विटे / प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार :
संवाद मीडिया सावंतवाडी यामधून विट्यात भाजी मंडई असताना रस्त्यावरच भाजी बाजार अशा आशयाची बातमी प्रसिद्ध झाली होती. या बातमीमधील प्रत्येक मुद्द्याची विटा नगर परिषदेच्या आरोग्य विभागाकडून व अतिक्रमण विभागाकडून नगराध्यक्षा सौ काजल म्हेत्रे व उपनगराध्यक्ष अमोल बाबर मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गंभीर दखल घेण्यात आली आहे.
विटा नगर परिषदेचे सुसज्ज भाजी मंडई असताना देखील काही भाजीविक्रेते नाना पाटील पुतळा परिसर, कराड रस्ता, ढोले रस्ता, शरद विश्वकर्मा परिसर व इतर ठिकाणी रस्त्यावरच भाजी विकत असल्यामुळे वाहतुकीस मोठ्या प्रमाणात अडचण होत होती. नागरिकांना त्रास होत असल्याने तसेच रस्त्यावरच कचरा साठून शहर अस्वच्छ होत असल्याने याबाबतची गंभीर दखल घेऊन नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाकडून व अतिक्रमण विभागाकडून तातडीने कारवाई सुरू केली आहे.
हे सर्व करत असताना विक्रेत्यावर अन्याय न करता नागरिकांना त्रास न होता व्यवस्था करण्याचे काम सुरू आहे नगरपरिषदेच्या अतिक्रमण विभागाकडून ज्या ज्या ठिकाणी रस्त्यावर भाजीपाला विक्रेते बसत आहेत त्या सर्व भाजीपाला विक्रेत्यांना हटवताना त्यांच्यावर कोणत्याही प्रकारे अन्याय होणार नाही तसेच नागरिकांना त्रास होणार नाही याची विशेष काळजी घेतली जात आहे.
सर्व भाजीपाला विक्रेत्यांना विटा नगर परिषदेच्या नवीन भाजी मंडई मध्ये जागा देऊन कायमस्वरूपी व्यवस्था करण्यात आली आहे त्यामुळे विक्रेत्यांचा व्यवसाय ही सुरू राहील आणि रस्ता ही मोकळा राहील अशी दुहेरी व्यवस्था नगर परिषदेच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे.
या सर्व गोष्टी नियमितपणे करत असताना पहाटे पाच वाजल्यापासून आरोग्य दूत मैदानात उतरून काम करत असतात यामध्ये आरोग्य दूत व पोलीस मित्र शिराज शिकलगार हे पहाटे पाच वाजल्यापासून शहरातील रस्त्यावर असणारे सर्व भाजी विक्रेते यांना त्रास न देता समजावून सांगून भाजी मंडईमध्ये भाजी विक्री बाबत नियोजन करून देत असतात. त्याचबरोबर शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे रस्त्याचे काम सुरू असल्याने शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक विस्कळीत होत आहे या परिस्थितीतही दिवसभर आरोग्य दूत व पोलीस मित्र शिराज शीकलगार हे प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावत असतात. वाहतूक सुरळीत ठेवणे रस्ता मोकळा ठेवणे आणि नागरिकांना अडचण होऊ न देणे यासाठी ते सतत कार्यरत असतात.
सकाळी पहाटे सहा वाजल्यापासून नगरपरिषदेचे सर्व आरोग्य दूत कर्तव्यावर असताना प्रामाणिकपणे आपापली कामे पार पाडत असतात. शहर स्वच्छ ठेवणे रस्ते मोकळे ठेवणे विट्याचे स्वच्छतेत देशात प्रथम स्थान कायम ठेवणे हे त्यांचे ध्येय आहे. नगर परिषदे कडून सर्व भाजी विक्रेत्यांना व नागरिकांना आवाहन करण्यात येते की कृपया रस्त्यावर भाजी विक्री करू नये. नेमून दिलेल्या मंडईमध्येच विक्री करावी रस्ता मोकळा ठेवावा. विटा शहर स्वच्छ ठेवावे. याबाबत नगरपरिषदेला सहकार्य करावे.
