हत्ती थेट नागरिकांच्या दारात; वनविभागाच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह!
इन्सुली-बिलेवाडीत पहाटे चार वाजता हत्तीचा लोकवस्तीत शिरकाव; घरांसह वाहने आणि शेतीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
इन्सुली (बिलेवाडी) :
इन्सुली-बिलेवाडी येथे आज पहाटे सुमारे चार वाजण्याच्या सुमारास हत्ती थेट नागरिकांच्या घराच्या दरवाजात येऊन उभा राहिल्याने परिसरात खळबळ उडाली. श्री. गजेंद्र कोठावळे आणि श्री. सीताराम कोठावळे यांच्या घराच्या दारात हत्ती दिसून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हत्ती थेट लोकवस्तीत पोहोचत असताना वनविभागाची गस्त नेमकी कुठे होती, असा संतप्त सवाल आता ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.
सध्या भातमळणीचा हंगाम सुरू असून शेतकरी पहाटेपासून शेतात आणि खळ्यावर कामासाठी जात आहेत. अशा वेळी हत्तींचा लोकवस्तीत वावर वाढल्याने शेतकरी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. घरासमोर उभी असलेली वाहने, घरे आणि शेतीचे नुकसान होण्याची भीतीही नागरिकांना सतावत आहे.
परिसरात ओंकार हत्तीचा वावर असल्याची चर्चा असून, बिलेवाडीतील घरांपर्यंत पोहोचलेला हत्ती ओंकारच होता की आणखी दुसरा हत्ती, याबाबत वनविभागाने अधिकृत माहिती द्यावी, अशी मागणी होत आहे.
हत्तींच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी वनविभागाने गस्त वाढवावी, नागरिकांना वेळेवर सतर्कतेचे संदेश द्यावेत आणि लोकवस्तीच्या परिसरात प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. तसेच हत्तीमुळे घरांचे, वाहनांचे किंवा शेतीचे नुकसान झाल्यास तातडीने पंचनामे करून योग्य नुकसानभरपाई देण्याची व्यवस्था करावी, अशीही अपेक्षा व्यक्त होत आहे.
वन्यप्राण्यांचे संरक्षण महत्त्वाचे असले तरी लोकवस्तीत राहणाऱ्या नागरिकांच्या जीविताचे आणि मालमत्तेचे संरक्षण करण्याची जबाबदारीही प्रशासनाची आहे. एखादी दुर्घटना घडल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा ती घडण्यापूर्वीच खबरदारी घेणे आवश्यक आहे.
हत्ती फिरतोय दारोदारी; मात्र नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी घेणार कोण? असा सवाल उपस्थित करत बिलेवाडीकरांनी वनविभाग आणि प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलण्याची मागणी केली आहे.
