You are currently viewing सावंतवाडी रेल्वे स्थानकसमोरील एटीएम हटविल्याने ग्राहकांचे हाल…

सावंतवाडी रेल्वे स्थानकसमोरील एटीएम हटविल्याने ग्राहकांचे हाल…

मशीन लवकरात लवकर बसवा:एटीम धारकांमधून मागणी…

सावंतवाडी

सावंतवाडी रेल्वे स्थानकसमोरील असलेले बँक ऑफ इंडियाचे एटीएम अचानक हटविल्याने एटीम धारकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. त्यामुळे त्यांची गरज लक्षात घेता याठिकाणी एटीम मशीन लवकरात लवकर बसवावी, अशी एटीम धारकांमधून मागणी होत आहे.

सावंतवाडी रेल्वे स्थानकासमोर बँक ऑफ इंडियाचे एटीएम होते. मागील काही महिने ते बंद होते, मात्र पुन्हा ते सुरु करण्यात आले होते, मात्र ते आता पूर्णतः तेथून हटविल्याने बँक ग्राहकांचे तसेच रेल्वे मधून येणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत. सावंतवाडी रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणात प्रवाशांची ये-जा सुरु असते. यावेळी प्रवाशांना पैशांची गरज भासल्यास या एटीएम मधून पैसे काढता येत होते, मात्र ते हटविल्याने या रेल्वे प्रवाशांना तसेच परिसरातील एटीम धारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. येथून जवळपास फक्त मळगाव बाजारपेठेत एटीम आहे, मात्र ते बहुतेक वेळा नेटवर्क अभावी बंदच असते. तसेच रेल्वे स्थानकापासून तळवडेशिवाय कोठेही एटीम नाही. त्यामुळे कोणाला पैशांची अचानक गरज भासल्यास येथून 6 किलोमीटर तळवडे येथे जाण्याशिवाय पर्याय नाही. यात लोकांचा वेळ आणि पैसा वाया जात आहे. हे लक्षात घेता याठिकाणी एटीम असणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे ग्राहकांच्या मागणी व सोयीसाठी या हटविलेल्या एटीममध्ये काही बिघाड असेल तर तो दुरुस्त करून ते पुन्हा सुरु करावे, अशी मागणी होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा