सांगली / प्रदीप जोशी :
समान नागरी संहितेबाबत विविध हितसंबधी गट, संस्था व नागरिकांच्या सूचना, हरकती व मते जाणून घेण्यासाठी मा. न्यायमूर्ती श्रीम. रंजना देसाई (निवृत्त न्यायाधिश, सर्वोच्च न्यायालय) यांच्या अध्यक्षतेखाली गठीत समितीची पुणे महसूल विभागाची जनसुनावणी दि. 29 नोव्हेंबर 2026 रोजी सकाळी 11 वाजता झुंबर हॉल, विभागीय आयुक्त कार्यालय, विधान भवन पुणे येथे आयोजित करण्यात आली आहे. ही जनसुनावणी सांगली जिल्ह्यासाठी ऑनलाईन (व्हीडिओ कॉन्फरन्सिंग) व ऑफलाईन (प्रत्यक्ष उपस्थित) अशा दोन्ही पध्दतीने घेण्यात येणार आहे. ऑनलाईन जनसुनावणीचे जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात नियोजन केले असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी दिली.
सांगली जिल्हा सुनावणी वेळ दुपारी 11.30 ते 12.30 आहे. या समितीचे सदस्य हे सुनावणी कामी पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे विभागीय आयुक्त कार्यालयात उपस्थित राहणाऱ्या नागरिकांची सुनावणी ही समिती पुढे प्रत्यक्ष होईल. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित असणाऱ्या नागरिकांची सुनावणी ही व्हीडिओ कॉन्फरसिंगव्दारे घेण्यात येणार आहे. संबंधित ठिकाणी सुनावणी वेळेपूर्वी एक तास अगोदर उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
