You are currently viewing सिंधुदुर्ग डाक विभागाचा राष्ट्रीय विक्रम…

सिंधुदुर्ग डाक विभागाचा राष्ट्रीय विक्रम…

महिला सन्मान पत्र वितरणात देशात तिसरे स्थान; एका महिन्यात दहा हजारांवर महिलांना दिला लाभ

ओरोस

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भारत सरकारकडून देशातील सर्व महिलांना आकर्षक भेट म्हणुन महिला सन्मान बचत पत्र योजना सुरु केली आहे. या निमित्ताने सिंधुदुर्ग डाक विभागाने या योजनेच्या प्रचार व प्रचारासाठी तसेच जिल्ह्यातील सर्व माता भगिनींना या योजनेचा लाभ घेता यावा यासाठी “सिंधु-महिला सन्मान अभियान” सुरू केले आहे. या अंतर्गत विभागाने केवळ एका महिन्यात जिल्ह्यातील 10 हजारहून अधिक महिलांना या योजनेत समाविष्ट करून घेतले आहे. आतापर्यंत एकूण 11 हजार 439 इतकी नवीन महिला सन्मान बचत पत्र उघडली आहेत. त्यामुळे 10 हजार महिला सन्मान बचत पत्र विक्री करणारा संपूर्ण महाराष्ट्रातील पहिला व एकमेव डाक विभाग तसेच संपूर्ण देशातील तिसरा विभाग होण्याचा बहुमान मिळवून नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे.

देशातील सर्व महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी भारत सरकारने २०२३ च्या बजेटमध्ये विशेष मंजुरी देऊन 1 एप्रील 2023 पासुन सर्वाधिक व्याज दर असणारी महिला सन्मान बचत पत्र योजना चालु केली आहे, या बचत पत्र पोस्ट खात्यामार्फत उपलब्ध करून देण्यात आले आहे. या निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व माता भगिनींना या योजनेचा लाभ घेता यावा यासाठी सिंधुदुर्ग डाक विभागाने “सिंधु- महिला सन्मान अभियान” हाती घेतले आहे. या अभियानामार्फत जिल्ह्यातील सर्व महिलांना या योजनेत सहभागी करून घेण्यासाठी सिंधुदुर्ग डाक विभागाकडून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून प्रचार व प्रसार करण्यात येत आहे. सिंधुदुर्ग डाक विभागाच्या या अभियानाला जिल्ह्यातून अतिशय उत्तम प्रतिसाद मिळत असुन विभागाने केवळ एका महिन्यात 10 हजारहून अधिक नवीन महिला बचत पत्र विक्रीचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. तसेच योजना चालू झाल्यापासून म्हणजेच 1 एप्रिल 2023 पासून एकूण 11,439 महिला बचत पत्रांची विक्री करून सर्वाधिक बचत पत्र विक्री करणारा संपूर्ण महाराष्ट्रातील पहिला तर देशातील तिसरा विभाग म्हणुन बहुमान मिळविला आहे.
सिंधुदुर्ग डाक विभागाच्या या उल्लेखनीय कामगिरीचे सर्वच स्तरावरून कौतुक होत आहे. तर या ऐतिहासिक कामगिरी बद्दल सिंधुदुर्ग अधिक्षक डाकघर मयुरेश कोले यांनी विभागातील सर्व कर्मचारी व विशेषतः ग्रामीण डाक सेवकांचे कौतुक केले आहे. या योजना सर्व वयोगटातील व उत्पन्न गटातील सर्व महिलांसाठी उपलब्ध आहे. ज्या मध्ये दोन वर्षांच्या मुदत ठेवीवर सर्वाधिक 7.5 टक्के इतके व्याज चक्रवाढ व्याज पद्धतीने दिले जाते. ही योजना जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील सर्वच्या सर्व 371 पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहेत, अशी माहिती अधिक्षक डाकघर मयुरेश कोले यांनी या अभियानाबद्दल आणि योजनेबद्दल बोलतांना दिली. तसेच यावेळी त्यांनी पोस्ट खात्यामार्फत उपलब्ध करून देण्यात आलेल्या या योजनेचा लाभ जिल्यातील सर्व माता भगिनी यांनी घ्यावा, असे आवाहन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा