You are currently viewing उद्या कुडाळमध्ये सिंधुदुर्ग भाजपाची महावितरणला धडक बेधडक!

उद्या कुडाळमध्ये सिंधुदुर्ग भाजपाची महावितरणला धडक बेधडक!

अवाजवी वीजबिले वसुलीची महावितरणची मनमानी चालू देणार नाही – भाजपा सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचा इशारा.

कुडाळ

महावितरणतर्फे अवाजवी वीजबिलांची आकारणी केली जात असून त्यांची अन्यायकारक वसुली करण्याचा घाट घातला जात आहे. शासनाच्या आणि मंत्र्यांच्या बुरख्याआड लपून जनतेवर दबाव टाकला जात आहे. यापूर्वी भारतीय जनता पक्षाने सर्वसामान्य जनतेच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून ही लूटमार वेळीच थांबवण्याचा इशारा दिला होता. मात्र थोडा काळ जाताच महावितरणने पुन्हा डोके वर काढत जनतेला नोटीसा काढत विजबिले भरण्यासाठी धमकवायला सुरवात केल्याचे निदर्शनास येत आहे. महावितरण भलेही ऊर्जामंत्र्यांचे आदेश घेऊन त्यासाठी मनमानी करत असेल, पण भाजपा ही त्यांची दडपशाही चालू देणार नाही. जनतेची निर्दयीपणे प्रचंड आर्थिक लुटमार होत असून त्याविरोधात सिंधुदुर्ग भाजपा उद्या रस्त्यावर उतरत महावितरणला जाब विचारणार असल्याची माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष श्री राजन तेली यांनी दिली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात सामान्य जनता व व्यापारी-उद्योजकांचे कंबरडे आधीच मोडले आहे. त्यातच भरमसाठ वीजबिलांमुळे या सर्वच वर्गाचे जगणे मुश्किल झाले आहे. योग्य बिल आणि ते भरण्यास सवलत मिळालीच पाहिजे ही भाजपाची मागणी आहे. बिलापायी जिल्ह्यातील कोणाचीही वीज कापण्यात येऊ नये ही भाजपाच्या यापूर्वीच्या आंदोलनातली प्रमुख मागणी राहिली होती. महावितरणने उर्जामंत्र्यांच्या नावाखाली जिल्ह्यातील जनतेला विजबिले भरण्यासाठी सक्ती करण्याचे राबवलेले नवे धोरण या जिल्ह्यात अजिबात चालू देणार नाही. उद्या होणाऱ्या महावितरण विरोधातील बेधडक आंदोलनात या मनमानीविरोधात आवाज उठवून भाजपा ठामपणे जनतेच्या पाठीशी राहणार आहे, सर्वसामान्य जनतेने घाबरून जाऊ नये, आपल्या न्याय्य हक्कासाठी उद्या सकाळी ११ वाजता कुडाळमधील आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष श्री राजन तेली यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × 5 =