You are currently viewing भ्रष्टाचाराच्या चौकशीसह दोषींवर कारवाई करण्याची मागणी

भ्रष्टाचाराच्या चौकशीसह दोषींवर कारवाई करण्याची मागणी

संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांचे उलटे टांगून घेऊन अनोखे आंदोलन

कडेगाव / प्रदीप जोशी :

तहसील कार्यालय, दुय्यम निबंधक कार्यालय आणि भूमी अभिलेख कार्यालयातील कथित भ्रष्टाचार, खासगी दलालांचा हस्तक्षेप, लाचलुचपत तसेच नागरिकांच्या कामांमध्ये होणारा विलंब याच्या निषेधार्थ कडेगाव पाणी संघर्ष समितीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गुरुवारी छत्रपती शिवाजी महाराज चौकात स्वतःला उलटे टांगून घेत अनोखे आंदोलन केले. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनाची तीव्रता वाढविण्यात आली आहे.

तहसील कार्यालयासह विविध शासकीय कार्यालयांमध्ये सातबारा दुरुस्ती, फेरफार नोंदी, जमीन मोजणी, दस्तनोंदणी, रेशनकार्ड तसेच अन्य शासकीय कामांसाठी नागरिकांना वारंवार कार्यालयांचे उंबरे झिजवावे लागत आहेत. अनेक कामे प्रलंबित असून खासगी दलालांचा हस्तक्षेप वाढल्याच्या तक्रारी नागरिकांकडून होत आहेत.

पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष डी. एस. देशमुख यांनी यावेळी सांगितले की, सन २०२० ते २०२६ या कालावधीतील कामकाजाची स्वतंत्र उच्चस्तरीय चौकशी करावी. दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, खासगी दलालांचा हस्तक्षेप रोखून नागरिकांना कालमर्यादित व पारदर्शक सेवा द्यावी, अशा प्रमुख मागण्या आहेत. तसेच तालुक्यातील प्रलंबित शेतरस्ते व पाणंद रस्त्यांचे प्रश्न सोडवावेत आणि शासकीय नकाशाप्रमाणे अतिक्रमणे हटवावीत, अशीही मागणी त्यांनी केली.

या मागण्यांसाठी २३ ते २५ नोव्हेंबरदरम्यान छत्रपती शिवाजी महाराज चौकात शांततेच्या मार्गाने धरणे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर गुरुवारपासून आमरण उपोषण सुरू करण्यात आले. मात्र, प्रशासनाने आंदोलनाची दखल न घेतल्याने कार्यकर्त्यांनी स्वतःला उलटे टांगून घेत आंदोलन केले.

दरम्यान, आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), शेतकरी कामगार पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, बहुजन समाज पक्ष तसेच जी. डी. बापू लाड विचारमंच यांच्यासह विविध पक्ष व संघटनांनी पाठिंबा दिला आहे. संबंधित पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन समर्थन जाहीर केले.

प्रशासनाने मागण्यांची गांभीर्याने दखल घेऊन ठोस कार्यवाही करावी, अन्यथा आंदोलनाची व्याप्ती टप्प्याटप्प्याने वाढविण्यात येईल, असा इशारा संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा