कृपासिंधू दूध संस्थेतर्फे ४५ दूध उत्पादकांना ७२ हजारांचा दिवाळी बोनस!
प्रथम दोन दूध उत्पादकांना दूध किटली भेट; सर्व दूध उत्पादकांना मका बियाण्यांचे वाटप
सावंतवाडी
कृपासिंधू दूध संस्थेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही सोमवार, ९ नोव्हेंबर रोजी दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिवाळी बोनसचे वाटप करण्यात आले. यावेळी संस्थेच्या ४५ दूध उत्पादकांना सुमारे ७२ हजार रुपयांचा रोख बोनस देण्यात आला.
संस्थेच्या माध्यमातून दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष उपक्रम राबविण्यात आला. संस्थेला सर्वाधिक दूध संकलन करून देणाऱ्या प्रथम दोन दूध उत्पादकांना दूध किटली भेट देऊन गौरविण्यात आले. तसेच सर्व दूध उत्पादकांना मका बियाण्यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, दूध संकलक, संचालक मंडळाचे सदस्य आणि सर्व दूध उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर बोनसची रक्कम मिळाल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांनी समाधान आणि आनंद व्यक्त केला. संस्थेच्या या उपक्रमाचे दूध उत्पादकांकडून कौतुक करण्यात आले.
