विटे / प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार :
सांगली जिल्ह्यात पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद सांगलीच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत पिण्याच्या पाण्याची टंचाई निवारणासाठी टँकर व विहीर अधिग्रहणाद्वारे प्रशासनाकडून उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. बाधित गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करणे तसेच स्थानिक पातळीवर खाजगी विहिरी व बोअरचे अधिग्रहण करून पाणी पुरवठा सुरळीत ठेवण्यावर भर दिला जात आहे. जिल्हा परिषदेच्या 2 नोव्हेंबर अखेरच्या अहवालानुसार 50 खाजगी व 7 शासकीय अशा एकूण 57 टँकरव्दारे 58 गावे व 415 वाड्यातील 1 लाख 21 हजार 636 बाधित लोकसंख्येला व 11 हजार 346 पशुधनासाठी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी 31 खाजगी विहिरी/बोअर अधिग्रहित केल्या आहेत.
जत तालुक्यातील टंचाईग्रस्त 49 गावे व 346 वाड्यांमधील सुमारे 1 लाख 4 हजार, 256 लोकसंख्येला 48 टँकरद्वारे (42 खाजगी व 6 शासकीय) पाणी पुरवले जात आहे. टंचाईवर मात करण्यासाठी तालुक्यात 20 खाजगी विहिरी/बोअर अधिग्रहित करण्यात आल्या असून 2 डिझेल इंजिन भाड्याने घेण्यात आले आहेत.
कवठेमहांकाळ तालुक्यातील टंचाईग्रस्त 1 गाव व 8 वाड्यांमधील 1834 लोकसंख्येसाठी 1 शासकीय टँकर सुरू आहे. नळ पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीतील पाणीसाठा अत्यंत कमी झाल्यामुळे गावात पाणीटंचाई भासू नये यासाठी 2 खाजगी विहिरी/बोअरचे अधिग्रहण करण्यात आले आहे.
तासगाव तालुक्यातील टंचाईग्रस्त 1 गाव व 6 वाड्यांमधील ८५५ लोकसंख्येला १ खाजगी टँकरद्वारे पाणी पुरवले जात आहे. तालुक्यात ३ खाजगी विहिरी/बोअर अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.
आटपाडी तालुक्यातील टंचाईग्रस्त 7 गावे व 55 वाड्यांमधील 14691 नागरिकांना आणि 11346 पशुधनाला 7 खाजगी टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. या तालुक्यात 3 विहिरी/बोअर अधिग्रहित करण्यात आले आहेत.
खानापूर तालुक्यात 2 गावे टंचाईग्रस्त असून 3 खाजगी विहिरी/बोअर अधिग्रहित करण्यात आले आहेत.
