परदेशी पर्यटनावर मर्यादा आल्याने पर्यटकांचा कल आता कोकण किनाऱ्यावर…

परदेशी पर्यटनावर मर्यादा आल्याने पर्यटकांचा कल आता कोकण किनाऱ्यावर…

यंदा दिवाळीत पर्यटक लक्ष्मीपूजन, पाडवा याचे औचित्य साधून लागोपाठ सुट्ट्यांचे नियोजन आखून फिरतीसाठी घराबाहेर पडले आहेत. या कालावधीत कोकणात वातावरणही थंड झाल्यामुळे मुरूड, कर्दे, लाडघरसह गणपतीपुळे किनारी पर्यटकांचा कल वाढला आहे. त्यामुळे कोरोना काळात थांबलेल्या पर्यटन व्यावसायिकांना आता दिलासा मिळाला आहे.

 

ऑक्टोबर महिन्यात टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर व नोव्हेंबर महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला. त्यामुळे आता अनेकांनी पर्यटनाला बाहेर पडण्यास सुरवात केली.परदेशी पर्यटनावर मर्यादा आल्याने अनेकांचा कल कोकणातील किनार्‍याकडे आहे. दरवर्षी दिवाळीत लाखो पर्यटक कोकणात दाखल होतात. यंदा कोरोनामुळे सगळीच घडी विस्कळीत झाली आहे. पर्यटन व्यावसायावर अवलंबून असलेली हजारो कुटूंबांचे आर्थिक गणितही कोलमडले; परंतु ऐन दिवाळीत राज्य शासनाने मंदिरे सुरु करण्याचा निर्णय घेतल्यामुळे फिरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

 

यावेळी दिवाळी – लक्ष्मीपूजन एकाच दिवशी होते, तर सोमवारी दिवाळी पाडवा त्यामुळे शनिवार, रविवार आणि सोमवार अशी जोडून सुट्टी आल्याने गेले सहा महिने कोरोनाच्या कारणाने घरातच राहीलेला पर्यटक वर्ग आता फिरण्यासाठी बाहेर पडला असून मध्यम वर्गीयांचा यात जास्त समावेश आहे.

 

गणपतीपुळे किनार्‍यावर हजारो पर्यटकांनी दिवसभरात भेट दिल्याचा अंदाज आहे. सर्वाधिक पर्यटक कोल्हापूर, सातारा, सांगली या भागातील आहेत. तसेच मुंबई, पुण्यातील पर्यटकांनी मिनी महाबळेश्‍वर म्हणून ओळखल्या जाणार्‍या दापोली तालुक्यातील लाडघर, मुरुड, कर्दे या समुद्र किनार्‍यांवर हजेरी लावलेली आहे. सुट्टीमुळे मुक्कामांसाठी पर्यटकांचे प्राधान्य असल्याने त्याचा फायदा हॉटेल, लॉजिंगवाल्यांनाही होत आहे. दापोली तालुक्यात एका दिवसात दोन हजाराहून अधिक तर गणपतीपुळेत एक हजारापर्यंत पर्यटक येऊन गेले. त्यामुळे आता पुढील आठ दिवस कोकणातील किनार्‍यावर मोठ्याप्रमाणात पर्यटकांची गर्दी असेल असे म्हणायला हरकत नाही.

प्रतिक्रिया व्यक्त करा