You are currently viewing सलाम!! हुतात्मा मेजर कौस्तुभ राणे यांच्या पत्नी कनिका राणे झाल्या ‘लेफ्टनंट’

सलाम!! हुतात्मा मेजर कौस्तुभ राणे यांच्या पत्नी कनिका राणे झाल्या ‘लेफ्टनंट’

सिंधुदुर्ग :

 

हुतात्मा मेजर कौस्तुभ राणे यांच्या पत्नी कनिका या ‘लेफ्टनंट’ झाल्या आहेत. चेन्नईच्या अधिकारी प्रशिक्षण अकादमीत (ओटीए) नऊ महिन्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करीत त्यांनी शनिवारी लेफ्टनंट पदाचे दोन ‘स्टार्स’ खांद्यावर चढवले.

 

मेजर राणे हे ऑगस्ट २०१८ मध्ये काश्मीरच्या गुरेझ भागात दहशतवाद्यांशी लढताना हुतात्मा झाले होते. त्यावेळी त्यांचा मुलगा हा फक्त दोन वर्षांचा होता. कौस्तुभ यांच्या पत्नी कनिका या मुंबईत एका ठिकाणी नोकरी करीत होत्या. पती हुतात्मा झाल्यानंतर मात्र कनिका यांनी स्वतःहून लष्करात दाखल होण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार परीक्षा तसेच मुलाखतीत अग्रेसर येत त्यांची प्रशिक्षणासाठी मागील वर्षी निवड झाली. हे प्रशिक्षण पूर्ण करीत त्या आता लष्करात अधिकारी झाल्या आहेत. एरव्ही मुल लहान असले, की त्याची आई नोकरीतून ब्रेक घेते. कनिका यांनी मात्र मुलगा लहान असतानादेखील नऊ महिन्यांचे खडतर प्रशिक्षणाचा टप्पा यशस्वीरीत्या पार पाडत लेफ्टनंट झाल्या आहेत.

 

कौस्तुभ राणे हे मूळचे वैभववाडी तालुक्यातील सडूरे गावचे असून त्यांचे बालपण शिक्षण मुंबईत झाले. त्यानंतर ते सैन्यात भरती होऊन एक एक टप्पा पार पडत ते मेजर पदावर पोहोचले. ज्यावेळी ते शहीद झाले त्यावेळी त्यांच्या कुटुंबावर, तालुक्यावर शोककळा पसरली होती. आता त्यांच्या पत्नी कानिका राणे यांनी कठीण परिस्थिती मधून बाहेर पडत सैन्यात भरती झाल्याने संपूर्ण तालुक्यातून आणि कुटुंबातून ही कौतुक केले जात आहे व एक उत्कृष्ठ आदर्श समाजासमोर मांडला जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × one =