You are currently viewing आनंद

आनंद

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य लेखिका कवयित्री राधिका भांडारकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

आज पहाटे मी ऊठले. पाऊस रिमझिमत होता.आणि बागेमधला प्राजक्ताचा सडा मनाला प्रसन्न करुन गेला. शेजारीच पांढरा, गुलाबी चंपक डवरला होता. कोपर्‍या कोपर्‍यात पिवळी लीली फुलली होती.अनेकरंगी जास्वंदी पाहून तर मी हरखूनच गेले. आणि चटकन् मनात आलं,श्रावण किती सुंदरअसतो! रंगी बेरंगी,सुगंधी…आणि मग मी कल्पनेतच रानात गेले. सृष्टीशी एक संवाद घडला. .त्यातूनच हे काव्य ओघळलं.

 

 

*आनंद*

 

हसत खेळत श्रावण गातो

रंगुनी रंगात भिजुनी जातो…

 

प्राजक्त फुलांचे सडे सांडले

काळ्या मातीत मोती वेचले

पाहुनी सृष्टीला आनंद होतो

रंगुनी रंगात भिजुनी जातो…

 

कमलदली भ्रमर गुंजन

रानात वनात मोर नर्तन

सुसाट वाऱ्याचा ठेका धरतो

रंगुनी रंगात भिजुनी जातो..

 

संस्कृती सणांचा श्रावण मास

धूपदीपादी दरवळ खास

आसमंत सारा प्रसन्न होतो

रंगुनी रंगात भिजुनी जातो

 

हसत खेळत श्रावण येतो

रंगूनी रंगात भिजुनी जातो…

 

*राधिका भांडारकर पुणे*.

प्रतिक्रिया व्यक्त करा