प्राधिकरण निगडी –
प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने दिनांक ४ नोव्हेंबर २६ रोजी प्रभाती सहा वाजता , संघाच्या इतिहासात प्रथमच दिवाळी पहाट हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्राधिकरणामधीलच प्रतिथयश गायक, गायिकांनी , श्री .श्रीनिवास ठोंबरे यांच्या संकल्पनेतून, विविध प्रकारची गीते सादर करून उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले. भूपाळी ते भैरवी , या प्रवासात भक्ती गीते, भावगीते, भजन, नाट्यगीते ,अभंग , गवळण, कोळीगीते, तसेच काही हिंदी गीते अशा विविधांगी छटांनी नटलेल्या गीतांच्या नजराण्याने उपस्थितांची सकाळ संगीतमय व आनंददायी झाली.
उठी श्रीरामा पहाट झाली, विठू माऊली तू माऊली जगाची, आली माझ्या घरी ही दिवाळी, लिंबलोण उतरू कशी, कौसल्येचा राम बाई,तुझे गीत गाण्यासाठी सूर लागू दे, हे सुरांनो चंद्र व्हा,यमुनेच्या तीरावर पाहिला हरी, तुम्हावर केली मी मर्जी, धुंदी कळयांना धुंदी फुलांना, तुझ्या गळा माझ्या गळा, फूल तुम्हे भेजा है खत में, तेरी बिंदिया रे, दिल तो पागल है, इ. बहारदार गीते गायली.
शीतल कुलकर्णी, शुभांगी म्हेत्रे, स्वाती शितुरकर, अंजली जोशी, शिवाजी जकका, सुभाष बोरोले, मनोहर जोशी, विजय सहारे आणि श्रीनिवास ठोंबरे, या कलाकारांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
तसेच ,सभासदांच्या अद्ययावत यादीचा प्रकाशन सोहळा श्री मुकुंद जोशी, निर्देशिका समितीचे प्रमुख यांच्या हस्ते झाला. संघाच्या कार्यात सुसूत्रता आणि सभासदांमधील संपर्क अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला आहे असे मनोगत ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री . चंद्रशेखर जोशी यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाला संघाचे माजी अध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
