You are currently viewing कोपरा

कोपरा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य लेखिका कवयित्री संगीता कुलकर्णी लिखित अप्रतिम लेख*

 

*—–कोपरा—-*

 

*रुसू बाई रुसू, कोपऱ्यात बसू'”, असा प्रत्येकाचा हक्काचा असा एक कोपरा. एकटेपणा घालवायला किंवा निवांतपणासाठी म्हणा घरातली एक खास जागा असते… प्रत्येकासाठी ती खासच असते.. तशी माझी पण आहे ती म्हणजे खिडकी.. घरची खिडकी ‘माझी सखी’ आहे. .. माझं घर रस्त्याच्या बाजूला असल्यामुळे मला खिडकीतून रस्ता अगदी स्पष्ट दिसतो

कधी कंटाळा आला तर त्या खिडकीवर मस्त रेलून बसायचं आणि रस्त्यात येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना निरखायचं… येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांचं निरीक्षण करताना खूप मज्जा येते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर वेगवेगळे हावभाव असतात. कुणी फोनवर बोलत असतं तर कुणी सोबत असलेल्या व्यक्ती बरोबर गप्पा मारत मारत जात असतं. व्यक्ती तितक्या प्रकृती याचा प्रत्यय येतो. त्यांना पाहता-पाहता वेळ कसा निघून जातो ते काळतंच नाही. इतकच नाही तर खिडकीतून सगळ्या ऋतूंची मजा ही अनुभवता येते बरं..! उन्हाळ्यात टोप्या घालून घाम पुसत जाणारी माणसं, थंडीत हातावर हात चोळत स्वेटर घालून जाणारी माणसं आणि पावसाळ्यात छत्री, कपडे संभाळत जाणारी माणसं हे सर्व पाहायला गम्मत वाटते. जेव्हा पाऊस पडत असेल तेव्हा तर जास्त गम्मत असते. मस्त आल्याचा चहाचा कप घेऊन तो कोसाळणारा पाऊस पहायचा… शाळेत जाणारी छोटी छोटी रेनकोट मधली ती गोड मुलं पाहिली की अगदी लहान व्हायला होतं. असाच पाऊस पडत असताना एखादं छानसं रोमँटीक गाणं गुणगुणत भूतकाळातल्या सगळ्या जुन्या आठवणींना छान उजाळा द्यायचा. रस्त्यावरच्या झाडांवर येणारे निरनिराळे पक्षी पाहायचे. पाऊस पडत असताना पत्र्यावर येणारा टपटप आवाज किती सुमधुर वाटतो नाही.. सकाळी खिडकीवर बसून कोवळे ऊन अंगावर घेतलं की लहानपणीच्या चाळीतल्या घराची आठवण येते. संध्याकाळी खाली खेळणारी मुलं बालपणीची आठवण करून देतात तर बाकावर बसलेल्या ज्येष्ठ नागरिकांना पाहिलं की आपलं म्हातारपण कसं असेल याची कल्पना येते. आयुष्यातल्या प्रत्येक ऋतूचं आणि काळाचं दर्शन घडवणारी ही खिडकी आहे. ..जसे आपल्या जीवनात नातेवाईक, मित्र-मैत्रिणी जितके महत्त्वाचे तसंच एक अशीही जागा हवी जिथं आपण आपल्याला सोबत करतो. आपल्या सुख-दुःखाचे आपणच सोबती असतो. ती जागा आपली सोबत कधीच सोडणार नाही याची खात्री असते…

 

लेखिका/ कवयित्री

संगीता कुलकर्णी— ठाणे@

9870451020

प्रतिक्रिया व्यक्त करा