You are currently viewing गुरूपौर्णिमा

गुरूपौर्णिमा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अनघा कुळकर्णी लिखित अप्रतिम लेख*

 

🌺 *गुरूपौर्णिमा* 🌺

 

आज आषाढ शुक्ल पौर्णिमा म्हणजेच गुरूपौर्णिमा,महर्षी वेदव्यास यांचा जन्मदिवस.महर्षी व्यास यांना संपूर्ण मानव जातीचे गुरू मानतात.त्यांच्या सन्मानार्थ आषाढ पौर्णिमेला आपण गुरूपौर्णिमा साजरी करतो.

गुरूर्ब्रम्हा गुरूर्विष्णु गुरूर्देवो महेश्वर:

गुरूसाक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नम:

गुरू म्हणजे ब्रम्हा,विष्णु,महेश यांच्याहिपेक्षा श्रेष्ठ,साक्षात परब्रम्ह.खरंच गुरूशिवाय जीवन अपूर्ण आहे

आई आपला प्रथम गुरू असतेच नंतर व्यवहारात आपल्याला अनेक गुरु भेटतात परंतु शाळेचे गुरु आपल्याला खऱ्या अर्थाने म्हणजे लौकिकार्थाने घडवतात.विद्यादानाबरोबरच एक चांगला माणूस व्हावा म्हणूनहि ते प्रयत्न करतात.आपण मोठे होत असताना आपले मन पण मोठे व्हावे अशी गुरूंची अपेक्षा असते, गुरू म्हणजे

The one who is able to awaken wisdom in you leading you from darkness to light.

जीवनात मी सर्वत्र मोठे असावे पण एके ठिकाणी माझे मस्तक आदराने झुकत राहावे,ते म्हणजे गुरू.त्यांच्या प्रती आदरभाव व्यक्त करण्याचा आजचा दिवस.

नामदेव म्हणतात-गुरू विठ्ठल गुरुदेवता विठ्ठल निधान विठ्ठल निरंतर विठ्ठल.गुरूकृपेने संत ज्ञानदेवांच्या तर कविप्रव्रुत्तीला प्रतिभेचे पंख फुटले,शब्दकळेनं कृपा केली.ते म्हणतात-

श्रीगुरूसारिखा असता पाठीराखा |

इतरांचा लेखा कोण करी |

ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो |

आता उध्दरलो गुरूकृपे ||

संत कबीर आपला मुलगा कबाल याला समजावताना म्हणाले”आपल्याहि संसाराच्या जात्याला एक खुंटा आहे तो म्हणजे सद्गुरू,त्यांना धरून ठेवावे,त्यांचा आधार घ्यावा.जीवाला निर्भय करणारी एकच विभूती म्हणजे सद्गुरू.”

एकदा एका कुंभाराकडे एक साधू तहान लागली असता आले,त्यांनी विक्रीसाठी ठेवलेली मडकी पाहिली पण एक मडके बाजूला कोपऱ्यात ठेवलेले होते साधूंनी विचारणा केल्यावर त्यांना कळले की ते मडके गळके आहे काही उपयोगाचे नाही पण त्या साधूंनी तेच मडके कुंभाराकडून विकत घेतले व मंदिरात ते पिंडीवर अभिषेकासाठी स्थापन केले.साधूंच्या सहवासात आल्यावर ते निरूपयोगी मडकं देव कार्य करू लागलं,क्षणांत ते वंदनिय झालं मग आपण किंवा आपल्या देहाचं मडकं मग ते कच्च असो किंवा गळकं असो जर गुरूंच्या किंवा संताच्या सहवासात आलं तर आपला उध्दारच होणार नाही का?

आणि म्हणूनच गुरूचरणांची पुजा म्हणजेच देवपुजा

माझी देवपुजा देवपुजा पाय तुझे गुरूराया |

गुरूचरणाची माती तीच माझी भागीरथी |

गुरूचरणाचा बिंदु तोचि माझा क्षीरसिंधु |

गुरूचरणाचे ध्यान तेचि माझे संध्यास्नान |

शिवदिनकेसरीपायी सद्गुरू वाचूनी दैवत नाही ||

🌸श्रीगुरूचरणार्पणमस्तु🌸

 

सौ. अनघा कुळकर्णी .पुणे

 

माझ्या आयुष्यातील सर्व गुरूजनांना समर्पित🙏🏻

🌸🌸🌸🌸🌸🌸

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × two =