जिल्हाप्रमुख संजू परब यांचा पुढाकार; ५ डिसेंबरला उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार दीपक केसरकर आणि निलेश राणे यांच्या उपस्थितीत भव्य मेळावा
वेंगुर्ला : वेंगुर्ला तालुक्यात शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढवून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या नेतृत्वाखाली विशेष गावभेट दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
३० नोव्हेंबर ते ४ डिसेंबर या कालावधीत संपूर्ण तालुक्यात हा दौरा होणार असून, या दौऱ्याची सांगता ५ डिसेंबर रोजी वेंगुर्ला येथील सिद्धिविनायक हॉलमध्ये होणाऱ्या भव्य शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्याने होणार आहे. या मेळाव्याला महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार दीपक केसरकर आणि आमदार निलेश राणे उपस्थित राहणार असल्याची माहिती तालुकाप्रमुख बाळा दळवी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून वेंगुर्ला तालुक्यात शिवसेनेची संघटनात्मक बांधणी करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. आगामी ग्रामपंचायत, स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी हा दौरा महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे बाळा दळवी यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, पंचायत समिती उपसभापती सचिन देसाई, शहरप्रमुख अजित राऊळ, युवासेना तालुकाप्रमुख स्वप्नील गावडे, तालुका सचिव सत्यवान साटेलकर आणि विभागप्रमुख शैलेश नार्वेकर उपस्थित होते.
या दौऱ्यात जिल्हाप्रमुख संजू परब, जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर आणि उपसभापती सचिन देसाई हे स्वतः गावागावांत उपस्थित राहून कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, ग्रामपंचायत सदस्य, बीएलए, युवासेना, महिला संघटना तसेच इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन स्थानिक समस्या, विकासकामे आणि संघटनात्मक परिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे.
३० नोव्हेंबर रोजी आडेली मतदानसंघातून या दौऱ्याची सुरुवात होणार असून, वायंगणी येथून याचा शुभारंभ होईल. त्यानंतर आडेली आणि मठ पंचायत समिती क्षेत्रातील गावांना भेटी दिल्या जाणार आहेत.
१ डिसेंबर रोजी उभादांडा मतदारसंघात परबवाडा, उभादांडा, मोचेमाड, अणसूर, आसोली आणि सागरतीर्थ या गावांना भेटी दिल्या जाणार आहेत.
२ डिसेंबर रोजी तुळस मतदारसंघातील तुळस, पाल, मातोंड, पेंडूर, वजराट आणि होडावडा या गावांचा दौरा होणार आहे.
३ डिसेंबर रोजी रेडी मतदारसंघातील आरवली, शिरोडा आणि रेडी या गावांना भेटी देण्यात येणार असून, सायंकाळी वेंगुर्ला शहरात दौरा होईल.
४ डिसेंबर रोजी म्हापण मतदारसंघातील केळूस, कोचरा, म्हापण, निवती, चिपी, परुळे, भोगवे आणि कुशेवाडा या गावांना भेटी दिल्या जाणार आहेत.
जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांनी या दौऱ्यामागील भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, आमदार दीपक केसरकर यांनी वेंगुर्ला तालुक्याच्या विकासासाठी सातत्याने मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे. मात्र, हा निधी तळागाळातील कार्यकर्ते, सरपंच आणि ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचतो का आणि त्याचा सामान्य नागरिकांना प्रत्यक्ष लाभ मिळतो का, हे जाणून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी गावभेट दौऱ्याच्या माध्यमातून विकासकामांचा आढावा घेतला जाणार आहे. सर्व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून विकासात्मक कामांबरोबरच संघटनात्मक बळकटीवर चर्चा होणार आहे.
शिवसेना-भाजप युती असली तरी प्रत्येक पक्षाला आपली संघटना स्वतंत्रपणे वाढविण्याचा अधिकार आहे. त्यामुळे वेंगुर्ला तालुक्यात शिवसेनेची ताकद वाढविण्यासाठी हा दौरा आयोजित करण्यात आला असल्याचे वालावलकर यांनी स्पष्ट केले.
तालुकाप्रमुखांनी गेल्या काही महिन्यांत संपूर्ण तालुक्यात फिरून पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. या नियुक्त्यांमध्ये काही बदलही करण्यात आले आहेत. त्यामुळे काही कार्यकर्ते नाराज असतील तर त्यांच्याशी संवाद साधून त्यांचा सन्मान राखणे, तसेच आगामी काळात शासनाच्या विविध समित्या आणि पदांवर कार्यकर्त्यांना योग्य संधी मिळवून देणे, हाही या दौऱ्याचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
वेंगुर्ला शहरातील विकासकामांचा उल्लेख करताना वालावलकर म्हणाले की, शहरातील मच्छी मार्केटची जागा अपुरी पडत असल्याने त्याचा विस्तार आणि मच्छी विक्रेत्यांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आमदार दीपक केसरकर यांनी सुमारे साडेचार कोटी रुपयांचा निधी देण्याचे मान्य केले आहे. यापैकी दोन कोटी रुपये प्राप्त झाल्याची माहितीही त्यांनी दिली.
तसेच भटवाडी येथील नमो गार्डनच्या विकासासाठी निधीची आवश्यकता होती. त्यासाठी केसरकर यांनी एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असून, यासंदर्भातील पत्र नगरपालिकेला प्राप्त झाल्याची माहिती त्यांनी दिली. विकासकामे करताना पक्षीय राजकारण बाजूला ठेवून जनतेच्या अपेक्षेनुसार काम करण्यावर आमदार केसरकर यांचा भर असल्याचेही त्यांनी नमूद केले.
गावभेट दौऱ्याची सांगता ५ डिसेंबर रोजी वेंगुर्ला तालुक्यातील भव्य पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्याने होणार आहे. या मेळाव्याला आमदार दीपक केसरकर, उद्योगमंत्री उदय सामंत आणि आमदार नीलेश राणे यांच्यासह वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत.
या मेळाव्यामुळे वेंगुर्ला तालुक्यात शिवसेनेची संघटना अधिक मजबूत होईल आणि कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त करून सर्व शिवसैनिकांनी या दौऱ्यात आणि मेळाव्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांनी केले आहे.
