You are currently viewing एमआयडीसीमध्ये राणेंच्या कंपन्यांनी घेतलेल्या जागांवर आधी उद्योग सुरू करा, मगच २१ व्या शतकातील कुडाळ एमआयडीसी साकारण्याच्या बाता मारा

एमआयडीसीमध्ये राणेंच्या कंपन्यांनी घेतलेल्या जागांवर आधी उद्योग सुरू करा, मगच २१ व्या शतकातील कुडाळ एमआयडीसी साकारण्याच्या बाता मारा

एमआयडीसीमध्ये राणेंच्या कंपन्यांनी घेतलेल्या जागांवर आधी उद्योग सुरू करा, मगच २१ व्या शतकातील कुडाळ एमआयडीसी साकारण्याच्या बाता मारा

माजी आमदार वैभव नाईक यांचा आमदार निलेश राणेंना टोला

कुडाळ

२१ व्या शतकातील कुडाळ एमआयडीसी साकारायची असल्याचे वक्तव्य नुकतेच आमदार निलेश राणेंनी केले आहे. खरंतर या वक्तव्याच्या माध्यमातून नारायण राणेंच्या अपयशी कारभारावर निलेश राणेंनी शिक्कामोर्तब केले आहे. कारण मागील ३६ वर्षे नारायण राणेंनी मुख्यमंत्री, महसूल मंत्री, उद्योगमंत्री, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्यसभा खासदार आणि केंद्रातले सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योगमंत्री पद भूषविले आहे.एवढी मंत्री पदे भूषवून देखील त्यांना या काळात कुडाळ एमआयडीसी अथवा जिल्ह्यातील इतर कुठल्याही एमआयडीसी मध्ये एकही उद्योग आणता आला नाही हे वास्तव आहे. याउलट निलेश राणे खासदार असताना आणि नारायण राणे उद्योगमंत्री असताना राणेंच्या कंपन्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एमआयडीसीं मधील सुमारे ४० एकर जागा घेतली असून त्यात आजपर्यंत कुठलेही रोजगाराचे उद्योग सुरु केलेले नाहीत.त्या जागा ओसाड पडून आहेत. त्यामुळे त्या ४० एकर जागांमध्ये आधी रोजगाराचे उद्योग सुरु करावेत नंतरच २१ व्या शतकातील कुडाळ एमआयडीसी साकारण्याच्या बाता निलेश राणेंनी माराव्यात त्याचबरोबर एमआयडीसीतील ३० कोटींच्या रस्त्याच्या कामात निलेश राणेंचे कमिशन किती आहे असा टोला कुडाळ मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांनी लगावला आहे.

वैभव नाईक पुढे म्हणाले मी आमदार असताना निलेश राणेंप्रमाणे केवळ पोकळ घोषणा केल्या नाहीत तर कुडाळ एमआयडीसी मध्ये विविध उद्योग आणून दाखवले आहेत. त्यामध्ये बजाज राईस मिल, गोदरेज कंपनी, दोन काजू प्रक्रिया उद्योग, काथ्या उद्योग, दोन वॉटर बॉटल कंपन्या, ग्रँफिशर नेट्स- मत्स्य जाळी बनविणारी कंपनी अशा विविध कंपन्या आणि उद्योग माझ्या कारकिर्दीत सुरु झाले आहेत. उद्योजकांना एमआयडीसी मध्ये जागा व इतर सुविधा सुलभरित्या मिळाव्यात यासाठी आम्ही प्रयत्न केले होते. त्यामुळे नवनवीन उद्योग येत होते. परंतु गेल्या साडेतीन वर्षात महायुती सरकार आल्यापासून एमआयडीसी मध्ये राजकीय हस्तक्षेप वाढला असल्याने उद्योजकांना जागा उपलब्ध होत नाहीत त्याचबरोबर इतर सुविधा देखील मिळत नाहीत त्यामुळे स्थानिक नवीन उद्योजक एमआयडीसीत यायला बघत नाहीत. निलेश राणे आमदार झाल्यापासून परप्रांतीय व्यक्तींना मात्र व्यावसायिक जागा ताबडतोब दिल्या जात आहेत. माझ्या कार्यकाळात सुरू झालेल्या उद्योगांच्या माध्यमातून आजही अनेक युवक व नागरिकांना रोजगार मिळत आहे. फक्त मी त्याची कोणतीही जाहिरात बाजी केली नाही आणि आमदार असल्याने मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करणे हि माझी जबाबदारीच होती. परंतु मी १० वर्षात काही केले नाही असे निलेश राणे वारंवार सांगत असून ते जनतेमध्ये माझ्याबाबतीत फेक नेरिटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु मी किती कामे केली, किती वेळ जनतेसाठी उपलब्ध असायचो हे सर्व जनतेला ठाऊक असल्याचे वैभव नाईक यांनी सांगितले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा