९० शेतकऱ्यांना मोफत घरगुती बायोगॅस प्रकल्पाचा लाभ मिळणार!
माणगाव येथे मार्गदर्शन बैठक; महिलांचे आरोग्य, पर्यावरण संवर्धन आणि इंधन खर्चात बचत करण्याचा उद्देश
बांदा :
ग्रामीण भागातील महिलांना चुलीच्या धुरापासून मुक्तता मिळावी, इंधनावरील खर्च कमी व्हावा आणि पर्यावरणपूरक ऊर्जेचा वापर वाढावा, या उद्देशाने माणगाव, कुडाळ येथे ९० शेतकऱ्यांच्या उपस्थितीत मोफत घरगुती बायोगॅस प्रकल्पासंदर्भात मार्गदर्शन बैठक घेण्यात आली.
या बैठकीत बायोगॅस प्रकल्पाचे फायदे, वापर, प्रशिक्षण आणि सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. बायोगॅसमुळे एलपीजी गॅसवरील खर्च कमी होण्यासोबतच जनावरांच्या शेणाचा योग्य वापर होणार आहे. तसेच लाकूड जाळण्याचे प्रमाण कमी होऊन महिलांचे आरोग्य आणि जंगलसंपत्तीचे संरक्षण होण्यास मदत होणार आहे.
यावेळी अध्यक्ष दयानंद कुबल यांनी बायोगॅसच्या माध्यमातून ग्रामीण भागात रोजगारनिर्मितीच्या संधी उपलब्ध होऊ शकतात, असे सांगितले. तसेच बायोगॅस प्रकल्पाला जोडून गांडूळखत निर्मितीचे उपक्रम राबविण्यासाठी संस्थेमार्फत प्रयत्न करण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या उपक्रमासाठी कोकण संस्था आणि आरसिल कंपनी प्रयत्नशील असून, ग्रामीण भागात स्वच्छ ऊर्जा आणि शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळवून देण्याचा यामागील उद्देश आहे.
बैठकीला दयानंद कुबल, प्रीती पंगे, साक्षी पोटे, कामाक्षी महालकर, प्रथमेश सावंत, गौरी आडेलकर, रुचा पेडणेकर, वैशाली म्हाडगुत आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन समीर शिर्के यांनी केले, तर प्रास्ताविक गौरी आडेलकर यांनी केले.
