You are currently viewing “आयुष्यभर टिकणारी स्मृती”…….

“आयुष्यभर टिकणारी स्मृती”…….

बांबू ज्याला आमच्या अस्सल मालवणी भाषेत “माणगो”असे संबोधले जाते. साधारण तीस वर्षापूर्वी या माणग्याचा उपयोग हा फक्त ठराविक घटकांच्या उपजीविकेचं थोडफार साधन. आपले बौध्दबांधव या माणग्यापासून काही ठराविक वस्तू बनवततात. टोपल्या, रवळ्या, डाळ्या वगैरे.. याबरोबरच दुसरा या बांबूचा उपयोग म्हणजे “आड्याकं नायतर मड्याक”…कुणाचे दुर्दैवी निधन झाल तर त्यांच्या तिरडीला बांबूचा वापर केला जातो.. नाहीतर आडा (कंपाउंड) करण्यासाठी वापरला जातो..
बांबू ही वनस्पती की गवत(Grass) याबाबत केंद्र सरकारच्या गँझेटमध्ये ती वनस्पती(झाडं) असा ब्रिटिश कालापासून उल्लेख आणि यामुळे शासनाच्या वनखात्याकडून निर्बंध.. मग त्यासाठी वहातूक परवान्याच्या कटकटीपासून सगळ्या गोष्टी आल्या. गेल्या पंचवीस वर्षात याचा सरकार दरबारी फक्त खलचं चालू होता.. आपल्या देशात सर्वस्तरावर एखादा निर्णय होण्यासाठी खूप चर्चा होते.. कारण आपली लोकशाही.. त्यामुळे अनेकदा निर्णय व्हायला वेळ लागतो. या प्रक्रियेबाबत केंद्रातील वाऱ्याच्या वेगाने खऱ्या अर्थाने काम करणारे केद्रींय मंत्री मा.नीतीनजी गडकरी याने अनेकदा नाराजी व्यक्त केलेली आहे.
शाश्वत विकासाचा ध्यास घेऊन देशाच्या राजकारणात सक्रीय असलेले माजी केंद्रीय मंत्री, कोकणचे सुपूत्र आणि भारत सरकारचे शेर्पा म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं महत्व अधोरेखित करणारे मा.खासदार सुरेशजी प्रभू यांनी पंचवीस वर्षापूर्वी या बांबूचं महत्व ओळखलं आणि बांबूपासून रोजगार आणि पर्यावरणाचेही महत्त्व या दोन्ही गोष्टी अबाधित ठेवून सिंधुदुर्ग जिल्ह्यात ही चळवळ सुरु केली.सरकार दरबारी बांबूच महत्त्व पटवून दिल. विशेष म्हणजे बांबू हे गवत या कँटीगेरीत समाविष्ट केलं तर सर्वसामान्याना आणि मोठ्या प्रमाणात बांबूची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना फायदा होईल. हे जेव्हा मा.प्रभूसाहेबांनी देशाच्या मा.पंतप्रधानांनाही पटवून दिलं तेव्हा वेगाने चक्र फिरली आणि बांबू हे आता गवत या कँटीगेरीत समाविष्ट झालं.एवढा मोठा निर्णय जो गेली काही वर्षे प्रलंबित होता.. तो झाला आणि आता बांबू चळवळीचं दालन व्यापक झालं.
बांबूपासून ब्रीज बनवता येतात, रस्ते बनवता येतात, घरं बनवता येतं तसेच टोलेजंग हाँटेलपण बनवता येत. नव्हे बनवली गेली. सिमेंटपेक्षाही मजबूत.. आणि याच बरोबर या टाकावू बांबूपासून आकर्षक आणि टिकावू कलाकुसरीच्या विविध प्रकारच्या वस्तूही बनवता येतात.. नव्हे खुद्द आपल्या कुडाळात बनत आहेत. देशाच्या सुक्ष्म उद्योग मंत्रालयाने स्फूर्ती अंतर्गत कुडाळातील “चिवार” या प्रकल्पाला सहकार्य केल्याने या माध्यमातून आज दोनशेहून जास्त तरुण तरुणीना रोजगार मिळालेला आहे.
अनेक सामाजिक संस्था वा व्यक्ती विविध प्रकारच्या स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम घेतात. अशावेळी जी स्मृतीचिन्ह दिली जातात ती जर बांबूची दिली तर पर्यावरण या विषयाबरोबर स्थानिक कारागिरांना रोजगारही मिळू शकतो. मी गेली दहा वर्षे कुणाला भेट द्यायचे असतील, आमच्या संस्थेच्या वतीने ज्या विविध स्पर्धा आयोजित करतो त्यासाठी असतील..My choice is only BAMBOO अर्थात माणगो..

…. अँड.नकुल पार्सेकर…

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen + three =