You are currently viewing माणूस म्हणून जगतांना..

माणूस म्हणून जगतांना..

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्र.सौ. सुमती पवार लिखित अप्रतिम लेख*

 

 

  *“माणूस म्हणून जगतांना ..”*

 

गहन पण उत्तर माहित असून कधीच समाधानकारक

उत्तर न मिळणारा विषय आहे हा…

 

माझा जन्म कापडण्यासारख्या खेडेगावातला पण अत्यंत

सुसंस्कृत आईवडिलांच्या पोटी झाला. लौकिक अर्थाने माझे

आई वडिल सामाजिक स्थिती व परिस्थितीमुळे फार शिकलेले

नव्हते. वडिल त्या काळात फायनल झाले पण गरिबीमुळे पुढे

शिकू शकले नाही. आई तर बहुधा शाळेतच गेली नसावी. नंतर

वडिलांनी घरी शिक्षक बोलवून तिला शिकवले. सही करत होती. वडिल वयाच्या पंधराव्या वर्षीच (गांधीजींचे भाषण ऐकून)चळवळीत पडून देशासाठी पडेल ते काम करू लागले.

एवढी गरिबी असून माझे आजोबा काका आत्या सारेच क्रांतीत सामिल होऊन तुरूंगात गेले होते.

 

पुढे क्रांतिकार्य करत असतांनाच वडिलांचे लग्न झाले नि माझी

आई ही क्रांतिकार्यात ओढली गेली व देशभर त्यांची पळापळ

सुरू झाली. माझी तीन ही भावंडे आजोळी वाढली. देशाला

स्वातंत्र्य मिळाले व तुरूंगवास संपवून वडिल कापडण्यात

स्थिरावले. फक्त माझा जन्म कापडण्यातला आहे. हे सगळे

सुरूवातीला सांगणे आवश्यक होते त्या शिवाय पुढचे कळणे

अवघड झाले असते.

 

वडिल खादी भांडाराचे सुत कताईचे शिक्षक म्हणून काम करू

लागले. ३० रूपये पगारातून १५ रूपये घरी पाठवत. कारण

बदल्या होत असत महाराष्ट्रात कुठेही जावे लागे,चांद्या पासून

बांद्या पर्यंत!

 

आता मला आठवतो तो काळ सांगते. साधारण चवथी पाचवी

पासूनच्या घटना मला आठवतात.वडिल बऱ्यापैकी स्थिरावले

होते व क्रांतीकार्या नंतर गावांच्या विकासात त्यांनी स्वत: ला

झोकून दिले होते. आई आपली घरगाडा ओढत होती. दळण

कांडण शिवण इ.मला आठवतो तो पहिला नकळत झालेला

माझ्या मनावरचा संस्कार तो माणसाने माणूस म्हणून जगतांना समोरच्याशी कसे वागावे याचा तो सांगते. हे सगळे विश्लेषण

मी आता करते आहे पण माझ्या कोवळ्या अबोध मनावर तो

व तसे अनेक संस्कार झाले होते हे आता माझ्या लक्षात आले

कारण समोरच्या वडार जातीच्या एका गुन्हेगार माणसाच्या

बायकोशी आई कशी वागत होती ते आता ही मला डोळ्यांसमोर दिसते आहे.

 

ते असे.., सणासुदीला,जाती व्यवस्था तेव्हा कडक असली

तरी ही चतुर्थ श्रेणीत काम करणारी मंडळी गोडधोड मागायला

डोक्यावर टोपली घेऊन घरोघर फिरत असत.ही वडाराची बायको नवरा दरोडेखोरीत घेऊन आलेले सुंदर सुंदर वजनदार

भरपूर दागिने अंगावर मिरवत पुरणपोळ्या लाडू सांजोऱ्या मागत फिरत असे.तिचा नवरा नथ्थू वड्डर कधीच जागेवर नसे.

त्यांच्या भाषेवरून मला वाटते ही मंडळी दाक्षिणात्य होती.

ते डुक्कर पकडायचे काम करायचे, फासात डुक्कर पकडायला गावात पळापळ करायचे व मग जाळावर डुक्कर

टांगून भाजून खायचे. तर ही बाई दारात आल्या नंतर माझी

आई प्रेमाने तिला दारात बसवून घ्यायची व तिची चौकशी

करत असे. ह्या वडार स्रिया तेव्हा चोळी न घालताच पदर

लपेटून वावरत असत.तिच्या साड्याही भारी असायच्या.

 

 

नवरा गुन्हेगारी करतो त्यात तिचा काय दोष? ती आई जवळ

मन मोकळे करत असे.थोडा वेळ बसत असे. मग आई तिला

पुरणपोळी कुरड्या पापड लाडू असे ताटभरून तिच्या टोपलीत

टाकत असे. मी लहान असल्यामुळे घाबरून लांबून पहात असे.

“माणूस म्हणून जगतांना माणसाने माणसाशी कसे वागावे

याचे उत्तम उदा. या पेक्षा वेगळे काय असू शकते?आमच्या घरी

भेदभाव हा प्रकारच त्या काळी ही नव्हता हे ऐकून तुम्हाला धक्का बसेल. सर्व बाराबलुतेदार माझ्या वडिलांशी प्रेमाने व

आपुलकीने वागायचे कारण आमच्या घरात तो भेदाभेदाचा

संस्कारच नव्हता. घरात कामाला हीच मंडळी होती. हेच

संस्कार माझ्यात रूजले व उत्तम माणूस घडले असे मी धाडसाने म्हणू शकते. वडिल वर्धा आश्रमात असतांना त्या

काळी हरिजन वस्तीत घर घेऊन हरिजनांची सेवा केली व

त्यांना गोडाचे जेवण दिले.

 

आईकडे मदत मागायला आलेला कुणी ही माणूस कधीही

विन्मुख गेला नाही. आई वडिल दोघे ही मदतीस कायम पुढे

असत त्याचाच परिणाम मला ही कुणाला नाही म्हणणे जमत

नाही. माणसाने माणसाला माणसा सारखे वागवले की प्रश्न

शिल्लक रहातच नाही हो! म्हणून माणूस म्हणून जगतांना

सहानुभूती प्रेम दया करूणा कणव हे सारे सद् गुणी मित्र

संगतीला निदान यातले एक दोन तरी असणे गरजेचे आहे,

नाही तर तुमच्या जगण्याला अर्थच नाही.

 

आपण तुकाराम बनून सर्वस्व लुटून द्यायला आपली तेवढी

लायकी नसली तरी आपल्या घासातला घास तर आपण

देऊ शकतो ना? साने गुरूजी, कोल्हापूरचे शाहू छत्रपती,

बडोदेकर सयाजीराव महाराज ही माणसातल्या माणुसकीची,व उत्तम माणूस बनून माणूस म्हणून जगतांना

कसे वागावे याची उत्तम उदा. आहेत.तरी आपल्यातला माणूस

जागा होत नाही ही मोठीच शोकांतिका आहे.माणसाने जमेल

तसे दुसऱ्याला संरक्षणही दिले पाहिजे.

 

आमच्या गावात एका बाईकडून लग्न न करताच एका लग्न

झालेल्या मुलाबाळांचा धनी असलेल्या माणसाच्या घरात

राजरोसपणे(जे समाजाला आज ही मान्य नाही) राहण्याचा

अपराध घडला.गावकरी इतके चिडले की तिच्या पाठीशी

काठ्या घेऊन धावले. ती पांढरीत (शेतात) एक गव्हाची भली

मोठी गरी होती त्यात घुसली व लपली. गावकरी त्या गरीलाच

आग लावायला निघाले. मध्यंतरात धावतपळत येऊन एकाने

ही गोष्ट माझ्या वडिलांच्या कानावर घालताच वडिल तडक

गरीकडे निघाले. गरीला आग लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या गावकऱ्यांनी माझ्या

वडिलांना येतांना पाहताच चारीकडे धूम ठोकली. वडिल पुढे

व बाई मागे असे तिला वडिलांनी घरी पोहचवले. आज ही तिथे

नांदते आहे. नवरा मेला आता.माणूसपणाचे या पेक्षा उत्तम उदा. काय असेल?

 

 

अशाच खूप गोष्टी आहेत की मी माणूस म्हणून घडत गेले.आई वडिल सगळ्यांचाच आदर्श असतात. पण सारेच तसे घडत

नाहीत ना? बाहेरचं वारं लागतं नि माणूस बिघडतो. आता तर

मुले बिघडवणारी इतकी साधने आपल्या हाती आहेत व आपणही तितकेच हतबल आहोत हे आपल्याला मान्य करावे

लागेल.जीवघेणी स्पर्धा आहे व आपण सारे रेसमध्ये धावतो

आहोत.ताकदवान पुढे जातात व बाकी मग गुन्हेगारी व रिकामटेकड्या जगात जातात. तेच इतके होरपळलेले असतात

की माणुसकी किस पेडकी पत्ती? हे त्यांच्या गावी ही नसते.

या दुष्टचक्रातून माणूस मुक्त होऊन तो सुखी होवो व त्याने

इतरांना सुखी बनवण्याचा प्रयत्न त्याच्या कडून घडो एवढा

आशावाद व्यक्त करून थांबते.

 

आणि ही फक्त माझी मते आहेत. विषयांतर झाले असेल पण

ते गरजेचे होते.पार्श्वभूमी माहित असल्या शिवाय बऱ्याच गोष्टींचा उलगडा होत नसतो.

 

 

ता.क….राजर्षी शाहू महाराज आपल्या अलिशान अशा महागड्या गाडीने कोल्हापूरकडे जात असतांना, कोल्हापूरच्या

अलिकडे बाजारात भाजी विकून घरी जाणाऱ्या एका आजीबाईंची एस टी चुकली व ती रस्त्यावर वाहनाच्या शोधात

असतांनाच महाराजांची ही भलीमोठी गाडी तिला जातांना दिसताच तिने मदतीसाठी हात दाखवला व कच्चकन महाराजांची गाडी आजी जवळ थांबली. आजी म्हणाली ,

पुता २ आणे देऊ करतंय् तुका, माका आमक्या गावी सोड.

महाराज हसले व म्हणाले, बस म्हातारे, सोडतो तुला.

आजीचे ठिकाण आल्याबरोबर गाडी थांबली. महाराजांनी

आजीचे दोन आणे घेतले. आजीने दिलेला खाऊ खाल्ला.

गाडी कोल्हापूरकडे निघाली.

 

हे सगळे दृश्य विस्फारलेल्या नेत्रांनी पाहणारा गांवकरी आजीला म्हणाला, आज्जे, अग कोणाच्या गाडीतून आली

तू? अगं, ते आपलं महाराज व्हतं, शाहू महाराज!

म्हातारी तोंडावर हात ठेवत म्हणाली, अरं माझ्या पुता!

मी न्हाय वळखलं रं आपल्या राजाला.. असं म्हणत गाडीच्या

दिशेने पाहते तर गाडी बरीच दूर गेली होती.

आता महाराजांना दोन आणे घ्यायची गरजच काय? असे

तुम्हाला वाटेल पण महाराजांनी तिची अस्मिता तर जपलीच

पण दोन आणे स्वीकारून आपली ओळखही न देता तिला

समाधान दिले. ती खुश होती हे महाराजांचे जनतेप्रती प्रेम होते.

कसे कसे आदर्श राजे होऊन गेले हो आपल्याकडे? तरी आम्ही

इतके का घसरलो? त्यांचे कुठलेच आदर्श आमच्यात मुरले

नाहीत काय?

असो…

धन्यवाद…

 

आपलीच..

 

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक

(९७६३६०५६४२)

दि: ११ जुलै २०२३

वेळ : पहाटे ३:१९

प्रतिक्रिया व्यक्त करा