्यांमध्ये भारत बंदला सक्रिय पाठिंबा देत शेतकऱ्यांची ठाम बाजू घेतली आहे. महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षांनीही भारत बंदच्या दिवशी होणाऱ्या महाराष्ट्र बंद मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन किसान सभा करत आहे.

केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांना रोखण्यासाठी सुरू असलेल्या दिल्ली येथील अन्नदाता शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातील जनतेने भारत बंदच्या दिवशी महाराष्ट्र बंद ठेवून शेतकरी आंदोलनाचे समर्थन करावे असे आवाहन किसान सभा करत आहे.

डॉ. अशोक ढवळे
जे.पी.गावीत
किसन गुजर
अर्जुन आडे
उमेश देशमुख
डॉ. अजित नवले

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × three =