*विमानसेवा नियमित सुरू झाल्यावरच पालकमंत्र्यांनी त्याचा इव्हेंट करावा- मा.आ. वैभव नाईक*
*रो-रो बोट सेवेच्या इव्हेंटचा दाखला देत पालकमंत्र्यांना केले लक्ष*
चिपी –
मुंबई विमानसेवा सोमवारपासून सुरू होत आहे. याला आमच्या शुभेच्छा आहेत. परंतु पालकमंत्री ज्या पद्धतीने त्याचा इव्हेंट करण्याचा प्रयत्न करत आहेत, तो योग्य नाही, अशी भूमिका माजी आमदार वैभव नाईक यांनी मांडली. यावेळी त्यांनी रो-रो बोट सेवेच्या इव्हेंटचा दाखला देऊन विमान सेवा सुरळीत झाल्यानंतरच त्याचा इव्हेंट करण्याबाबत पालकमंत्र्यांना लक्ष केले.
ते म्हणाले, या विमानतळाचे भूमिपूजन पंधरा वर्षांपूर्वी झाले होते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर या विमानतळाचे प्रत्यक्ष उद्घाटन झाले. उर्वरित काम त्यांच्या कारकिर्दीत दोन-अडीच वर्षांत पूर्ण करण्यात आले.त्यानंतर मुंबई – पुणे ही विमानसेवा सुरू झाली होती. मात्र सरकार बदलल्यानंतर पाठपुरावा झाला नसल्यामुळे ती विमानसेवा बंद झाली, असा आरोप नाईक यांनी केला.गेल्या चार-पाच वर्षांमध्ये अनेकवेळा ही विमानसेवा सुरू करतो असे सांगण्यात आले. प्रत्यक्षात ती सुरू झाली नाही. त्यामुळे पर्यटकांचा हिरमोड झाला. अनेकवेळा विमाने रद्द झाली. त्यामुळे नागरिकांना त्रास झाला. आता लोकांची दिलगिरी व्यक्त करून विमानसेवा सुरू केली पाहिजे, अशी मागणी नाईक यांनी केली.
यापूर्वी रो-रो सेवा सुरू करण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला. जाहिराती देण्यात आल्या. मात्र नंतर ती प्रत्यक्षात बंद पडली. ही वस्तुस्थिती चार-पाच महिन्यांपूर्वीची आहे, असेही ते म्हणाले.या विमानतळासाठी अनेक लोकांनी प्रयत्न केले आहेत. अनेकांच्या जागा गेल्या आहेत. कोकण आणि मुंबई हे पर्यटनदृष्ट्या, राजकीयदृष्ट्या, व्यावसायिकदृष्ट्या जोडलेले राहिले पाहिजेत. विमानसेवा सुरळीत सुरू झाली तर सिंधुदुर्ग जिल्ह्याला त्याचा फायदा होईल.मात्र विमानसेवा सुरू झाल्यानंतर पाच-सहा महिने ती नियमित सुरू राहिल्यानंतरच त्याचा इव्हेंट केला पाहिजे. इव्हेंट येणाऱ्या तीन-चार महिन्यानंतर करावा, अशी अपेक्षा नाईक यांनी व्यक्त केली. विमानसेवा सुरू करण्याचे आव्हान पालकमंत्र्यांसमोर आहे, ते त्यांनी स्वीकारावे, त्याला आमची साथ असेल, असेही वैभव नाईक म्हणाले आहेत.
