You are currently viewing भुतांखेतांच्या गोष्टी

भुतांखेतांच्या गोष्टी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा.सदस्य तथा संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे लेखक कवी माधव उर्फ वि. ग. सातपुते लिखित अप्रतिम कथा*

 

*भुतांखेतांच्या गोष्टी*

 

*( भाग १७ वा )*

 

एकदा आम्ही सर्व कुटुंबीय देवदर्शनासाठी मोठी शॉरलेट स्टेशनवॅगन गाडी घेवून निघालो होतो. गाडीत 16 /17 जण होतो .( ही गोष्ट साधारण 1966 ची असावी.) गाडीचे मालक ड्रायव्हर न देता स्वतःच बरोबर आले होते. त्यांचा पुतण्याच माझा मित्र असल्यामुळे त्यांचा आमच्या कुटुंबाचा अगदी घरचा संबंध होता. साताऱ्यातून निघून आम्ही त्रिपुटी , गोंदवले , शनिशिंगणापूर , पंढरपूर , तुळजापूर , अक्कलकोट , गाणगापूर , हुमणाबाद असा प्रवास करून पुन्हा सातारला परतणे अशी ती ट्रीप होती. प्रवास मोठा होता. गाडीचे मालक स्वतः प्राणशेठच बरोबर असल्यामुळे गाडी एकदम ओके चेक करून घेतली होती. त्यावेळी पेट्रोल/ डिझेल पंप फार थोडे होते म्हणून गाडीचा पेट्रोल टॅंक जरी फुल केला असला तरी जिथे पेट्रोल पंप दिसेल तेथे मुद्दाम प्राणशेठ पुन्हा टाकी फुल करीत असतच , शिवाय गाडीत 10 लिटरचे 2 कँन हे काळजी म्हणून भरून ठेवलेले असत. प्रवास एकदम सुखरूप चालला होता. ठरल्याप्रमाणे देवदर्शन करीत आम्ही रात्री पंढरपूरला गेलो तिथे मुक्काम केला. नंतर पंढरपूरहुन तुळजापूरचे दर्शन करून अक्कलकोटला दर्शन घेतले आणि म्हटले आता गाणगापूरला जावुया. गेलो तिथेही उत्तम दर्शन झाले. दिवस मावळला होता तिन्हीसांजेची सर्वांनी गाणगापूरला आरतीही केली . आता इथून पुढे हुमणाबादला माणिकप्रभू महाराजांच्या दर्शनाला जायचे कां इथेच आज रात्री गाणगापूरला मुक्काम करायचा असा विचार चालू होता. आज सकाळपासून खुपच प्रवास झाला होता तेंव्हा प्रथम प्राणशेठनां विचारले कारण ते एकटेच ड्रायव्हिंग करणारे होते. कारण गाणगापूर ते हुमणाबाद हे अंतर 100 किलोमीटर होते. ( त्यावेळचे रस्ते म्हणजे सिंगल रोड प्रचंड खड्डे ) प्राणशेठ म्हणाले जावूया काही हरकत नाही. आम्ही सर्वांनी जेवण केले आणि रात्री 9 ला निघालो देखील…..

सुन्न रस्ता चिटपाखरू देखील नाही प्राणशेठ गाडी चालवत आहेत त्यांच्या शेजारी आमचे आण्णाकाका अन माझे वडील दादा बसलेत गाडी चालली आहे. 4 तास झाली तरी हुमणाबाद आले नाही. गाडीतले डिझेल संपले . प्राणशेठनी बॅटरीच्या उजेडात गाडी चेक केली कारण गाडी तर वेगाने पळते आहे आणि अजून 100 किलो मीटर सुदधा गाडी गेली नाही तर आश्चर्य आहे डिझेल संपले कसे. पुनः गाडीत डिझेल टाकले प्रवास सुरु केला , गाडी फक्त पळते आहे. पण हुमणाबाद येईना , पहाट झाली 5 वाजले. आणि मग हुमणाबादची वेस दिसली. तेंव्हा प्राणशेठ म्हणाले *ऐसा हो ही नही सकता गाडी तो 70* *किलोमीटर स्पीडसे 8 घंटा चली है।* *पुरा डिझेल टाकी खाली हो गया है ।*

*मै 25 बरस ड्रायव्हींग दिनरात कर रहां हुं।*

*100 % यहां कुछ तो गडबड हैं ।*

आम्ही सर्व संस्थानच्या धर्मशाळेत गेलो. सर्वांनी आंघोळी केल्या माणिकप्रभु महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यावेळी गादीवर असलेल्या महाराजांचे प्रत्यक्षात दर्शन घेतले. त्यांच्याशी बोलणे झाले तेंव्हा हा रात्री घडलेला सर्व प्रकार सांगितला तेंव्हा ते म्हणाले तुम्ही रात्री अवेळी आलात. रात्री तुम्ही 12 नंतर जो प्रवास केला आहे त्या प्रवासात तुम्ही *चकव्यात* अडकला होतात म्हणून तुमची गाडी फक्त एकाच जागी फिरत राहिली. *अपरात्रीच्या चकव्याची वेळ संपल्यावर तुम्ही पहाटे इथे पोहचला आहात..* अपरात्री प्रवास करत जावू नका..

दर्शन झाले , मंदिरात अभिषेक झाला , प्रसादाचे जेवण झाले. पण काल रात्रीच्या प्रकारामुळे आणि प्राणशेठ देखील दमल्यामुळे शेवटी आज हुमणाबादला मुक्काम करण्याचे ठरले……

पुन्हा संध्याकाळची सांजआरती झाली . मंदिराच्या प्रसादालयात रात्रीचे जेवण झाले.. नंतर आम्ही सर्वजण धर्म शाळेत गप्पा मारत बसलो. पण वेळ जाईना , झोप येईना म्हणून आम्ही पुरुष मंडळी पुन्हा मंदिरात दर्शनाला जावूया म्हणून धर्मशाळेतुन बाहेर पडलो पण आम्ही बरेच फिरलो , धर्मशाळेला तीन तीन गोल गोल फेऱ्या झाल्या तरी आम्हाला मंदिर दिसलेच नाही. शेवटी आमची मती गुंग झाली आणि आम्ही कंटाळून धर्मशाळेत जावून झोपलो…..

आश्चर्य म्हणजे सकाळी आम्ही उठलो आणि पाहतो तर अगदी समोर म्हणजे 100 फुटावर *माणिकप्रभूंचे समाधी मंदिर डोळ्यासमोर होते.*

असाही हा *चकवा* गाणगापूर ते हुमणाबाद या प्रवासात अनुभवास आला हे ही सत्य घटना आहे..

****************

*विगसातपुते*

प्रतिक्रिया व्यक्त करा

five − one =