You are currently viewing अशोक खराडे हे गाबीत समाजाचे दीपस्तंभ – माजी आम.परशुराम उपरकर

अशोक खराडे हे गाबीत समाजाचे दीपस्तंभ – माजी आम.परशुराम उपरकर

मालवण

स्व.अशोक खराडे हे उत्तुंग व्यक्तिमत्व तर होतेच परंतु गाबीत समाजाला योग्य दिशा दाखवणारे दीपस्तंभ होते असे गौरोद्गार माजी आमदार व अ.भा.गाबीत समाज महासंघाचे अध्यक्ष परशुराम उपरकर यांनी खराडे यांना श्रद्धांजली वाहताना काढले.
महाराष्ट्र पुराभिलेख विभागाचे माजी संचालक व अ.भा.गाबीत समाज महासंघाचे माजी कार्याध्यक्ष अशोक कानू खराडे यांच्या निधनानिमित्त एका शोकसभेचे आयोजन कांजूरमार्ग येथील गाबीत समाज भवनात नुकतेच करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर गाबीत समाज महाराष्ट्र,मुंबई चे अध्यक्ष सुजय धुरत व महासंघाचे माजी अध्यक्ष ऍड.काशिनाथ तारी आदी मान्यवर उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले की, समाजा विषयी आदर असणारा, गाबीताभिमानी, सर्वांना मार्गदर्शन करतांना आदराने बोलणारे व्यक्तिमत्व म्हणून ते महान होते. परंतु दुर्दैवाने त्यांना अपमानास्पद वागणूक दिल्याने ते समाजापासून दूर झाले. समाजाचा जाणता मार्गदर्शक आपल्यातून निघून गेल्याने समाज एका थोर व्यक्तीमत्वास मुकल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. सभेला प्रारंभ करण्यापूर्वी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून खराडे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर उपस्थितांनी पुष्पांजली अर्पण केली. आनंद कुबल यांनी प्रास्ताविक केल्या नंतर दर्यावर्दीचे संपादक अमोल सरतांडेल यांनी आदरांजली वाहताना, खराडे यांच्यामुळे आपल्याला जातीचा दाखला मिळवण्यात यश मिळाल्याचे नमूद केले. तर ज्येष्ठ पत्रकार प्रमोद कांदळगावकर यांनी आपल्या भावना व्यक्त करतांना सुमारे ४० वर्षे खराडेंचा सहवास लाभल्याचे सांगून आपल्या कुशाग्र बुद्धीच्या जोरावर इतिहासकालीन दस्तावेज जतन व संवर्धन करणे, मोडी लिपीचा वापर व संवर्धन करतांना माणसे जोडण्याचे सामर्थ्य त्यांच्याकडे होते. आपुलकी व जिव्हाळा जपतानाच गाबीत समाजाला विशेष मागास प्रवर्ग मिळवून देण्यात त्यांचे मोठे योगदान होते. आपल्याला अनुसूचित जमातीच्या सवलती मिळाल्या असत्या असा ठाम विश्वास त्यांना होता. परंतु काहींनी विरोध केल्याची भावना व्यक्त करून खराडे यांचे कार्य पुढे नेण्याची ग्वाही दिली. तर ऍड.काशिनाथ तारी यांनी आपल्या भावना व्यक्त करतांना खराडे हे थोर विचारवंत व मार्गदर्शक असल्याचे प्रतिपादन केले. खराडे यांच्याशी तात्विक मतभेद असले तरी एक प्रशासक व संवेदनशील व्यक्तिमत्व म्हणून खूपच चांगले होते. स्व.कुबल यांच्या नंतर महासंघाचे नेतृत्व मी करावे अशी त्यांनी शिफारस केल्याने मला संधी मिळूनही काही लोकांमुळे अपेक्षित कार्य करता आले नाही. त्यांच्या जाण्याने समाजाचे खूपच नुकसान झाल्याची खंत तारी यांनी व्यक्त केली. यावेळी पत्रकार पांडुरंग भाबल, बबन सारंग, नारायण आडकर, गणेश फडके, धर्माजी पराडकर व सुजय धुरत आदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या. शेवटी दोन मिनिटे स्तब्धता पाळून खराडे यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी समाजाच्या वडाळा,मानखुर्द, वरळी,जोगेश्वरी, कांजूर पूर्व, भांडुप, ठाणे, दिवा, डोंबिवली व नवी मुंबई येथील शाखांचे पदाधिकारी व समाज बांधव उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा