You are currently viewing वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामाला मिळणार गती

वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामाला मिळणार गती

ओरोसमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे स्वतंत्र उपविभागीय कार्यालय!

पालकमंत्री नितेश राणे यांच्या पाठपुराव्याला यश; सिंधुदुर्गनगरी येथे कार्यालय स्थलांतरित करण्यास शासनाची मंजुरी

४२७.५६ कोटींच्या पहिल्या टप्प्यासह ६२५.९४ कोटींच्या दुसऱ्या टप्प्यातील कामांवर राहणार स्थानिक पातळीवर देखरेख

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ५०० खाटांच्या रुग्णालयाच्या बांधकामाला आता प्रशासकीय स्तरावर अधिक गती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या कामावर प्रभावी नियंत्रण, नियमित देखरेख आणि प्रशासकीय समन्वय राखण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय कार्यालय सिंधुदुर्गनगरी (ओरोस) येथे सुरू करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे वैद्यकीय महाविद्यालय आणि ५०० खाटांच्या रुग्णालयाच्या बांधकाम प्रक्रियेला अधिक बळ मिळणार आहे.

सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ५०० खाटांच्या रुग्णालयाच्या उभारणीसाठी पहिल्या टप्प्यात ४२७.५६ कोटी रुपयांच्या बांधकामाला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. या प्रकल्पाचे एकूण बांधकाम क्षेत्रफळ १ लाख ८१ हजार १४९.७३ चौरस मीटर आहे. त्याचबरोबर वैद्यकीय महाविद्यालयाच्या दुसऱ्या टप्प्यात ८१ हजार २६३.३६ चौरस मीटर क्षेत्रफळाचे बांधकाम प्रस्तावित असून, त्यासाठी ६२५.९४ कोटी रुपयांचा अंदाजित खर्च अपेक्षित आहे.

इतक्या मोठ्या आर्थिक आणि बांधकाम व्याप्तीच्या प्रकल्पाचे काम वेळेत व नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण व्हावे, यासाठी प्रशासकीय यंत्रणा स्थानिक पातळीवर सक्षम असणे आवश्यक होते. प्रत्यक्ष बांधकामावर प्रभावी नियंत्रण ठेवणे, कामांचे योग्य वाटप करणे आणि विविध विभागांमध्ये समन्वय साधणे सुलभ व्हावे, यासाठी संबंधित उपविभागाचे कार्यालय कणकवली येथून ओरोस येथे स्थलांतरित करण्याची मागणी करण्यात आली होती. या मागणीला आता राज्य शासनाने अधिकृत मान्यता दिली आहे.

शासनाच्या निर्णयानुसार, ‘उप अभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग (वैद्यकीय महाविद्यालय), सिंधुदुर्गनगरी (ओरोस)’ या नावाने हे कार्यालय कार्यरत होणार आहे. कणकवली येथे या विभागाकडे असलेल्या मंजूर पदांसह कार्यालयाचे स्थलांतर करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे शासनावर कोणताही अतिरिक्त आर्थिक भार पडणार नसल्याची अटही घालण्यात आली आहे.

यापूर्वी हे कार्यालय अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, रत्नागिरी यांच्या अंतर्गत कार्यरत होते. मात्र, नव्या निर्णयानुसार हे कार्यालय अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, सिंधुदुर्ग यांच्या अधिपत्याखाली आणण्यात आले आहे. तसेच कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, कणकवली यांच्या नियंत्रणाखाली हे कार्यालय काम करणार आहे.

दरम्यान, नवीन कार्यालयासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, सिंधुदुर्ग यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे वैद्यकीय महाविद्यालयाच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील कोट्यवधी रुपयांच्या बांधकाम प्रकल्पांवर स्थानिक स्तरावर नियमित देखरेख ठेवणे शक्य होणार आहे.

पालकमंत्री नितेश राणे यांच्या पाठपुराव्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे स्वतंत्र उपविभागीय कार्यालय ओरोस येथे सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण प्रशासकीय निर्णय मार्गी लागला आहे. यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य सुविधांच्या विस्तारासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ५०० खाटांच्या रुग्णालयाच्या पायाभूत सुविधांच्या उभारणीला प्रशासकीय बळ मिळणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा