You are currently viewing कडेपूर-वांगी रस्त्यावर उसाच्या ट्रॉलीला दुचाकीची धडक : एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी

कडेपूर-वांगी रस्त्यावर उसाच्या ट्रॉलीला दुचाकीची धडक : एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी

कडेगाव : प्रदीप जोशी

कडेपूर-वांगी रस्त्यावर न्यू इंग्लिश स्कूलसमोर उभ्या असलेल्या उसाच्या ट्रॉलीला दुचाकीची जोरदार धडक बसून झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला, तर पाठीमागे बसलेला एकजण गंभीर जखमी झाला. रविवारी (ता. २२) सायंकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली.

कृष्णा पंडित पवार (वय ४२, मूळ रा. अंबासन, ता. सटाणा, जि. नाशिक, सध्या रा. उपाळे मयणी, ता. कडेगाव) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. तर विष्णू विठ्ठल पवार हे या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कडेपूर-वांगी रस्त्यावर न्यू इंग्लिश स्कूलसमोर उसाने भरलेली ट्रॉली उभी होती. या ट्रॉलीला क्रमांक नव्हता तसेच रात्रीच्या वेळी वाहनधारकांना ती दिसण्यासाठी आवश्यक असलेले परावर्तकही लावण्यात आले नव्हते. रात्रीच्या अंधारात ट्रॉलीचा अंदाज न आल्याने कृष्णा पवार यांची (एमएच १८ एआर ७९४२) दुचाकी ट्रॉलीला जोरात धडकली.

या भीषण अपघातात कृष्णा पवार यांचा जागीच मृत्यू झाला, तर विष्णू पवार गंभीर जखमी झाले. याप्रकरणी अजय कृष्णा पवार यांनी कडेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ट्रॅक्टरचालक भानुदास धोंडिबा दस्स (रा. रेडिमांडकी, ता. माळशिरस, जि. सोलापूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताची नोंद कडेगाव पोलिस ठाण्यात झाली असून, पुढील तपास सुरू आहे.

विना क्रमांक आणि परावर्तक नसलेल्या ट्रॉलीमुळे रात्रीच्या वेळी वाहनधारकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

फोटो ओळी : अपघाताचे प्रातिनिधिक छायाचित्र

प्रतिक्रिया व्यक्त करा