सावंतवाडी:
सावंतवाडीतील कवी तथा कोमसाप सावंतवाडी अध्यक्ष दीपक पटेकर (दीपी) यांच्या “बकुळीची फुले” काव्यसंग्रहाला पुण्यातील प्रतिष्ठेचा ‘श्रि दा ग्रंथ पुरस्कार’ जाहीर झाला आहे. १२ डिसेंबर २०२६ रोजी पुणे येथे सदर पुरस्काराचे वितरण होणार आहे. दीपक पटेकर यांच्या बकुळीची फुले या वृत्तबद्ध काव्यसंग्रहाला मिळालेला हा दुसरा पुरस्कार आहे.
साहित्य हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून ते समाजाला दिशा देणारे एक प्रभावी माध्यम आहे. या विचारातूनच या पुरस्काराची मुहूर्तमेढ रोवली गेली.
या वर्षी या स्पर्धेला संपूर्ण राज्यातून उदंड प्रतिसाद मिळाला. अनुवादीत, शैक्षणिक, कथासंग्रह,
कवितासंग्रह, कादंबरी, नाटक, चरित्र, वैचारिक, ललित, प्रवासवर्णन, बालसाहित्य अशा विविध साहित्य प्रकारांतील अनेक उत्तमोत्तम पुस्तके या स्पर्धेसाठी प्राप्त झाली. आलेल्या प्रत्येक ग्रंथाचा दर्जा इतका उंचावलेला असल्याने त्यातून सर्वोत्कृष्ट कलाकृती निवडणे हे परिक्षक मंडळासाठी फार मोठे आव्हान होते. परिक्षकांनी अत्यंत बारकाईने आणि अभ्यासपूर्ण रीतीने प्रत्येक पुस्तकाचे वाचन व मूल्यांकन करून साहित्याची भाषाशैली, आशयघनता, मांडणी आणि समाजावर होणारा सकारात्मक परिणाम या निकषांवर ‘श्रि दा ग्रंथ पुरस्कार’ जाहीर केले आहेत.
“बकुळीची फुले” काव्यसंग्रहाला मिळालेला पुरस्कारासाठी दीपक पटेकर यांचे विविध स्तरावरून अभिनंदन करण्यात येत आहे.
