You are currently viewing दिवाळी

दिवाळी

*पारिजात साहित्य समूह सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री गझलकार डॉ शरयू शहा लिखित अप्रतिम गझल*

 

💠*दिवाळी*💠

 

वृत्त.. वागेश्वरी

लगागा/७ लगा

 

मनाला नि प्राणास देऊ झळाळी, अशीही दिवाळी करू साजरी

फटाके नको थेट कानी कपाळी, अशीही दिवाळी करू साजरी

 

घराची मनाची करू या सफाई, किती साचलेली मनी जळमटे

जपू प्रेम शब्दासवे ही नव्हाळी,अशीही दिवाळी करू साजरी

 

असावी जराशी हुषारी मनाची, लढाई हराया शिकू या जरा

शिकू झीज घ्याया सदा सर्वकाळी, अशीही दिवाळी करू साजरी

 

फटाके खरेदीस देऊन सुट्टी, मनी कोंब हिरवे तयांना जपू

गरीबाघरी पुरणपोळी नि थाळी, अशीही दिवाळी करू साजरी

 

पचवतात दुःखास देऊन मोदा, अशा दैवतांच्या रहावे जवळ,

सुखाचेच वरदान वृध्दापकाळी, अशीही दिवाळी करू साजरी

 

समस्या उभी राहता का स्मरावे, प्रभू नाम ओठी निरंतर असो

झुलो आत्मतेजात अपुली डहाळी, अशीही दिवाळी करू साजरी

 

भवातून फिरणे किती काळ वर्षे,

अता साधणे फक्त आत्मोन्नती

उरी ध्यास आता मनवायची ही निराळी, अशीही दिवाळी करू साजरी

 

डॅा.शरयू शहा.

॰॰॰॰॰॰॰॰॰

प्रतिक्रिया व्यक्त करा