You are currently viewing मंगळवार आठवडा बाजारात पैसे जमा करणाऱ्या त्या व्यक्ती कोण..?

मंगळवार आठवडा बाजारात पैसे जमा करणाऱ्या त्या व्यक्ती कोण..?

*वह्या वाटप कार्यक्रमांतर्गत सामाजिक कार्याच्या नावावर केले जबरदस्ती पैसे गोळा*

 

सावंतवाडी येथील मंगळवार आठवडा बाजारात काही अज्ञात व्यक्तींकडून वह्या वाटप करणे अशा सामाजिक कार्याच्या पार्श्वभूमीवर बाजारात भाजीपाला विक्रीसाठी आलेल्या व्यापाऱ्यांकडून जबरदस्तीने पैसे गोळा केल्याची माहिती समोर येत आहे. सामाजिक कार्य करणे या व्यापक विचारातून अस्विकारार्य असा राजरोस लुटमारीचा हा प्रकार असल्याचे दिसून येते. सदरचा प्रकार हा एका राजकीय पक्षाच्या अल्पसंख्यांक कार्यकर्त्यांकडून झाला असल्याची चर्चा आहे.

दरवर्षी शाळा सुरू झाल्यावर आणि निवडणुकांचा कालावधी जवळ आल्यावर अनेक राजकीय पार्श्वभूमी असलेल्या नेते, कार्यकर्त्यांना आपल्या पक्षाची आणि आपली वैयक्तिक प्रतिमा “दानशूर व्यक्ती” अशी दाखविण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप, आर्थिक मदत देणे असे कार्यक्रम घेतले जातात. काही तळागाळातील कार्यकर्ते आपल्या नेत्याला खुश करण्यासाठी जगाकडून गोड बोलून नाहीतर धमकावून जबरदस्ती पैसे गोळा करतात आणि आपणच पक्षाचा, नेत्यांचा कट्टर कार्यकर्ता असे दाखविण्याचा केविलवाणा प्रकार करतात. असाच प्रकार काल मंगळवारी सावंतवाडी आठवडा बाजारात घडला. टोपी घातलेल्या कार्यकर्त्याने कुणाकडून १००/२००/५०० रुपये वह्या वाटप कार्यक्रमासाठी द्या असे सांगून वसूल केले. ५० रुपये देणाऱ्याला १०० तर १०० रुपये देणाऱ्या कडून २०० अशी जबरदस्ती वसूल केल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. सावंतवाडी सारख्या सृजनशील नागरिकांच्या शहरात असा प्रकार घडणे नक्कीच चुकीचे असून सावंतवाडी पोलीस या व्यक्तींचा शोध घेऊन तपास करणार का? असा प्रश्न सर्वसामान्य भाजी विक्रेते करत आहेत.

एकदा अशी लूट पचल्यावर असाच लुटालूटीचा प्रकार पुढच्या आठवडा बाजारात करण्यास सुरू राहिल्यास ही चांडाळ चौकडी मागे पुढे पाहणार नाही. त्यामुळे सदर प्रकारची योग्य ती चौकशी होऊन कार्यवाही व्हावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा