You are currently viewing अवघ्या चार दिवसांच्या बाळासाठी मंदार राणे यांचे तातडीचे रक्तदान

अवघ्या चार दिवसांच्या बाळासाठी मंदार राणे यांचे तातडीचे रक्तदान

अवघ्या चार दिवसांच्या बाळासाठी मंदार राणे यांचे तातडीचे रक्तदान

ओ निगेटिव्ह रक्ताची गरज ओळखून अवघ्या एका तासात रक्तपेढीत पोहोचले; मंदार राणे यांचे अकरावे रक्तदान

कुडाळ : प्रतिनिधी

सिंधुकेअर हॉस्पिटल, कुडाळ येथे उपचारासाठी दाखल असलेल्या अवघ्या चार दिवसांच्या बाळासाठी ओ निगेटिव्ह रक्तगटाच्या रक्ताची अत्यंत तातडीची गरज निर्माण झाली होती. ही गरज लक्षात घेऊन ऑन कॉल रक्तदाते संस्थेचे नियमित रक्तदाते मंदार राणे (रा. कोळोशी, ता. देवगड) यांनी तातडीने पुढाकार घेत रक्तदान करून माणुसकीचे दर्शन घडविले.

दि. २३ नोव्हेंबर रोजी बाळासाठी रक्ताची गरज असल्याची माहिती संस्थेचे सचिव बाबली गवंडे यांनी संस्थेच्या समूहावर तसेच रक्तदात्यांना वैयक्तिकरीत्या पाठविली. या आवाहनाला प्रतिसाद देत मंदार राणे यांनी प्रसंगाचे गांभीर्य ओळखून पडवे मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलच्या रक्तपेढीत धाव घेतली. अवघ्या एका तासाच्या आत त्यांनी रक्तदान करून बाळाला मदतीचा हात दिला.

मंदार राणे यांचे हे आजपर्यंतचे अकरावे रक्तदान ठरले. त्यांच्या या सामाजिक कार्याचे ऑन कॉल रक्तदाते संस्था, सिंधुदुर्ग व कार्यकारिणीच्या वतीने विशेष कौतुक करण्यात आले असून, त्यांना मानाचा मुजरा करण्यात आला. तसेच तातडीने रक्ताची गरज पोहोचविण्यासाठी प्रयत्न करणारे संस्थेचे सचिव बाबली गवंडे यांचेही आभार मानण्यात आले.

बाळाच्या नातेवाईकांनीही रक्तदानासाठी पुढाकार घेणाऱ्या मंदार राणे यांच्यासह प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले. संकटाच्या वेळी धावून जाणाऱ्या रक्तदात्यांमुळे माणुसकीचा विश्वास अधिक दृढ होत असल्याचे या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा