फोंडाघाटात अवजड कंटेनरमुळे व्यापारी त्रस्त; रस्ता रोकोचा इशारा!
सोमवार बाजारदिवशी मोठ्या कंटेनरना प्रवेश बंद करण्याची मागणी; डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सर्वपक्षीय आंदोलन छेडणार, अजित नाडकर्णी यांचा इशारा
फोंडाघाट :
सोमवार हा आठवडी बाजाराचा दिवस असल्याने फोंडाघाट बाजारपेठेत नागरिक व व्यापाऱ्यांची मोठी वर्दळ असते. मात्र, या दिवशीही मोठ्या कंटेनरची वाहतूक सुरू असल्याने व्यापारी आणि नागरिकांना धुळीचा तसेच वाहतूक कोंडीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे सोमवार बाजारदिवशी मोठे कंटेनर फोंडाघाटातून पाठवू नयेत, अशी मागणी करण्यात येत आहे.
रस्त्यावरून जाणाऱ्या अवजड वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात धूळ उडत असून व्यापाऱ्यांच्या दुकानांमध्ये तसेच नागरिकांच्या डोळ्यांत धूळ जात आहे. याकडे प्रशासन आणखी किती दिवस दुर्लक्ष करणार? नागरिकांचे डोळे निकामी होण्याची वाट पाहत आहात काय, असा संतप्त सवाल अजित नाडकर्णी यांनी उपस्थित केला आहे.
या समस्येवर ग्रामपंचायतीने तातडीने ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष यशवंत मसुरकर यांना सोबत घेऊन रस्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशारा अजित नाडकर्णी यांनी दिला आहे.
दरम्यान, डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या प्रश्नावर मोठे सर्वपक्षीय आंदोलन उभारण्यात येणार असून, पालकमंत्री, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ग्रामपंचायतीला याबाबत निवेदन देण्यात येणार आहे. फोंडाघाटातील व्यापारी व नागरिकांच्या समस्यांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.
