You are currently viewing वीजबिल माफीसाठी मनसे सिंधुदुर्गात आंदोलन करणार…परशुराम उपरकर

वीजबिल माफीसाठी मनसे सिंधुदुर्गात आंदोलन करणार…परशुराम उपरकर

कणकवली
लॉकडाऊनच्या कालावधीत वीज ग्राहकांना वीज बिलात सवलत देण्याचीही घोषणा उर्जामंत्र्यांनी केली होती. मात्र आता तेच उर्जामंत्री वीजबिल माफी होणार नाही असे सांगून जनतेची फसवणूक करत आहेत. या विरोधात मनसेतर्फे तीव्र जनआंदोलन उभे केले जाणार असल्याची माहिती मनसेचे सरचिटणीस आणि माजी आमदार परशुराम उपरकर यांनी आज दिली.
येथील आपल्या संपर्क कार्यालयात श्री.उपरकर यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, राज्यातील वीज ग्राहकांचे लॉकडाऊन कालावधीतील वीज बिल माफ व्हावे यासाठी मनसेतर्फे राज्यभर आंदोलन केले जाणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तसेच आदेशच दिले आहेत. त्याअनुषंगाने सिंधुदुर्गातही आम्ही प्रखर आंदोलन करणार आहोत. त्याबाबतचे नियोजन करण्यासाठी उद्या (ता.२०) कणकवलीतील मनसे संपर्क कार्यालयात मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक होणार आहे.
श्री.उपरकर म्हणाले, वीजबिल माफीसाठी निधी नसल्याचे कारण राज्य सरकार देत आहे. मात्र एस.टी.कर्मचार्‍यांच्या पगारासाठी शासनाने एक हजार कोटींची तरतूद केली. त्याच धर्तीवर वीज ग्राहकांच्या बिलासाठीही अडीच ते तीन हजार कोटींची तरतूद झाली असती तर हजारो वीज ग्राहकांना दिलासा मिळाला असता. पण आघाडी सरकार ग्राहकांकडून वीज बिलाची वसुली करून घेण्याच्या मुद्दयावर ठाम आहे. त्यामुळे आता आंदोलनाशिवाय पर्याय राहिलेला नाही. या आंदोलनात नागरिकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन परशुराम उपरकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × 3 =