You are currently viewing सुप्रसिद्ध अभिनेत्री सौ. दीपा परब – चौधरी राज्यस्तरीय कोकणरत्न पुरस्काराने सन्मानित

सुप्रसिद्ध अभिनेत्री सौ. दीपा परब – चौधरी राज्यस्तरीय कोकणरत्न पुरस्काराने सन्मानित

मुंबई :

 

हिंदी व मराठी सिनेमा आणि मालिकांमध्ये आपल्या अभिनयाने वेगळी ओळख निर्माण केलेला व ‘बाईपण भारी देवा’ या सुपरहिट चित्रपटात प्रमुख भूमिका साकारून मराठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या सुप्रसिद्ध अभिनेत्री सौ. दीपा परब – चौधरी यांना कोकण संस्थेच्या १२ व्या वर्धापन दिनानीमित्त मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात राज्यस्तरीय कोकण रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याचबरोबर आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल डॉ.अमेय देसाई यांनाही राज्यस्तरीय कोकण रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.

दादर येथे आज पार पडलेल्या या कार्यक्रमात डिजिटल सोशल चेंज मेकर म्हणजेच टॉप १२ रीलस्टारना रील टू रिअल या पुरस्काराने सौ. दीपा परब यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले यात सई उतेकर, तन्मय पाटेकर, बिनधास्त गर्ल गौरी पवार, रोशन पुजारी, किरण पास्ते, सायली इंदुलकर, साहिल दळवी, प्रथमेश कदम, अमित कुबडे, निखिल सकपाळ, अनमोल यादव, अंकिता प्रभू वालावलकर यांचा सत्कार करण्यात आला.

शून्यातून विश्व निर्माण करण्यासाठी आणि आपले ध्येय गाठण्यासाठी कार्यरत असणाऱ्या महिलांचा झिरो टू हिरो या पुरस्काराने डॉ. अमेय देसाई यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यामध्ये पुणे मावळ विभागातील ग्रामसेविका सौ. प्रतिभा विठ्ठल कुंभार,तर ठाणे ग्रामीण आणि आदिवासी विभाग शहापूरच्या सौ तारा सांगळे आणि श्रीमती पूजा कंठे, तर पालघर वाडाच्या सौ. रोशना निलेश पाटील आणि मानसी मनोज पानवे भिवंडी यांचा समावेश होता.

कोकण संस्था गेली १२ वर्षे शिक्षण, आरोग्य, ग्रामीण विकास, अनाथ मुलांसाठी वसतिगृह आणि महिला सक्षमीकरण यासारख्या विविध क्षेत्रांच्या विकासासाठी काम करत आहे. या कार्यक्रमात संस्थेच्या ग्रामीण भागातील भागधारकांनी मंगळागौर या सांस्कृतिक नृत्य सादर करून लोकांकडून वाहवा मिळवली आणि प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.

दीपा परब यांनी सन्मान स्वीकारल्यावर मालवणीतून आपल्या संबोधनाला सुरुवात केली व म्हणाल्या की माझे वडील असते तर त्यांना आज खूप आनंद झाला असता. कारण एका सामाजिक संस्थेने माझा आज गौरव केला आहे. आम्ही कलाकार आहोत आम्हाला कामाचे मानधन मिळते. पण गरजूंसाठी अविरत मोफत काम करणाऱ्या कोकण संस्थेचे मला खूप कौतुक वाटते, हे काम कठीण तर आहेच पण कोकण संस्था समाजासाठी करत असलेले काम खरोखर खूप प्रशंसनीय व प्रेरणादायी आहे.

काशिनाथ धुरू हॉलमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमात प्रमुख अतिथी सौ. गीताली पवार, श्रीमती अमृता माने, संदीप सिंग, विशाल महांगरे, संस्था व्यवस्थापक साक्षी पोटे, प्रीती पांगे, सुरज कदम सह शेकडो सांस्थेचे कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन ऍक्टर अक्षय ओवळे तर आभार संस्थाध्यक्ष दयानंद कुबल यांनी मांडले.

प्रतिक्रिया व्यक्त करा