You are currently viewing मराठी माणसाचा जगात डंका

मराठी माणसाचा जगात डंका

सोलापूर जि. प.चे प्राथमिक शिक्षक रणजित डिसलेंना सात कोटी रुपयांचा “ग्लोबल टीचर” पुरस्कार जाहीर

युनेस्को व लंडन स्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा “ग्लोबल टीचर ऍवॉर्ड’ आज जाहीर झाला असून, त्यासाठी सोलापूर जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षक रणजित डिसले यांची निवड झाली आहे. विशेष म्हणजे सदर पुरस्काराचा मान प्रथमच भारत देशाला मिळाला आहे.

परितेवाडी (ता. माढा) येथील अतिग्रामीण भागातील श्री. डिसले यांना हा तब्बल सात कोटी रुपयांचा पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा अक्षरशः वर्षाव होत आहे.

लंडनमधील “नॅचरल हिस्ट्री म्युझियम’मध्ये झालेल्या समारंभात सुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय अभिनेते स्टीफन फ्राय यांनी पुरस्काराची अधिकृत घोषणा केली.

असा पुरस्कार मिळवणारे डिसले हे पहिलेच भारतीय शिक्षक असून, ते सोलापूर जिल्ह्यातील आहेत. साहजिकच देशाच्या शैक्षणिक क्षेत्रात आज महाराष्ट्र राज्य आणि सोलापूर जिल्ह्याचे नाव झळकले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जगभरातील 140 देशांतील 12 हजारहून अधिक शिक्षकांच्या नामांकनातून अंतिम विजेता म्हणून डिसले गुरुजींची घोषणा करण्यात आली आहे. त्यांनी विकसित केलेल्या क्‍यूआर कोड पद्धतीचा प्रथम महाराष्ट्र शासनाने पाठयपुस्तकांमध्ये वापर चालू केला. त्यानंतर त्याची देशपातळीवर दखल घेऊन संपूर्ण भारतातील शालेय पुस्तकात त्यांच्या क्‍यूआर कोड पद्धतीचा वापर चालू झाला. हा शैक्षणिक क्षेत्रातील खूप मोठा क्रांतिकारक बदल समजला जातो. आता त्यांच्या याच क्‍यूआर कोड पद्धतीची जागतिक पातळीवरून दखल घेण्यात आली आहे.

सदर पुरस्कारासाठी 140 देशांतील बारा हजारहून अधिक शिक्षकांमधून प्रथम तीस शिक्षकांची आणि नंतर अंतिम दहा शिक्षकांची निवड करण्यात आली होती. त्या निवडलेल्या दहा शिक्षकांमधून अंतिम निवड म्हणून रणजित डिसले यांचे नाव आज जाहीर करण्यात आले आहे.

आणखी एक आदर्श
आज रणजित डिसले यांना सात कोटी रुपयांचा ग्लोबल पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्यांनी लगेच एकूण रकमेपैकी 50 टक्के रक्कम अंतिम फेरीतील 9 शिक्षकांना देण्याचे जाहीर करून आंतरराष्ट्रीय पातळीवर एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.

याबाबत रणजित डिसले म्हणाले, आज पुरस्काराची घोषणा झल्यानंतर खूप आनंद होत आहे. मला पुरस्काराच्या रूपाने मिळणाऱ्या एकूण रकमेपैकी निम्मी रक्कम मी अंतिम फेरीत निवड झालेल्या माझ्या नऊ सहकाऱ्यांना देणार आहे. त्यामुळे ते प्रतिनिधित्व करत असलेल्या नऊ देशांतील हजारो मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यास मदत होईल. शिवाय मला मिळालेली रक्कमही मी टीचर इनोव्हेशन फंडकरिता वापरणार असून त्यामुळे शिक्षकांमधील नवोपक्रमशीलतेला चालना मिळण्यास मदत होईल.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × 4 =